Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीINDIA Alliance : ऐनवेळी पंतप्रधानपदासाठी शरद पवारांचे नाव चर्चेत!

INDIA Alliance : ऐनवेळी पंतप्रधानपदासाठी शरद पवारांचे नाव चर्चेत!

मल्लिकार्जून खर्गेंना मागे टाकत ‘इंडिया’ची धुरा शरद पवारांच्या हाती येणार?

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट कोण भिडणार? यावर विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या (INDIA Alliance) नेत्यांमध्ये चलबिचल सुरु होती. मात्र काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फक्त आरोपच नाहीतर चौकशी करावी, असे खुले आव्हान राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिल्यानंतर आता विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या  संयोजक पदासाठी अखेरच्या क्षणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचे नाव मागे पडून राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे नाव चर्चेत आले आहे. इतकेच नव्हे तर शरद पवार हेच इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील अशी चर्चा आता सुरू आहे. शरद पवार यांचे सर्वपक्षीयांशी असलेल्या सलोख्याच्या संबंधांचा फायदा आघाडीला व्हावा, असा होरा यामागे असल्याचे सांगितले जात आहे. शरद पवार यांचे नाव चर्चेत आल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईत आज आणि उद्या मुंबईत पार पडणार आहे. यासाठी देशभरातील जवळपास २६ पक्षांचे प्रमुख नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. यावेळच्या बैठकीत लोगो अनावरण, जागा वाटप आणि संयोजक पदाबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

संयोजक पदासाठी यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांचे नाव आघाडीवर होते. त्यांच्याच पुढाकारातून इंडिया आघाडी आकारास आल्याचे दिसून आले. त्यांच्या नेतृत्वात पाटणामध्ये आघाडीची पहिली बैठक पार पडली होती. मात्र त्यांनी हे पद स्विकारण्यास नकार दिला. त्यानंतर मल्लिकार्जून खर्गे यांचे नाव पुढे आले. काँग्रेस हा आघाडीतील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळेच त्याच पक्षाकडे संयोजक पद असावे अशी काही पक्षांची भूमिका आहे. मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सारख्या काही नेत्यांचा खर्गेंच्या नावाला विरोध आहे.

याच सर्व घडामोडींनंतर शरद पवार यांचे नाव ऐनवेळी चर्चेत आले आहे. पवार यांचे इंडिया आघाडीतील सर्वच पक्षांशी सलोख्याचे संबंध आहेत. या संबंधाचा फायदा आघाडीतील समन्वयासाठी होईल असा काही नेत्यांचा होरा आहे. त्यामुळे पवार यांचे नाव अंतिम होण्याची शक्यता आहे. मात्र ते सध्या त्यांच्या पक्षातील फूट आणि महाराष्ट्रात पक्ष बांधणीच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत. त्यामुळे ते हे पद स्विकारणार का? आणि स्विकारल्यास ते या पदाला न्याय देऊ शकतील का? अशा अनेक प्रश्नांचा भडिमार केला जात असून राजकीय वर्तूळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -