
आज होणार का निर्णय?
मुंबई : आगामी निवडणुकीत भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी देशातील २८ विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आघाडी (Opposition Parties Alliance) स्थापन केली आहे. आज त्यांच्या मुंबईतील (Mumbai) बैठकीचा दुसरा दिवस असून सकाळी १० ते २ या वेळेत ही बैठक पार पडते आहे. आजच्या बैठकीत या आघाडीच्या संयोजक पदाचा (Coordinator) चेहरा ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या पदासाठी अंतर्गत धुसफूस चालू असल्याचे चित्र आहे. शिवाय आधी आघाडीत २६ पक्ष होते. मात्र दोन पक्षांच्या समावेशामुळे विरोधकांच्या आघाडीच्या लोगोचे आज होणारे अनावरणही पुढे ढकलण्यात आले आहे.
विरोधकांच्या आघाडीच्या संयोजक पदावरुन काँग्रेस पक्ष (Congress) मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांच्या नावासाठी आग्रही असल्याचं पाहायला मिळत आहे. खर्गे हे काँग्रेसचे वरिष्ठ नेते आहेत व एक दलित चेहराही आहेत. त्यामुळे देशभरातील दलित मतं आपल्या बाजूनं वळवण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांना संयोजक करावं, त्यांचा राजकीय अनुभव या आघाडीसाठी महत्त्वाचा ठरेल, असं काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचं मत आहे. तर दुसरीकडे काँग्रेसनं संयोजक पद न घेता मोठं मन दाखवावं, असं कम्युनिस्ट पक्ष आणि इतर काही पक्षांचं म्हणणं आहे.
सगळ्यांनाच व्हायचंय संयोजक
महत्त्वाची बाब म्हणजे, इंडिया आघाडीच्या संयोजक पदासाठी शरद पवार (Sharad Pawar) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यात रस्सीखेच सुरु आहे. तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांचीही नावं चर्चेत आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे संयोजक पदासाठी हट्टाला पेटले आहेत. तर, ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शरद पवारांची मनधरणी करत आहेत.
या नेत्यांचं नेमकं म्हणणं काय आहे?
दरम्यान, संयोजक पदी अशी एखादी व्यक्ती असावी, जिच्यावर टीका करणं भाजपसाठी सोपं नसेल, असं सर्वपक्षीयांचं मत असल्याची माहिती मिळत आहे. नितीश कुमार यांनीच सर्व विरोधी पक्षांची एकजूट करण्यासाठी प्रयत्न सुरू केला होता. त्यामुळे मल्लिकार्जुन खर्गे यांचं नाव या स्पर्धेत असताना आणि काँग्रेसकडून आग्रह केला जात असताना, आघाडीतील अन्य नेत्यांचं नेमकं काय म्हणणं आहे? हे सुद्धा ऐकून घ्यावं लागणार आहे. दरम्यान, असं कोडं समोर असताना मुंबईतील इंडिया बैठकीमध्ये संयोजक पदाचं नाव जाहीर केलं जाणार की आणखी वेळ घेतला जाणार? हे पाहावं लागेल.