Saturday, July 13, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखदुष्काळाचे सावट सरकारची गतिमानता

दुष्काळाचे सावट सरकारची गतिमानता

ऑगस्ट महिना संपला. या महिन्यात महाराष्ट्रात काही ठरावीक दिवस आणि ठरावीक भाग वगळता पाऊसच पडला नाही. संपूर्ण ऑगस्ट महिना कोरडा गेला असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यामुळे जुलै महिन्यात ज्या पावसाने तारले होते, त्याच पावसामुळे ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांना मरणयातना सहन कराव्या लागल्या, अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. खरं तर गेल्या महिन्यात म्हणजे जुलै महिन्यात चांगला पाऊस बरसला म्हणून अनेक शेतकऱ्यांनी पिकांना वरखते दिली. पेरणी वेळी दिलेल्या खतांमुळे आणि वरखतांमुळे पिकांची जलद गतीने आणि लवकरात लवकर वाढ होईल अशी भोळीभाबडी आशा शेतकऱ्यांना वाटत होती. पण आता शेतकरी आभाळाकडे डोळे वर करून बसला आहे. गेल्या महिन्यात काही भागांत ढगाळ हवामान असल्यामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाल्याने महागड्या फवारण्या देखील केल्या होत्या. मात्र ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला असल्याने महागड्या औषधांचा आणि खतांचा खर्च वाया जाण्याची भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. सध्या पिकांनी माना टेकल्या आहेत. अनेक भागांतील पिके करपून गेली आहेत.

पुढील काही दिवसांत पाऊस झाला नाही तर पेरणीसाठी केलेला हजारो रुपयांचा खर्च तसेच औषधांचा आणि खतांचा खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्याला आता सतावू लागली आहे, तर काही भागांतील आताच पिके हाताबाहेर गेली आहेत. तर काही ठिकाणी पिकांची राखरांगोळी झाली आहे. ज्या भागात पाऊस नाही तिथे दुष्काळासारखी परिस्थिती पाहायला मिळत आहे. अजूनही राज्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा तयार झालेला नाही. विहिरींत पाणी उतरलेले नाही, अनेक भागांतील विहिरींनी पावसाळ्यात तळ गाठला आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील ऐरणीवर येण्याची शक्यता नाकारत येत नाही.

जनावरांच्या चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी देखील शेतकऱ्यांना वण-वण भटकावे लागणार आहे, हे कदाचित पुढील काळातील विदारक चित्र असू शकते. त्यामुळे, आता बाकी राहिलेल्या मान्सूनच्या दीड महिन्यांच्या काळात तरी चांगला पाऊस पडावा, अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे. अशातच पुढील तीन-चार दिवसांत राज्यात हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नवीन हवामान अंदाजानुसार, राज्यातील पश्चिम महाराष्ट्र विभागातील अहमदनगर, पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या सहा जिल्ह्यांत २ सप्टेंबरपर्यंत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. या संबंधित भागात ०.५ ते १.५ मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच, कोकण विभागातील सिधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यांत देखील हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच मराठवाडा विभागातील धाराशिव, हिंगोली, बीड, संभाजी नगर, जालना, परभणी आणि नांदेड या जिल्ह्यांमध्येही हलका पाऊस पडणार असा अंदाज नुकताच वर्तवला आहे. या अंदाजानुसार राज्यात नजीकच्या काळात कुठेच मुसळधार पाऊस पडणार नाही असे यावरून स्पष्ट होत आहे.

पाणीटंचाई, दुष्काळ हे चित्र महाराष्ट्रासाठी नवे नाही.राज्याला १९७२च्या दुष्काळाने होरपळून टाकले. त्यानंतर तब्बल ४० वर्षे मोठा, जवळपास संपूर्ण राज्याला कवेत घेणारा दुष्काळ पडला नव्हता. ढोबळमानाने मराठवाड्यातील आठ जिल्हे, नगर, सोलापूर, पश्चिम विदर्भासह सातारा, सांगली, पुणे जिल्ह्यांचा काही भाग दुष्काळी पट्ट्यात, अर्थात पर्जन्यछायेत येतो. १९७२ नंतर राज्यातील या पट्ट्यातील काही भागांत पाणीटंचाईची स्थिती निर्माण होत असे, मात्र या संपूर्ण पट्ट्याला एकाचवेळी अवर्षणाची स्थिती निर्माण होत नसे. त्यामुळे मोठ्या दुष्काळाशी दोन हात करण्याची वेळ महाराष्ट्रावर १९७२ नंतर आली नव्हती. त्यानंतर २०१२ मध्ये, सन २०१५ आणि सन २०१८ मध्ये महाराष्ट्राकडे पावसाने पाठ फिरविली.

राज्यातील बहुताश भागांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. १९७२ मध्ये पावसातील तूट ३२ टक्क्यांपासून ५७ टक्क्यांपर्यंत होती. २०१२ मध्ये राज्यात वार्षिक सरासरीच्या ८९ टक्के पाऊस पडला. मात्र विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग आदी ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी होते. हा दुष्काळ महाराष्ट्राबरोबर मध्य प्रदेश, गुजरात, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांनीही अनुभवला. त्यानंतर २०१५ मध्येही पावसाने पाठ फिरविली. राज्यातील २३ जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आणि मोठ्या दुष्काळाचा सामना करावा लागता होता.

दुष्काळग्रस्त स्थितीचा अंदाज राज्य सरकारला आल्यानंतर महाराष्ट्रातील कोणत्याही भागातील शेतकरी अडचणीत असेल तर त्याला तत्काळ मदत व्हावी यासाठी वॉर रूम निर्माण करत आहेत; परंतु त्याचबरोबर जनतेला कशी मदत मिळेल याचा विचार करायला हवा. संकटाच्या परिस्थितीत लोकांना जगवले पाहिजे. त्यांना कामे दिली पाहिजेत. पशुधन वाचवले पाहिजे. पशुधनासाठी चारा दिला पाहिजे. शेतकऱ्यांना गाई, म्हशी पुरवल्या पाहिजेत. त्यानंतर पिण्याचे पाणी पुरवले पाहिजे. शेतकरी आणि कष्टकऱ्यांकडून जी वित्तीय संस्थांकडून वसुली केली जाते, त्याला माफी दिली पाहिजे. कर्जातून सूट दिली पाहिजे. कर्जाचे दीर्घ हप्ते केले पाहिजेत. हे सर्व करायला हवे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयात वॉर रूम उभारण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केलीच आहे. आता गतिमान पावले उचलणे महत्त्वाचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. पावसावर काहीही भासवलं गेलय. की रण गडहिंग्लजमध्ये मुळातच जास्त पाऊस पडत असतय

Comments are closed.

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -