दोन दिवसांची पोलीस कोठडी
अहमदनगर : सुमारे सहा वर्षांपूर्वी जिल्हा परिषद निवडणुकीच्या काळात घडलेल्या पांगरमल (ता. नगर) (Pangarmal) विषारी दारूकांडाच्या गुन्ह्यात फरार असलेली संशयित आरोपी, जिल्हा परिषदेची माजी सदस्य भाग्यश्री गोविंद मोकाटे (Bhagyashree Mokate) हिला अखेर सहा वर्षानंतर राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (सीआयडी) अटक केली. तिला न्यायालयाने फरार घोषित केले होते. तिला न्यायालयापुढे हजर केले असता तिला दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
सहा वर्षांपूर्वी झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या काळात पांगरमल येथे १४ फेब्रुवारी २०१७ रोजी विषारी दारूचे सेवन केल्याने बारा जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली होती. त्यावेळच्या निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आलेल्या भाग्यश्री मोकाटे हिच्यासह इतरांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात काही आरोपींना अटक झाली.
या सर्व आरोपींविरुद्ध मोक्कानुसार कारवाई करण्यात आली. दरम्यान, या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे देण्यात आला. आरोपी भाग्यश्री मोकाटे ही गुन्हा घडल्यापासून फरार होती. तिने न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, मात्र न्यायालयाने तो फेटाळून लावला. सीआयडीने मोकाटेला अटक करून मोक्का न्यायालयासमोर हजर केले. सीआयडीतर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. सतीश पाटील यांनी बाजू मांडली. पंचायत समितीचे माजी सदस्य गोविंद मोकाटे यांची ती मुलगी आहे. शिवसेनेकडून ती जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आली होती.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra