
ब्लॅकमेल केलं जात असल्याचा घरच्यांचा आरोप
घाटकोपर : ठाकरे गटाच्या (Thackeray Group) माजी नगरसेवकाबद्दल एक अत्यंत खळबळजनक वृत्त समोर आले आहे. घाटकोपरमधील ठाकरे गटाचे माजी विभागप्रमुख सुधीर मोरे (Sudhir More) यांनी काल लोकलखाली आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी सुधीर मोरे यांच्या घरच्यांनी त्यांना ब्लॅकमेल केलं जात असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, ही आत्महत्या असल्याचे स्पष्ट न झाल्याने कुर्ला पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
काल रात्री कामानिमित्त जात असल्याचे सांगून त्यांनी घाटकोपर आणि विद्याविहार दरम्यान असलेल्या पुलाखाली ट्रॅकवर झोपून आत्महत्या केली असल्याचा संशय आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या आत्महत्येमागे अनेक धागेदोरे असण्याची शक्यता आहे, ज्याचा पोलीस शोध घेत आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे सुधीर मोरे यांच्या निकटवर्तीयांनी त्यांना ब्लॅकमेल केलं जात असल्याचा आरोप केला आहे.
सुधीर मोरे यांच्या निकटवर्तीयांचा असा संशय आहे की गेल्या काही महिन्यांपासून त्यांना कोणीतरी ब्लॅकमेल करत होतं. दोन महिन्यांपूर्वीच आपल्या भावाकडे व मित्रांकडे काही कॉल रेकॉर्डस करण्यासाठी सुधीर मोरे यांनी एक वेगळा मोबाईल मागितला होता. त्याच अनुषंगाने त्यांच्या घरच्यांनी पोलिसांना कॉल रेकॉर्डस तपासण्याची विनंती केली आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या एक धाडसी कार्यकर्त्याने असे पाऊल उचलल्याने हा ठाकरे गटासाठी प्रचंड मोठा धक्का आहे.