
कोविड घोटाळा प्रकरण भोवणार; न्यायालयाचा दिलासा नाहीच...
मुंबई : कोविड काळात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सरकारने केलेला सगळा भ्रष्ट कारभार आता बाहेर येऊ लागला आहे. ईडीने चौकशीचा सपाटा लावला असून ठाकरे गटाच्या नेत्यांची यात पोलखोल होत आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच ठाकरे गटाच्या मोठ्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बॉडी बॅग (Body Bag) खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात त्या आता आणखी अडचणीत सापडल्या आहेत. याचं कारण म्हणजे त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळून लावला आहे.
किशोरी पेडणेकर यांना मुंबई सत्र न्यायालयानं दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला. अटकेपासून संरक्षण मिळावं यासाठीचा त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळून लावला. त्यामुळं पेडणेकरांच्या डोक्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. या प्रकरणात त्यांच्यासह ठेकेदार कंपनी असलेल्या वेदांताच्या संचालकांचाही समावेश आहे. दरम्यान, पेडणेकर यांच्यासह वेदांतानं देखील अटकपूर्व जामिनासाठी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. पण त्यांचा अर्ज देखील कोर्टानं फेटाळून लावला.
माजी महापौरांनी काय घोटाळा केला?
ईडीच्या सूचनेनुसार मुंबईत मृत कोविड रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग १,५०० रुपयांऐवजी ६८०० रुपयांना तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप आहे. कोविड काळात किशोरी पेडणेकर याच मुंबईच्या महापौर होत्या. त्यामुळे हा घोटाळा पेडणेकरांच्या सूचनेनुसार करण्यात आल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे.