फडणवीस यांच्या जपान दौऱ्याचे फलित

Share

अजय तिवारी

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच जपान दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी विविध क्षेत्रांमधील उद्योगपतींची भेट घेतली. राज्यातील पायाभूत सुविधा, शिक्षण तसेच ऊर्जा क्षेत्रांमध्ये गुंतवणूक करण्यात या उद्योगपतींनी स्वारस्य दाखवले आहे. महाराष्ट्रात नेमकी किती गुंतवणूक येणार हे येत्या काही काळात स्पष्ट होईल. तथापि, महाराष्ट्राबाबत सकारात्मक संदेश देण्यात फडणवीस यांचा दौरा यशस्वी ठरला, असे नक्कीच म्हणता येते.

महाराष्ट्रात थेट विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी तसेच जपानी कंपन्यांना गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच जपानचा दौरा केला. आपल्या पाच दिवसांच्या दौऱ्यात त्यांनी क्योटो, ओसाका आणि कानसाई येथील उद्योगपतींशी विविध क्षेत्रांमधील गुंतवणुकीबाबत चर्चा केली. यात पायाभूत सुविधा, शिक्षण तसेच आरोग्य या क्षेत्रांचा समावेश आहे. जपानी कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना जपानमध्ये शिक्षण घेण्यासाठी, प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी टोकियो येथील इंडियन हाऊसलाही भेट दिली. जपानी गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र हे आदर्श ठिकाण असल्याचा दावा फडणवीस यांनी केला असून एफडीआयसाठी हे राज्य पहिल्या क्रमांकाचे गंतव्यस्थान असल्याचे प्रतिपादनही त्यांनी केले आहे. टोकियो ते क्योटो दरम्यानच्या शिंकनसेन सबुलेट ट्रेनचा प्रवास करत तिच्या वेग, अचूकता आणि नियोजनाचे त्यांनी कौतुक केले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यावर मुंबई आणि जपान दरम्यानच्या उड्डाणांची संख्या वाढेल. यामुळे व्यावसायिक भागीदार तसेच गुंतवणूकदार या दोघांचाही फायदा होणार आहे.

केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात भारतातील एकूण एफडीआयच्या २६.२६ टक्के इतकी दुसऱ्या क्रमांकाची गुंतवणूक झाली. राज्यात पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, अक्षय ऊर्जा, माहिती तंत्रज्ञान तसेच पोलाद उत्पादन यांसह एफडीआय आकर्षित करणारी विविध क्षेत्रे आहेत. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. येथेच प्रमुख कंपन्यांची मुख्यालये असून आशियातील सर्वात जुने बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजही आहे. औद्योगिक धोरण, २०१९ नुसार निर्यात प्रोत्साहन देण्यासाठी निर्यात प्रोत्साहन परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. ‘एक जिल्हा एक उत्पादन’ योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्याला उदयोन्मुख निर्यात केंद्र बनवण्यासाठी जिल्हा निर्यात प्रोत्साहन परिषदांची स्थापना करण्यात आली आहे. हिंगणघाट, वसमत, लातूर, शिरपूर, धुळे आणि देगाव, भिवंडी, बारामती, इस्लामपूर तसेच इचलकरंजी येथे बारा टेक्स्टाईल पार्क आहेत. ‘इन्व्हेस्ट इंडिया’च्या संकेतस्थळानुसार, महाराष्ट्रात गुंतवणुकीच्या भरपूर संधी आहेत. राज्याला असलेली ७२० किलोमीटर लांबीची किनारपट्टी तसेच ५० बंदरे आहेत. त्यामुळे भारतातील एकूण माल वाहतुकीच्या २० टक्क्यांपेक्षा अधिक वाहतूक सुलभ होते. जपानी गुंतवणूक आकर्षिक करणे, हा फडणवीस यांच्या दौऱ्यामागील प्रमुख हेतू होता. हिताची, सुमितोमो तसेच जायकासह जपानी आदी उद्योगांच्या प्रतिनिधींची त्यांनी घेतलेली भेट म्हणूनच महत्त्वाची होती. या कंपन्यांनी राज्यातील पायाभूत सुविधा, उत्पादन तसेच तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रात गुंतवणूक करण्यात स्वारस्य दाखवले आहे. ही गुंतवणूक प्रत्यक्षात आल्यानंतर राज्यात रोजगाराच्या हजारो संधी निर्माण होणार आहेत.

पर्यटनाला चालना देणे हाही फडणवीस यांच्या दौऱ्यामागील एक उद्देश होता. फडणवीस यांनी महाराष्ट्राला पर्यटन स्थळ म्हणून अधोरेखित केले. अनेक जपानी ट्रॅव्हल एजन्सींची भेट घेत त्यांनी राज्यातील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी आमंत्रित केले. अजिंठा आणि एलोरा लेणी हे विदेशी पर्यटकांचे प्रमुख आकर्षणस्थळ आहे. अधिकाधिक जपानी पर्यटकांनी महाराष्ट्राला भेट दिल्यास राज्याच्या अर्थव्यवस्थेत अब्जावधी रुपयांची उलाढाल होऊ शकते. त्या बरोबरीने महाराष्ट्र-जपान संबंध वृद्धिंगत होतील, याचीही त्यांनी काळजी घेतली. म्हणूनच त्यांनी सरकारी अधिकारी तसेच व्यावसायिकांच्या भेटीगाठी घेतल्या. व्यापार, गुंतवणूक तसेच सांस्कृतिक देवाण-घेवाण यांसारख्या क्षेत्रात महाराष्ट्र तसेच जपानमधील सहकार्य वाढवण्यासंबंधी त्यांनी चर्चा केली. जपानसोबतचे संबंध दृढ झाल्यामुळे राज्याचा अनेक प्रकारे फायदा होणार आहे. जपानी तंत्रज्ञान आणि बाजारपेठांमध्ये प्रवेश करण्याची संधी राज्याला मिळाली आहे. या व्यतिरिक्त फडणवीस यांच्या दौऱ्याचे अनेक सकारात्मक परिणाम दिसले आहेत. राज्याची विदेशातील प्रतिमा सुधारण्यास तसेच विदेशी गुंतवणूकदार आणि पर्यटकांसाठी महाराष्ट्र अधिक आकर्षित असल्याचे पटवून देण्यात त्याची मदत झाली आहे. महाराष्ट्राची संस्कृती आणि वारसा याबद्दल जागरूकता निर्माण होण्यासही मदत झाली आहे. जपानी गुंतवणूक आकर्षित करणे, पर्यटनाला चालना देणे तसेच परस्परसंबंध दृढ करणे यासह राज्याला या दौऱ्याचे अनेक फायदे झाले.

मुंबईतील बहुचर्चित वर्सोवा-विरार सी लिंक प्रकल्पासाठी जपान सरकार महाराष्ट्र शासनासोबत सहकार्य करणार आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, मुंबई मेट्रो ३ तसेच बुलेट ट्रेन प्रकल्पांच्या कामाला गती दिल्याबद्दल जपानचे उद्योगमंत्री यासुतोशी निशिमुरा यांनी राज्य शासनाचे आभार मानले. पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे मुंबईची उत्पादकता तसेच कार्यक्षमता वाढणार असल्याचे जपानने विशेषत्वाने नमूद केले आहे. विरारपर्यंतच्या बहुतांश उपनगरांना सुपरफास्ट कनेक्टिव्हिटी प्रदान करणाऱ्या वर्सोवा-विरार सी लिंक प्रकल्पासाठी जपान आवश्यक ते सर्व सहकार्य करणार आहे. हा प्रस्तावित ४३ किलोमीटरचा आठ लेनचा मुंबईच्या पश्चिम किनाऱ्याजवळील उन्नत रस्ता महत्त्वाचा आहे. या प्रकल्पाचा प्रस्तावित खर्च ६३,४२६ कोटी रुपये इतका आहे. त्याला कॅबिनेटची मंजुरी मिळाली असून एमएमआरडीएद्वारे त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. ‘जायका’ कंपनीने मेट्रो-३, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, बुलेट ट्रेन इत्यादी प्रकल्पांना वित्तपुरवठा केला आहे. फडणवीस यांनी त्याबद्दल कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष नाकाझावा केईचिरो यांची भेट घेत आभार मानले. नागनदी तसेच मुळा-मुठा नदी संवर्धन प्रकल्पांचे काम सुरू झाले असून त्यांची वॉर रूमच्या माध्यमातून देखरेख केली जाते. या सर्व प्रकल्पांना ‘जायका’ने सहकार्य केले आहे. तशीच भूमिका कंपनीने वर्सोवा-विरार सी लिंकसाठी घ्यावी आणि मुंबई पूरव्यवस्थापन प्रकल्पात मदत करावी, अशी विनंती फडणवीस यांनी केली.

मित्सुबिशी ही दिग्गज कंपनी महाराष्ट्रात सेमीकंडक्टर क्षेत्रात गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचे वृत्त आहे. ही इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादन करणारी जगातील आघाडीची कंपनी आहे. या कंपनीने तळेगाव येथे प्लांट उभारला असून पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होऊन डिसेंबर महिन्यात तो कार्यान्वित होईल, अशी अपेक्षा आहे. महाराष्ट्रात कंपनी विस्तार करण्याचा विचार करत असून सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये विशेषतः पुणे विभागात ती भागीदार शोधत आहे. भारत सरकारने सेमीकंडक्टर क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी विशेष अनुदानही जाहीर केले आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारसोबत गुंतवणूक तसेच भागीदारीच्या संधी शोधत असल्याचे हरित हायड्रोजन, अमोनिया, नवीकरणीय ऊर्जा तसेच द्रवरूप नैसर्गिक वायू क्षेत्रात व्यस्त असलेल्या जपानमधील सर्वात मोठ्या वीजनिर्मिती कंपनी जेरा को इंकने म्हटले आहे. २०५० पर्यंत शून्य उत्सर्जन साध्य करण्याच्या उद्देशाशी हे सुसंगत आहे. ‘जेरा’ महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास इच्छुक असल्याचा फायदा राज्याला मिळणार असल्याचा दावा फडणवीस यांनी समाज माध्यमांवरून केला आहे. कंपनीकडे ८.७ ट्रिलियन डॉलरची एकूण मालमत्ता आहे.

मुंबई पूर शमन प्रकल्प, मेट्रो ११ मार्गिका, एआय सेंटर यासाठीही जपानी कंपन्यांनी स्वारस्य दाखवले आहे. सोनी, डेलॉईट, सुमिटोमो कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांनी भेट घेतली. सोनी समूहाला फिल्मसिटीत येण्याची तसेच आयआयटी मुंबईशी संशोधनाच्या क्षेत्रात सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली केली आहे. त्यांनी बांधकाम क्षेत्रात काम करणाऱ्या सुमिटोमोला मुंबईत उपलब्ध असलेल्या संधींची माहितीही दिली. ग्रीन हायड्रोजन, कचऱ्यातून वीजनिर्मिती, लॉजिस्टिक, इलेक्ट्रिक व्हेईकल, हायस्पीड रेल्वे, स्टार्ट अप्स आदी क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत डेलॉईट कंपनी उत्सुक आहे. गुंतवणूक आकर्षित करणे तसेच प्रक्रियेतील अडथळे दूर करणे, यासाठी जपान केंद्रित समितीची स्थापना करण्यात येणार आहे. त्यामुळे गुंतवणूक करणे सुलभ होईल.

महाराष्ट्रात नेमकी किती गुंतवणूक होणार, हे स्पष्ट झाले नसले तरी जपानी कंपन्यांनी सर्वच क्षेत्रात गुंतवणूक करण्यात स्वारस्य दाखवणे, ही सकारात्मक बाब आहे. विशेषतः सेमीकंडक्टर क्षेत्रात गुंतवणूक आणण्यास महाराष्ट्र यशस्वी ठरल्यास फॉक्सकॉन तसेच वेदांता प्रकरणावरून महाराष्ट्राबाबत जगभरात गेलेला चुकीचा संदेश खोडून काढता येईल. बुलेट ट्रेन हा भारत-जपान संबंधांचा एक महत्त्वाचा भाग आहे. फडणवीस-शिंदे सरकारने बुलेट ट्रेन प्रकल्पाला दिलेली गती महाराष्ट्र-जपान हितसंबंधांना चालना देणारी ठरली आहे, असे म्हटल्यास काहीही वावगे ठरणार नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Recent Posts

Pahalgam Terror Attack : आता मलाही मारा ना…! काल लग्न झालं अन् आज घरातून तिरडी उठणार

१२ फेब्रुवारीला लग्न झालेल्या शुभमला पत्नीसमोर संपवलं दहशतवाद्यांनी सांगितलं पत्नीला का नाही मारलं? नवी दिल्ली…

7 minutes ago

Chardham Yatra Scam : चारधाम यात्रेला जाताय सावधान! भाविकांची होतेय मोठी फसवणूक

देहराडून : चारधाम यात्रा (Chardham Yatra 2025) येत्या ३० एप्रिल २०२५ पासून सुरू होणार आहे.…

25 minutes ago

अतिरेक्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू, ‘या’ दिवशी राज्यात येणार पार्थिव

मुंबई : पहेलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला. यात तीन डोंबिवलीकर,…

27 minutes ago

काश्मीर खोऱ्यात लपले आहेत ५६ विदेशी अतिरेकी, सूत्रांची माहिती

श्रीनगर : जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामागे पाकिस्तान पुरस्कृत लष्कर - ए - तोयबा…

1 hour ago

OTT: या आठवड्यात फक्त ओटीटीवर अ‍ॅक्शन दिसणार, हे १२ चित्रपट प्रदर्शित होतील..

नवी दिल्ली: या आठवड्यात ओटीटी प्लॅटफॉर्मवर फक्त अ‍ॅक्शन बघायला मिळणार आहे. अनेक नवीन चित्रपट आणि…

1 hour ago

बारामुलात दोन अतिरेकी ठार, पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर सुरक्षा पथकांची पहिली कारवाई

बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…

2 hours ago