Friday, February 7, 2025
Homeताज्या घडामोडीEknath Shinde : ‘हयात’मध्ये जमल्या होत्या भ्रष्टाचाऱ्यांच्या टोळ्या

Eknath Shinde : ‘हयात’मध्ये जमल्या होत्या भ्रष्टाचाऱ्यांच्या टोळ्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘इंडिया आघाडी’वर घणाघात

नरेंद्र मोदींसमोर यांचा टिकाव लागणार नाही…

महायुतीचा ‘मिशन -४८’ संकल्प मेळावा

मुंबई : ‘ज्यांनी हयातभर निव्वळ भ्रष्टाचार केला, त्यांच्या टोळ्या शुक्रवारी ‘हयात’मध्ये जमल्या होत्या. ते सर्व दमलेले आणि विस्थापित नेते आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले ‘इंडिया आघाडी’चे हे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काय आरोप करतील, असा खडा सवाल करतानाच हे लोक मोदींवर जितके आरोप करतील तितकीच देशातील जनता मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील’, असा ठाम विश्वास शिवसेना नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. कोणाच्याही बापाचा बाप आला तरीही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देणार नाही, अशी गर्जना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

मुंबईतील वरळी येथे आयोजित महायुतीच्या ‘मिशन-४८’ या महासंकल्प मेळाव्यात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, भारती पवार, भागवत कराड, मंत्री चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे – पाटील, गुलाबराव पाटील, सुरेश खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, उदयनराजे भोसले, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर, कपिल पाटील, भावना गवळी, आनंदराव अडसूळ, रामदास कदम, महादेव जानकर, विनय कोरे, सदाभाऊ खोत, जोगेंद्र कवाडे, नरहरी झिरवळ, आमदार रवी राणा यांच्यासह महायुतीचे सर्व आमदार, खासदार, ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मेळाव्यात उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आधीच गॅसवर असलेली मोदीविरोधकांची आघाडी ही ‘इंडिया’ नव्हे तर ‘इंडी’ आघाडी आहे. या आघाडीत भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले नेते आहेत. त्याउलट पंतप्रधान मोदी यांची जगभरात कीर्ती आहे. गेल्या ६० वर्षांत जे झाले नाही, ते मोदी यांनी नऊ वर्षांत करून दाखविले. देश भ्रष्टाचारमुक्त करण्याचे काम त्यांनी केले. मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचा डाग नाही. त्यामुळेच हे भ्रष्टाचारी लोक मोदी यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, मोदी यांच्यावर कितीही आरोप लावले तरीही विरोधकांची डाळ शिजणार नाही. २०२४ मध्ये मोदी पुन्हा विजयी होतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. विरोधकांची अवस्था ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी झाली आहे. त्यांना आपल्या आघाडीचा लोगो सुद्धा फायनल करता आला नाही. त्यांच्यात एकमत कसे होईल, असा सवाल शिंदे यांनी केला. विरोधकांच्या आरोपाला आम्ही कामाने उत्तर देणार आहोत.

‘इंडी’ची झाली भेंडी आघाडी : देवेंद्र फडणवीस

इंडिया आघाडीमध्ये अनेक पक्ष एकत्र आले पण त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? यावर अजूनही एकमत होऊ शकलेले नाही. त्यामुळे ‘इंडी आघाडी’ची भेंडी आघाडी झाली असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ते म्हणाले की, इंडिया आघाडीत पंतप्रधानपदासाठी अरविंद केजरीवाल, नितीशकुमार अशी अनेक नावे आहेत. राहुल गांधी यांना तर कोणी पंतप्रधानपदाचे उमेदवार मानतच नाहीत. निवडणूक एकत्र लढविण्यावर देखील त्यांचे एकमत होऊ शकले नाही. आघाडीत शक्यतो आम्ही एकत्र लढू असे बोलले जात आहे. त्यामुळे इंडीची भेंडी आघाडी झाली आहे. त्यांचा लोगो तयार होऊ शकला नाही. हयातमध्ये येऊन त्यांनी बिर्याणी खाण्याचा आनंद घेतला. तिथले वातावरण बघितले. आघाडीत काहीही होऊ शकत नसल्याने ते आता परत जाणार आहेत, अशी टीका त्यांनी केली. आमच्या एनडीएचा विकासाचा अजेंडा आहे. दीनदलित, गोरगरीब, महिला, आदिवासी सर्वांच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. नरेंद्र मोदी यांनी गेल्या ९ वर्षांत केलेल्या कामांमुळे भारतातील अतिगरिबी कमी झाली, असे युनायटेड नेशन मॉनेटरी फंडने म्हटले आहे. जगातील प्रगत देशांना जे जमले नाही, ते भारताने चांद्रयान-३ मोहीम यशस्वी करून दाखविली. त्यामुळे जपानमध्ये आपल्या शास्त्रज्ञांचे कौतुक सुरू असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. महायुतीमध्ये एकत्र आलेले भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘फेव्हिकॉल का जोड हैं टूटेगा नही’ असा डायलॉग त्यांनी मारला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -