
- समर्थ कृपा : विलास खानोलकर
अक्कलकोटात श्रीमहाराजांचे वास्तव्य असतेवेळी श्रीमंत मालोजीराजे भोसले हे संस्थानचे राजे होते. कोल्हापूरजवळील संकेश्वरपीठाचे जगद्गुरू श्रीशंकराचार्य हे फिरत फिरत अक्कलकोटी आले. श्रीमंत मालोजीराजे यांनी जगद्गुरूची सर्व व्यवस्था योग्य रीतीने ठेवली होती. जगद्गुरूंच्या जेवणाच्या पंक्तीस मोठमोठे विद्वान पंडित, ज्योतिषी व ब्राह्मण आले होते. जगद्गुरूस उत्तम सिंहासनावर बसवून त्यांची षोडपोचारे पूजन व आदर-सत्कार करून मोठ्या थाटाने भोजनाचे पात्रे वाढली. हा समारंभ पाहण्यासाठी श्री स्वामी समर्थांची स्वारी चोळाप्पांसह राजवाड्यात आली. त्याठिकाणी महाराजांच्या आगमनाची कोणीही दखल घेतली नाही की त्यांना कोणीही आसन दिले नाही; परंतु त्यात एक वृद्ध ब्राह्मण होते. त्यांनी श्रींना हातस धरून पाटावर बसविले.
सोवळ्या-ओवळ्याचा विधीनिषेध नसणाऱ्या जातीपातीच्या मर्यादा न पाळणाऱ्या श्रीमहाराजांना पाहून उपस्थितांमध्ये कुजबुज सुरू झाली. श्री स्वामींस भोजनास पंक्तीस न बसवता वेगळे बसवावे, अशी तक्रार उपस्थितांनी केली. जगद्गुरूंनी त्या तक्रारीकडे फारसे लक्ष दिले नाही. पण जेव्हा आदर-सत्कारात गुंतलेल्या श्री शंकराचार्यांचे क्षणभर श्रीस्वामी महाराजांकडे लक्ष गेले, तसे श्रींचे अलौकिक तेज पाहून ते चकित झाले. तरी आदर-सत्काराच्या गडबडीत श्रीस्वामी महाराजांची दखल घेण्याचे त्यांचेकडून राहून गेले. संकल्प सुटण्याची वेळ झाली. सर्व ब्राह्मण भोजनास बसले. तो काय की पक्वानांनी वाढलेल्या रौप्य व सुवर्णपात्रात अन्नाऐवजी कृमीकीटक कुजबुजू लागले. तसे आचार्य व सर्व उपस्थित ब्राह्मणवृंद चकित झाला, ‘हे अदभूत काय झाले?’ असे हे तेथील वृद्ध ब्राह्मणांस विचारू लागले. त्या ब्राह्मणाने सांगितले, की, ‘प्रत्यक्ष श्रीयतिवर्य श्री दत्तात्रय स्वामी महाराजांचा अनादर झाला आहे.’ हे एकून आचार्य सिंहासनावरून उठून श्री स्वामी महाजांसमोर येऊन उभे राहिले व अत्यंत विनम्रपणे श्रीस्वामी महाराजांना प्रार्थना केली की, ‘महाराज अपराधाची क्षमा करावी. आपण खरे जगद्गुरू आहात. आम्ही अधिकारमदाने भुलून आपला भयंकर अपराध केला आहे. आता आपण क्षमा करून सिंहासनावर विराजमान व्हावे.’ धर्मरक्षणाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे, त्या शंकराचार्यांनी आपली मर्यादा सोडून वागावे, याची स्पष्ट नाराजी श्रीस्वामी महाराजांनी व्यक्त केली आणि शिव्यांचा भडिमार करीत म्हणाले, ‘आम्ही संन्यासी भ्रष्ट आहोत; परंतु आपल्याबरोबरच्या तीन शास्त्रांचे उत्पत्ती महमंद यवनापासून आहे. आपण धर्म संस्थापक जगद्गुरू आहात. अशा दुष्ट लोकांस पंक्तीस बसविले?’ हे श्रींचे भाषण ऐकून शास्त्रांनी आपल्या माना खाली घातल्या श्रीस्वामी महाराजांचे चरण धरले व सर्वांनी क्षमा मागितली.
जगद्गुरूंनी श्रीस्वामी महाराजांना आपल्या जागी सिंहासनावर विराजमान केले व त्यांची यथासांग षोडषोपचारे पूजा केली आणि त्यांचा यथोयोग्य आदर-सत्कार केला. त्यानंतर भोजनपात्रात वळवळणारे कृमीकीटक नाहीसे होऊन पूर्ववत अन्न दिसू लागले व भोजने यथास्थित पार पाडली. त्यानंतर तांबुल-दक्षिणा ग्रहण केल्यावर, अभिमानरहित होऊन श्रीस्वामी महाराजांचे चरण वंदून करून सर्व मंडळी आपापल्या सदनी गेली. त्यानंतर जेव्हा श्रीमत् जगद्गुरू आपल्या शिष्यांसह स्वस्थानी परत जावयास निघाले, तेव्हा संस्थानातील मालोजीराजे, सरदार मानकरी, अक्कलकोट निवासी नगरजन आणि समस्थ श्रीब्रह्मवृंद त्यांना निरोप द्यावयास आले. तेव्हा त्या सर्वांस स्वहस्ते प्रसाद देऊन शांत गंभीर आवाजात सर्वांस श्रीस्वामी महाराजांची महती पटवून देताना त्यांनी सांगितले, ‘तुमच्या राजधानीत अलौकिक अशी साक्षात पुरुषोत्तम परमेश्वर अद्वितीय इश्वरातारी मूर्ती आहे. त्याला मनुष्यदेह जरी धारण केलेला असला तरी हे मनुष्य मुळीच नाहीत, त्यांचा छळ करून नका. त्यांचा अनादर करू नका. त्यांच्या आश्रयाखाली राहणे, त्यांची भक्ती करणे व त्यांवर श्रद्धा आणि प्रेम करणे हेच कल्याणप्रद आहे. हे अवश्य लक्षात असू द्या.’
शंकराचार्य ब्राह्मणगुरू; स्वामीसमर्थ जगद्गुरू
शंकराचार्य महाराज की जय
शंकराचार्य महाराज की जय॥१॥
असा सर्वत्र झाहला जय जयकार
मालोजीरावांचाही झाला जयजयकार॥२॥
ब्राम्हणासहित वाजत गाजत आले
शंकराचार्य वाजत गाजत पधारले॥३॥
अनेक सरदार अनेक सुभेदार
देशोदेशीचे विद्वान चमकदार॥४॥
हजारो मंडळी जमली अक्कलकोटी
त्यात नव्हते फक्त स्वामी अनंतकोटी॥५॥
भालदार चोपदार स्वागतास उभे
महाराजे स्वत राजदरबारी उभे॥६॥
भरगच्च स्वागत झाले साऱ्यांचे
मानमरातब नजराणे दिले साऱ्यांचे॥७॥
कानोकानी कळता बातमी
स्वामींना कळली बित्तंबातमी॥८॥
स्वामीही शंकराचार्याच्या दर्शनास आले
पण स्वागत नाही झाले॥९॥
कोण कोठले ते स्वामी बैरागी
कुठून आले ते वेगळेच वैरागी॥१०॥
नाही माहीत गाव जन्म
कोणात्या ब्राम्हाणासी ते संलग्न॥११॥
त्यांची केली व्यवस्था वेगळी
ब्राह्मणांनी त्यांची काढली कागाळी॥१२॥
स्वामीचे स्थान पाट वेगळे
स्वामींचे भक्तहृदयात स्थानचे वेगळे॥१३॥
स्वामी गेले सारे समजून
स्वामी गेले मनातले उमजून॥१४॥
स्वामींचा केला नाही आदर
नाही शंकराचार्यांनी केला सत्कार॥१५॥
राजानेही केले कार्य चुकार
स्वामींच्या स्वागतास दिला नकार॥१६॥
ब्राह्मणांचा केला सत्कार
अप्रत्यक्ष स्वामींचा धुत्कार॥१७॥
साऱ्यांना श्रीखंड मेजवानीचे ताट
स्वामींना साध्या वरणभाताचे ताट॥१८॥
त्यात सुकी पोळी साधेच ताट
नाही बसायला मानाचा पाट॥१९॥
शंकराचार्यांवर फुलांची बरसात
स्वामींवर अपमानाची बरसात॥२०॥
सर्वांना वाढले पंचपक्वानाचे ताट
स्वामींना पिठल्या भाकरीचे ताट ॥२१॥
शंकराचार्याना सोन्याचे ताट
उच्च ब्राह्मणांना चांदिचे ताट ॥२२॥
बसायला चंदनाचा पाट
भरपूर केला चांगला थाट ॥२३॥
साऱ्यांचे वाढले पंचपक्वान ताट
स्वामी मात्र मनाने ताठ॥२४॥
स्वामींच्या मनात अपमानाचा थयथयाट
हात वरकरूनी ज्वलंत नजरेचा पाट ॥२५॥
त्वरीत मंडपात झाली चुळबुळ
राजवाड्यात झाली चुळबुळ चुळबुळ॥२६॥
साऱ्यांच्या जेवणाच्या ताटात दिसले किडे
जेवणारे झाले तेथेच वाकडे॥२७॥
साऱ्यांची तोंडे झाली काळी
अनेकांची पडली दात कवळी॥२८॥
शंकराचार्यांवर पडली सावली
तेज हरपून क्षणात बेरंगी चवली॥२९॥
चांदीचे ताट लोखंडी भासले
सोन्याचे ताट पितळीचे वाटले॥३०॥
साऱ्यांच्या जेवणात सुरवंट किडे
साऱ्यांचे जेवण तेथल्या तेथे अडे॥३१॥
मग साधुपुरुष वदले
स्वामींना नाही तुम्ही वंदिले॥३२॥
त्यांचाच मोठा खरा मान
त्यांच्याच केला अपमान॥३३॥
त्यांनाच जा शरण
चुकेल लज्जेचे मरण॥३५॥
शंकराचार्य, राजे, उठले
स्वामींसमोर शरण वाकले॥३५॥
स्वामी आम्हा करा माफ
स्वामी आम्ही केले पाप॥३६॥
सारे भक्तजण वाकले
स्वामींनाच शरण गेले॥३७॥
स्वामींनी म्हणता तथास्तू
जेवणातील कीडे, सुववंट गतास्तू॥३८॥
सारे झाले पुन्हा अतिसुंदर
स्वामींचा आशिर्वाद जीवन सुंदर ॥३९॥
गुरुजनहो म्हणा दिनरात स्वामी समर्थ
अमर विलास म्हणे तोच करेल तुम्हा समर्थ ॥४0॥
असा जगप्रसिद्ध अक्कलकोटी स्वामी
विलास बोले श्रेष्ठच जगात स्वामी ॥४१॥
vilaskhanolkardo@gmail. com