
- गजानन महाराज : प्रवीण पांडे, अकोला
श्री गजानन महाराजांचा तुकाराम शेगोकर नावाचा शेगावचा एक भक्त होता. हा कृषिकर्म (शेतीचे काम) करीत असे.घरची परिस्थिती गरीब होती. दिवसभर शेतात काम करून सायंकाळी तुकाराम मठात महाराजांच्या दर्शनाला येत असे. श्री महाराजांचे दर्शन घ्यावे, कधी महाराजांना चिलिम भरून द्यावी, थोडावेळ मठात बसावे, मग घरी जावे असा याचा नित्यक्रम होता. म्हणतात ना जे जे दैवात असेल, ते ते घडून येते. असा दैवाचा घाला या तुकारामावर आला. एके दिवशी सूर्योदयाच्या वेळी तुकाराम शेतात शेकत बसला असताना एक शिकारी ससे किंवा इतर प्राण्यांची शिकार करण्याकरिता छऱ्यांची बंदूक घेऊन तिकडे आला. तुकारामाच्या मागे कुपाटीजवळ (कुंपणाजवळ) एक ससा बसलेला त्या शिकाऱ्याला दिसला. त्याने लगेच त्या सश्यावर नेम धरून बंदूक झाडली. ससा मेला. पण या गडबडीत बंदुकीचा एक छर्रा तुकारामाच्या कानामागे लागला. हा छर्रा त्याच्या कानामागून मस्तकात शिरला. डॉक्टरांनी अनेक प्रयत्न केले. पण छर्रा काही निघेना. तो छर्रा मस्तकाताच रुतून बसला असल्यामुळे तुकारामास अत्यंत वेदना होऊ लागल्या. त्यामुळे त्याचे डोके अत्यंत दुखू लागले. त्यापायी त्याला झोप सुद्धा लागत नव्हती. अनेक नवस-सायास केले. पण काही गुण आला नाही. भक्तांची महाराजांवर निष्ठा कशी असावी बघा. अश्याही अवस्थेत या तुकारामाने नित्य मठात महाराजांच्या दर्शनाला येण्याचा नेम चुकविला नाही.
मठात येऊन श्री महाराजांचे दर्शन घ्यावे. कधी महाराजांना चिलीम भरून द्यावी. थोडावेळ मठात बसावे मग घरी जावे. एक दिवस श्रींचा एक भक्त तुकारामाला असे बोलला : डॉक्टर वैद्य सोडा आता। साधूचीया सेवेपरता। नाही उपाय कोणता। उत्तम या जगामध्ये॥१४०॥ कृपा त्यांची झाल्यास। चुकेल हा तुझा त्रास। झाडीत जा आसपास। या मठाच्या नित्य तू॥१४१॥ तेंव्हा सेवाही घडेल। पुण्य तेही लाभेल। कृपा झाल्या होशील। त्रासापासून मोकळा॥ १४२॥ मात्र आपुल्या पित्यापरी। दंभिकतेने हे न करी। शुद्ध भाव अंतरी। सर्वकाळ धरावा॥ १४३॥ ते तुकारामासी मानवले। झाडणे त्याने सुरू केले। अवघ्या मठास ठेविले। स्वच्छ त्याने आरश्यापरी॥१४४॥
या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे तुकारामांनी मठातही स्वच्छता करण्याची सेवा सुरू केली आणि बघा काय आश्चर्य : ऐसी चौदा वर्षे झाली। तुकारामाची सेवा भली। तई गोष्ट घडून आली। ऐश्या रीती श्रोते हो॥१४५॥ झाडता झाडता कानातून। छर्रा पडला गळून। जैसी का ती भोकरातून। दाबिता सुटे आठोळी॥१४६॥ तैसे साच येथे झाले। छर्रा पडता थांबले। दुखावयाचे मस्तक भले। ऐसा प्रभाव सेवेचा॥१४७॥ ही सेवा झाडण्याची। अखेपर्यंत केली साची। प्रचीतीविण कवणाची। परमार्थी न निष्ठा बसे॥१४८॥ ती एकदा बसल्यावर। मग मात्र होते स्थिर। संतसेवा महाथोर। हे भाविक जाणती॥ १४९॥
या प्रसंगातून हे कळून येते की, संतांनी मनात आणल्यास काहीसुद्धा घडू शकते. पण हे सर्व प्रेमपूर्वक, शुद्ध भावाने आणि निष्ठेने करावे. ज्या तुकारामाच्या मस्तकात छर्रा १४ वर्षे अडकून पडला होता, त्याच्या वेदना तोच जाणे. असे असताना त्याने महाराजांवरील निष्ठा थोडीदेखील कमी होऊ दिली नाही. नित्य महाराजांच्या दर्शनाला येण्यात कोणताही खंड पडू दिला नाही. एवढेच नव्हे, तर मठ आणि आसपासचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवला. छर्रा कानातून गळून पडला तरी तुकारामांनी अखेरपर्यंत ही सेवा अव्याहतपणे सुरू ठेवली. गुरुकृपा निश्चित होते. पण त्यासाठी शिष्यदेखील त्या तोडीचे असावे लागतात. मग तुमच्याजवळ काही का नसे ना. दोन हस्तक, एक मस्तक, विनम्र भाव आणि गुरुवरील श्रद्धा, निष्ठा आणि विश्वास ही त्रयी दृढ असली पाहिजे, एवढे मात्र आवश्यक.
क्रमशः