Tuesday, July 9, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यसुशिक्षित महिला आणि अशिक्षित सासर...

सुशिक्षित महिला आणि अशिक्षित सासर…

फॅमिली काऊन्सलिंग: मीनाक्षी जगदाळे

अजून एक समस्या सीमासमोर होती, ती म्हणजे तिचं राहणीमान, कपडे, फॅशन, ब्युटी पार्लरला जाणं हे घरातील सासू, मोठी जाऊ आणि नणंदेला पसंत नव्हतं. त्यांचं म्हणणं आम्ही कधी आयुष्यात असा वायफळ खर्च केला नाही, तोंडं रंगवली नाहीत, तुला बरं सुचतं हे सगळं. सीमाच्या सांगण्यानुसार तिला बाहेरच्या जगात वावरताना, चार चांगल्या लोकांमध्ये मिसाळताना निटनिटकं राहणं गरजेचे होतं. घरातील इतर महिलांना कधीही मोठे कार्यक्रम, मोठ्या मीटिंग, सभा, संमेलन इत्यादी ठिकाणी जाण्याची वेळच आली नाहीये. त्यामुळे त्यांना ब्युटी पार्लरला का जायचं याचं महत्त्वच पटत नाही. बाहेर वावरताना टापटीप का राहावं लागतं, कपड्यांना इस्त्री का असावी लागते, प्रसंगानुसार कपडे, स्टाईल थोडीफार फॅशन बदलावी लागते हे घरात कोणीही समजावून घेत नाही. रोजच साडी, मोठं मंगळसूत्र, हातभर बांगड्या आणि मोठी टिकली लावून मी सगळ्याच ठिकाणी नाही जाऊ शकत. पण सासू मात्र अपेक्षा करते की सीमाने रोज कायमस्वरूपी घरात आणि बाहेर देखील अशाच प्रकारे राहावं.

प्रत्येक घरातील गृहिणी जशी सर्व सौभाग्य अलंकार परिधान करते तसेच सीमाने वागावं. सीमाचं म्हणणं होतं मला टू व्हिलर चालवताना, बसने, ट्रेनने कामानिमित्त बाहेरगावी प्रवास करताना, धावपळ करताना आरामदायक कपडे बरे वाटतात. सासू म्हणते, आम्ही नववारी साडी घालून पण प्रवास केलेत आणि भाकऱ्या थापल्यात, शेतातील कामं पण साड्या घालूनच केलीत. तुझं भलतंच कौतुक आहे. सीमाला हे सगळं अ‍ॅडजेस्ट करणं अशक्य वाटतं होतं कारण आताच्या काळात, तिचं व्यावसायिक स्वरूप लक्षात घेता तिला असं राहणं आणि वावरणं अजिबात सूट होणारं नव्हतं.

कविता (काल्पनिक नाव) पण शिकलेली. गृहिणी म्हणून राहणारी, तीस वर्षीय महिला. कविताला होत असलेला एक मानसिक त्रासाचा मुद्दा होता तिचं आणि तिच्या नवऱ्याचं बाहेर फिरायला जाणं, हॉटेलिंग करणं तिच्या सासूला अजिबात पसंत नसायचं. सासू स्वतःच्या मुलाला याबाबत काही बोलायची नाही. पण कविताला मात्र तुझ्या मौज-मजेवर, तुझ्या बाहेर खाण्यावर किती पैसा खर्च होतो, तो जरी बाहेर जेवायला चल म्हटला तरी तुला नाही म्हणता येत नाही काय? सासूकडून अशी वक्तव्य ऐकल्यावर कविताला प्रचंड वाईट वाटायचं कारण ती पण चांगल्या घरातील मुलगी होती आणि तिच्या खाण्या-पिण्याच्या खर्चावरून तिला बोलणं तिच्यासाठी खूप अपमानास्पद होतं. घरात पण कविताने काही वेगळा, नवीन, चांगला पदार्थ बनवायला घेतला किंवा बाहेरून काही पार्सल मागवले की, काय चोचले चाललेत खाण्याचे म्हणून तिला सासूमार्फत ऐकवणूक केली जायची.

अशीच परिस्थिती होती राणी (काल्पनिक नाव)ची. इंजिनीरिंगची डिग्री घेतलेली राणी जेव्हा लग्नानंतर सासरी गेली, नोकरीला सुद्धा लागली तेव्हा सासरच्या लोकांनी मुद्दाम कामवाली काढून टाकली, असं तिचं म्हणणं होतं. अतिशय अशिक्षित सासू आणि अडाणी नणंद आहे त्यामुळे माझ्याशी असं वागल्या असं तिचं मत झालं होतं. आम्हाला तुझ्या करिअर वगैरेंचे काही कौतुक नाही, घरातली सगळी कामं करून जे करायचं ते कर असं तिला सांगण्यात आले होते आणि हे सगळं करताना तिची खूप दमछाक होऊ लागली. दोन्ही आघाड्या सांभाळून जगणं तिच्या तब्बेतीला मानवणारं नव्हतं. नवऱ्यापुढे हा विषय मांडला असता, तो म्हणाला जमत नसेल तुला तर नोकरी सोडून दे, पण माझ्या आईने आयुष्यभर खूप कष्ट केलेत, तिला आता काम होत नाही, ती काहीही मदत करणार नाही. कामवाली फक्त माझं लग्न होईपर्यंत एक सोय म्हणून ठेवली होती. आता तू आहेस ना मग कामवालीची गरज नाही. राणीचं म्हणणं होतं मी अतिशय उत्कृष्ट गुण मिळवून उत्तम कॉलेजमधून इंजिनीअर झाले ते घरकाम करण्यासाठी नाही. माझ्या पालकांनी लाखो रुपये खर्च करून मला स्वतःच्या पायावर उभ केलं आहे, मला करिअर महत्त्वाचे आहे. त्यामुळे मला आता या लग्नात जमवून घेणं अशक्य आहे.

नंदा (काल्पनिक नाव) सामाजिक कार्यात अत्यंत रस असलेली. समाजासाठी झटून काम करणारी उच्चशिक्षित विवाहित स्त्री. लहानपणापासून माहेरी सामाजिक वातावरण असल्यामुळे तिच्या रक्तातच सामाजिक बांधिलकी आहे. नंदाच्या लग्नाला सुद्धा दहा-बारा वर्षे झालीत. पण आता तिला घरातील मागासलेल्या मनोवृत्तीचा, कमकुवत बुद्धिमत्ता असलेल्या अडाणी, अशिक्षित, घटस्फोटित नणंदेचा आणि प्रचंड जुन्या विचारसरणीची सासू यांचा भयानक त्रास होऊ लागला आहे, असं ती सांगत होती. तिच्या सामाजिक कार्यक्रमांवर, तिच्या समाजातील, घराबाहेरील विविध उपक्रमांवर या दोघीही सतत टीका करत. लष्कराच्या भाकऱ्या भाजण्यापेक्षा स्वतःचं बघ, स्वतःच्या नवऱ्याकडे लक्ष दे, तुझ्या बाहेर राहण्यामुळे तुझ्या मुलांची जबाबदारी आमच्यावर पडते, त्याला वळण लावणं तुझीच जबाबदारी आहे. स्वतःचा संसार वाऱ्यावर टाकून कशाला बोंबलत लोकांना मदत करत फिरते, सामाजिक कार्य फुकटात करून कोणाचं भलं झालंय, चार पैसे कामविण्याची अक्कल नाही, कशाला नवऱ्याच्या जीवावर समाजसेविका बनते अशी निंदा आणि असभ्य भाषा तिला सतत ऐकावी लागत होती.

जे सामाजिक कार्य तिचं स्वप्न आहे, तिला त्यातून पुढे मोठं व्यक्तिमत्त्व बनायची इच्छा आहे. तिथेच तिला कोणताही पाठिंबा अथवा प्रोत्साहन न देता या दोघी सतत टोचून बोलतात. यामुळे नंदासुद्धा वेगळं होण्याच्या विचारात होती. मला माझ्या कामावरून अपमानित केलेले अजिबात सहन होत नाही, होणार नाही यावर नंदा ठाम होती. यासारखी अनेक उदाहरणे आपल्याला समाजात दिसतात. ज्यामुळे चांगल्या शिकलेल्या महिलांना त्यांच्या बौद्धिक पातळीनुसार सासर न मिळाल्यामुळे, वैचारिक, भावनिक, मानसिक पातळीत खूप तफावत निर्माण होते आणि संसार मोडकळीस येत आहेत. फक्त पती-पत्नीचं सुशिक्षित, डिगऱ्या घेतलेले असून चालत नाही, तर संपूर्ण कुटुंब थोडेफार तरी शिकलेले असणे आज काळाची गरज बनत आहे.

जर तसं नसेल तर ज्यांना शिक्षणाची संधी मिळालेली नाही, जे जुन्या पिढीतील आहेत अथवा स्वतः अज्ञानामुळे शिक्षण सोडून दिलेले आहेत, परिस्थितीअभावी शिकू शकलेले नाहीत अथवा जे किमान पदवीधर पण झालेले नाहीत, अशा सासरच्या लोकांनी आपल्या उच्चशिक्षित सुनेसोबत जुळवून घेण्यासाठी आपली विचारसरणी, आपली वागणूक, आपले व्यक्तिमत्त्व, आपले स्वभाव बदलणे अत्यंत आवश्यक आहे. केवळ आपल्या अडाणीपणामुळे, हेकेखोरपणामुळे, आपल्याला बाहेरील जगातील काहीही माहिती नसूनदेखील सुशिक्षित सुनांना केवळ मानसिक त्रास द्यायचा, कमी लेखायला म्हणून सासुरवास करायला जालं तर ऐका चांगल्या संसाराचा आपण स्वतः नाश करणार आहात हे लक्षात असू द्या. (समाप्त)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -