Tuesday, March 25, 2025
Homeक्रीडाNeeraj Chopra : डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राला सुवर्णपदकाची हुलकावणी

Neeraj Chopra : डायमंड लीगमध्ये नीरज चोप्राला सुवर्णपदकाची हुलकावणी

रौप्य पदकावर मानावे लागले समाधान

स्वित्झर्लंड : नुकत्याच पार पडलेल्या जागतिक ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये (World Athletics Championship) भारताच्या नीरज चोप्राने (Neeraj chopra) सुवर्णपदक (Gold Medal) मिळवत भारताची मान उंचावली. या स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा तो पहिला भारतीय ठरला. यानंतर काल स्वित्झर्लंडमध्ये पार पडलेल्या झुरिच डायमंड लीगमधील (Zurich Diamond League 2023) नीरजच्या पराक्रमावर सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. मात्र, नीरजला थोडक्यासाठी सुवर्णपदक गमवावे लागले आहे. ८५.७१ मीटरच्या भालाफेकीसह त्याने दुसऱ्या स्थानावर आपलं नाव कोरलं आहे.

लेझीग्रंड स्टेडियमवर त्याच ठिकाणी जेथे तो गेल्या वर्षी २०२२ डायमंड लीग चॅम्पियन बनला होता, यावेळेस मात्र नीरज चोप्राने माफक ८०.७९ मीटरने सुरुवात केली. आपला दुसरा आणि तिसरा थ्रो फाऊल केल्यानंतर, नीरज चोप्राने आपल्या चौथ्या प्रयत्नात ८५.२२ मीटरचा थ्रो केला. पाचव्या प्रयत्नात देखील नीरजने फाऊल केला. नीरज त्याच्या शेवटच्या आणि सहाव्या प्रयत्नात ८५.७१ मीटरचा थ्रो करण्यात यशस्वी ठरला. त्याचवेळी या स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या झेकच्या जेकब वडलेचने ८५.८६ मीटरचा थ्रो केला. नीरज त्याच्यापेक्षा केवळ ०.१५ मीटरने मागे पडल्याने त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

काय म्हणाला नीरज चोप्रा?

नीरज चोप्रा म्हणाला, “मला आता खूप बरं वाटतंय. कारण वर्ल्ड चॅम्पियनशिपनंतर सर्वजण थोडे थकले होते. आम्ही तिथे आमचे १०० टक्के योगदान दिले, परंतु या स्पर्धेसाठी माझे लक्ष फक्त निरोगी राहण्यावर होते. मी फक्त निरोगी राहणे आणि माझ्या पुढील स्पर्धांमध्ये माझे १०० टक्के योगदान देणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. कधीकधी आपल्याला आपले शरीर वाचवावे लागते. आज मला ठीक वाटत आहे, मी १०० टक्के ठीक आहे, पण मी जास्त जोर लावला नाही. काहीवेळा, आमचे प्रथम क्रमांकाचे ध्येय निरोगी राहणे असते. आज मी माझे सर्वोत्तम प्रयत्न केले, पण तरीही निरोगी राहण्यावर लक्ष केंद्रित करून. यानंतर आम्हाला आता यूजीन (डायमंड लीग फायनल) आणि नंतर आशियाई खेळांवर लक्ष केंद्रित करायचे आहे.”

अमेरिकेत होणार डायमंड लीगचे अंतिम सामने

डायमंड लीगचा अंतिम सामना १६ आणि १७ सप्टेंबर रोजी अमेरिकेत खेळवला जाणार आहे. मागील वर्षी नीरजने या स्पर्धेमध्ये बाजी मारली होती. तर यंदा देखील त्याने अव्वल ६ भालेफेकपटूंमध्ये डायमंड लीगच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. या सहा अव्वल भालेफेकपटूंमध्ये नीरज हा तिसऱ्या स्थानावर स्थिरावला आहे. सध्या वडलेच पहिल्या स्थानावर असून जर्मनीचा ज्युलियन वेबर हा दुसऱ्या स्थानावर आहे. नीरजला डायमंड लीगमध्ये मोनॅको लेग खेळणं शक्य झालं नाही. याच कारणामुळे तो २३ गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. नीरजशिवाय भारताचा लांब उडीपटू मुरली श्रीशंकर याने डायमंड लीगच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. त्याने ७.९९ मीटरची उडी मारुन त्याचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -