
काँग्रेसच्या पत्रावळ्या उबाठाचे सैनिक उचलत आहेत
आशिष शेलार यांची आजच्या विरोधकांच्या बैठकीवर जहरी टीका
मुंबई : मुंबईत आज विरोधी पक्षांच्या आघाडीची बैठक (Opposition Parties) पार पडते आहे. या बैठकीमध्ये २८ पक्षांचे जवळ जवळ ६३ नेते येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कोट्यवधींचा खर्च करुन ही नेतेमंडळी दोन दिवस बैठक करणार आहेत. यावर भाजप नेत्यांनी टीकास्त्र उपसले आहे. 'मुंबईमध्ये घमंडी २८ पक्षांचा पोरखेळ सुरु आहे. हे डरपोक एकटे भाजपचा सामना करूच शकत नाहीत. एकाची कोणाची हिंमत नाही', असा जोरदार हल्लाबोल मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी केला आहे.
आशिष शेलार म्हणाले की, आज पत्रकार परिषद घ्यायची वेळ येत आहे, हे मुंबई आणि महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. उद्धव ठाकरेंच्या विरोधकांच्या आघाडीत कोणा एकट्याचं नेतृत्व नाही, या वक्तव्यावर आशिष शेलार यांनी टीका केली. पंतप्रधानपदी एकच उमेदवार निवडू शकत नाही, याची मान्यता देऊन निवडणुकीला जाता येतं का? की घरात बसून राजकारण करण्याची सवय झाल्यामुळे वतनदारी आणि सरंजामशाही प्रमाणे प्रत्येक विभागाला वेगळा पंतप्रधान अशी त्यांची कल्पना आहे का? असे सवाल शेलार यांनी उपस्थित केले. जगाचं नेतृत्व करायला निघालेला भारत देश, त्या देशाच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बालिश आणि पोरखेळपणाचं वक्तव्य केलं जातं, म्हणून हा पोरखेळच आहे, अशी जहरी टीका त्यांनी केली आहे.
पुढे ते म्हणाले की, राहुल गांधी यांच्या पायातल्या चपला उचलण्याचे काम उबाठाचे सैनिक करत आहेत. बाळासाहेबांची शिवसेना भाजप सोबत आहे. जे भ्रष्टाचारी आहेत ते आज राहुल गांधींसोबत आहेत. तर संजय राऊत हे मराठी विरोधी आहेत. मूर्खांच्या नंदनवनात जगणारे लोक म्हणजे उबाठा आणि काँग्रेस, अशी खरमरीत टीका त्यांनी केली आहे.
जनाची नाही किमान मनाची तरी...
ज्यांनी लिखित आणि डझनवारीवेळा बोलून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला, ज्यांचा आयुष्यभर बाळासाहेबांनी द्वेष केला ती मंडळी येत आहेत आणि त्यांच्या पत्रावळ्या उबाठाचे सैनिक उचलत आहेत. ही सगळी महाराष्ट्रद्वेषी मंडळी आज एकत्र येत आहेत आणि त्यांच्या पंगती व त्यांच्या पत्रावळ्या करण्याचं काम शरद पवारांचा पक्ष व उद्धव ठाकरेंचा पक्ष करत आहे. किमान जनाची नाही मनाची तरी..., अशा प्रकारे वाक्य पूर्ण न करताच शेलारांनी विरोधकांची चांगलीच हवा काढली आहे.
परिवार वाचवण्यासाठीचा पोरखेळ
सोनिया गांधी राहुल यांना वाचवण्यासाठी, उद्धव ठाकरे आदित्यला वाचवण्यासाठी, शरद पवार सुप्रियाला वाचवण्यासाठी, मुलायम सिंह यादव अखिलेशला वाचवण्यासाठी, असा परिवार वाचवण्यासाठीच हे खेळ खेळत आहेत. भाजप जनतेला वाचवण्यासाठी पुढे येत आहे, असं शेलार म्हणाले. त्यांनी २८ पक्षांना तुमचा नेता कोण? तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण? याचं उत्तर थेट द्यावं असं आवाहन केलं आहे.
२६/११ च्या हल्ल्यावर उद्धवजींची भूमिका काय?
महाराष्ट्रात आम्ही ४५ च्या पुढे जागा येणार यासाठी कामाला लागलो आहोत आणि मुंबईकर तुम्हा २८ पक्षांना चले जाव म्हणत आहोत. कारण, २६/११ ला जो हल्ला झाला तो सर्व रिपोर्ट युपीए सरकारकडे होता, तरी हल्ला झाला. उद्धवजी याचं उत्तर देतील का? उद्धवजी यावर तुमची भूमिका काय? असा सवाल शेलारांनी उपस्थित केला आहे. त्याचबरोबर कलम ३०७ ला विरोध करणारे मेहबुबा यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात, म्हणून मुंबईकरांसोबत आम्ही तुम्हाला चले जाव म्हणत आहोत असंही पुढे शेलार म्हणाले. तसेच भाजपतर्फे राहुल गांधी यांचा निषेध करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.