मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांवर लाठीचार्ज झाल्याच्या घटनेचे पडसाद धुळे-सोलापूर महामार्गावर उमटले. मराठा आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर धुळे-सोलापूर महामार्गावर शुक्रवारी काही वाहनांची जाळपोळ करण्यात आली.
जालन्यातील शहागड येथे मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी मराठा जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी राज्य सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी अल्टीमेटम दिला होता. पण आरक्षणाबाबत राज्य सरकारने कोणताही ठोस निर्णय न घेतल्याने आंदोलनकर्त्यांनी अखेर अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरू केले होते. जोपर्यंत राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला होता. त्यात आज्ञात समाज कंटकांनी दगडफेक केली. त्यात काही पोलीस अधिकारी, कर्मचारी, महीला कर्मचारी आणि गावकरी देखील जखमी झाले.
दरम्यान पोलिसांनी आंदोलकांवर लाठी चार्ज केल्याने महिला आंदोलक जखमी झाल्याचे दिसून येत आहे. तर आंदोलकांच्या दगडफेकीमध्ये पोलीस कर्मचारी तसेच महिला पोलीस जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. वडीगोद्री महामार्गावर आंदोलकांच्या वतीने दोन बस जाळण्यात आल्या असून बसेसवर दगडफेक करण्यात आली आहे. तसेच एक ट्रक सुद्धा जाळण्यात आल्याची प्राथमिक माहिती आहे. औरंगाबाद-सोलापूर महामार्गावर तीन ते चार बसेसची जाळपोळ करण्यात आली आहे.