अर्जुनाच्या मनाची ही तगमग ज्ञानदेव आपल्यापुढे ज्ञानेश्वरीतून चित्रित करतात. अर्जुनाची ही अवस्था समजून घेऊन त्याला समजावणारे श्रीकृष्णही ज्ञानेश्वरीतून साकारतात. या दोघांच्या स्वभावाचे, व्यक्तिमत्त्वाचे पैलू, रंग ज्ञानदेव रंगवतात. त्यामुळे ‘ज्ञानेश्वरी’ एक सुरस नाट्य वाटतं.
कथा, कविता आणि नाटक यांचा त्रिवेणी संगम म्हणजे श्रीज्ञानेश्वरी! मोहाने व्याकूळ झालेला अर्जुन! त्याला समजावू पाहणारे श्रीकृष्ण! अर्जुन हा एक असामान्य वीर, पण तो एक संसारी माणूस! त्यामुळे त्याचं मन लढण्यासाठी माघार घेतं, कारण समोर सगेसोयरे! त्याच्या मनाची ही घालमेल, तगमग ज्ञानदेव आपल्यापुढे चित्रित करतात. अर्जुनाची ही अवस्था समजून घेऊन त्याला समजावणारे श्रीकृष्णही ज्ञानेश्वरीतून साकारतात. या दोघांच्या स्वभावाचे, व्यक्तिमत्त्वाचे पैलू, रंग ज्ञानदेव रंगवतात. त्यामुळे ‘ज्ञानेश्वरी’ एक सुरस नाट्य वाटतं. एकेका प्रसंगाच्या प्रभावी चित्रणातून हे कथानक पुढे सरकू लागतं. मग तो युद्धभूमीवरील शंखनाद असो की, श्रीकृष्णाने सारथी होणं असो किंवा अर्जुनाने दोन्ही सेना न्याहाळणं असो.
ही कथा प्रवाही करत पुढे पुढे नेण्याची किमया ज्ञानदेवांची रसाळ लेखणी करते. कवी म्हणून त्यांच्याविषयी काय बोलावं? साध्या साध्या गोष्टीत ज्याला अर्थ सापडतो, सौंदर्य जाणवतं तो कवी! ज्ञानेश्वर तर या काव्यशक्तीचा कळसच आहेत. अफाट कल्पना, चित्रमय दाखले, सुंदर शब्द, नादमय अक्षरं यांच्या मिलाफातून ज्ञानेश्वरी झाला आहे ‘काव्यग्रंथाचा रावो’ म्हणजे काव्याचा राजा असा ग्रंथ!
कथानकातील प्रसंगांना ज्ञानदेवांच्या परीसस्पर्शाने रसमय केलं आहे. उदाहरणादाखल दुसर्या अध्यायात आलेलं अर्जुनाचं भांबावलेपण, माघार घेणं, त्याविषयी श्रीकृष्णांचं मनोगत पाहूया. त्यात ज्ञानदेव काय सांगतात ते ऐकूया. ‘भगवान आपल्या मनात विचार करतात, या प्रसंगी अर्जुनाने हे काय आरंभिले आहे?’ (ओवी क्र. ८४)
‘ह्याची कोणत्या उपायाने समजूत पटेल? (ओवी क्र. ८५) याविषयी श्रीकृष्ण विचार करू लागले. त्यांचं वर्णन करताना माउली दाखला देतात तो भूतबाधा निवारणारा मांत्रिक किंवा असाध्य रोग दूर करण्यासाठी दिव्य औषधं देणारा वैद्य! किती साजेसे दाखले देतात! पुढे माऊली म्हणतात, मग श्रीकृष्णांनी रोषयुक्त भाषणास आरंभ केला. ज्याप्रमाणे आईच्या रागात गुप्तरूपाने स्नेह असतो. (ओवी क्र. ८७) किंवा कडू औषधाच्या आत अमृतासारखी गोडी असते, ती वरून दिसत नाही, तिचा परिणाम दिसतो. (ओवी क्र. ८९) त्याप्रमाणे वरकरणी रागाने; परंतु आत मायेने भरलेला उपदेश करण्यास श्रीकृष्णांनी आरंभ केला! कीं औषधाचिया कडवटपणीं। जैसी अमृताची पुरवणी।
ते आहाच न दिसे परी गुणीं। प्रकट होय॥ ओवी क्र. ८९.
ज्ञानदेव या दाखल्यातून श्रीकृष्ण-अर्जुन नात्याला रंग देतात. कसं आहे हे नातं? तर आई व मूल! हे नातं म्हणजे प्रेमाची परिसीमा! ज्याप्रमाणे आई मुलावर रागावते, पण अंतरंगात मुलाच्या कल्याणाची कळकळ असते. तीच तळमळ श्रीकृष्णांच्या ठिकाणी ज्ञानदेव दाखवतात. तसंच अर्जुनाला कृष्णांविषयी वाटणारी माया, जिव्हाळाही साकारतात. ते जणू मनाच्या रंगमंचावर हे भावनारंग मांडतात. म्हणून ‘ज्ञानेश्वरी’ वाचताना नाटक पाहिल्याचा आनंद मिळतो, तर ‘औषधाचिया कडवटपणीं। जैसी अमृताची पुरवणी’ यासारख्या सुंदर दृष्टान्तातून लयीची शिकवण मिळते. वाचताना ती श्रोत्यांच्या तनात आणि मनात झिरपू लागते. मग भोवतालची सृष्टी तशी दिसू लागते – अपार, अनंत! ‘ज्ञानेश्वरी’च्या भिंगातून!
(manisharaorane196@gmail.com)
मुंबई : पश्चिम रेल्वे शुक्रवारच्या मध्यरात्री वसई रोड आणि वैतरणा दरम्यान रात्रीचा ब्लॉक घेणार आहे.…
उबाठा शिवसेनेचा निर्धार मेळावा नाशिकमध्ये पार पडला, अर्थात हा उबाठा शिवसेनेच्या प्रमुखांच्या भाषणांमध्ये गेल्या तीन-साडेतीन…
मुंबई: वानखेडेच्या मैदानार इंडियन प्रीमियर लीगमधील ३३व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादवर जबरदस्त विजय मिळवला…
देशातील सर्वात लांब रेल्वे बोगद्याचा मार्ग मोकळा डेहराडून : जानसू रेल्वे बोगद्याचे काम ऐतिहासिक असून,देशातील…
पुणे : गेल्या काही दिवसापासून पुण्यात राज्यसेवेची मुख्य परीक्षा ४५ दिवस पुढे ढकलण्यात यावी या…
पुणे : ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीने दिलेल्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. घैसास यांच्यावर…