Monday, July 22, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यराष्ट्रीय सेवा भारती

राष्ट्रीय सेवा भारती

सेवाव्रती: शिबानी जोशी

देशातल्या पीडित, वंचित, गरीब नागरिकांच्या शिक्षण, आरोग्य, सामाजिक न्याय तसेच स्वावलंबन यासाठी वेगवेगळ्या प्रकल्पांच्या माध्यमातून तसेच समर्पित कार्यकर्त्यांच्या सहभागातून सुदृढ, समरस समाज निर्माण करणे या उद्देशाने संघाचे कार्यकर्ते विविध संस्थामार्फत उपक्रम राबवतात. या सर्व संस्थांची एक अपेक्स बॉडी किंवा अम्ब्रेला म्हणून २००३ पासून राष्ट्रीय सेवा भारती ही संस्था कार्यरत झाली. त्यानंतर या संघटनेचा देशाच्या सर्व राज्यांत विविध ठिकाणी शाखा विस्तार झाला. राष्ट्रीय सेवा भारती ही संघटना ८ डिसेंबर २००३ रोजी नोंदणीकृत झाली. आज देशभरात विविध १२४६ संस्था, संघटना राष्ट्रीय सेवा भारतीशी संबंधित असून एक दुसऱ्याच्या सहकार्याने देशभरात सेवाकार्य करायला सेवा भारती त्यांना मदत करत आहे.

राष्ट्रीय विचाराच्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था आणि समर्पित कार्यकर्त्यांच्या सामूहिक प्रयत्नातून देशातील पीडित, वंचित आणि गरीब नागरिकांना शिक्षित करणे, स्वावलंबी बनवणे आणि संस्कारक्षम समाज निर्मिती होण्यासाठी अनेक सामाजिक संस्था, संघटना, छात्रावास, रुग्णालय चालवत आहेत. या सर्व संस्थांना, कार्यकर्त्याना प्रशिक्षित करण्यासाठी मदत करणं हा राष्ट्रीय सेवा भारतीचा उद्देश आहे. राष्ट्रीय सेवा भारती जागरण, सहयोग, प्रशिक्षण आणि अध्ययन या चार आयामांवर भर देऊन समाजाला उन्नत करण्याचे प्रयत्न करणाऱ्या संस्थांना मार्गदर्शन करते. थोडक्यात देशभरात काम करणाऱ्या संस्थांची एक अम्ब्रेला म्हणून तिचं काम चालतं. ‘trained the trainer’ म्हणता येईल, अशा धर्तीवर भारतीच्या कामाचे एक रूप आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांसाठी विविध प्रशिक्षण कार्यक्रम सेवा भरती आयोजित करत असते. २००३ या स्थापना वर्षापासूनच राष्ट्रीय सेवा भारतीने सामाजिक संस्थांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक अध्ययनावर आधारित प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले. उदा. छात्रावासासाठी किंवा मातृछाया प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांसाठी ‘कपॅसिटी बिल्डिंग’ व्हाव यासाठी प्रशिक्षण घेऊन अनेक कार्यकर्ते कुशल झाले असून त्यांच्यात गुणात्मक वृद्धीही झाली आहे. प्रशिक्षणाबरोबरच विविध प्रकाराचं साहित्य ही प्रकाशित केले जाते. सध्या राष्ट्रीय सेवा भारतीचे प्रमुख पन्नालालजी आहेत.

राष्ट्रीय सेवा भरती ज्या प्रमुख चार मुद्द्यांवर काम करते त्यातील पहिला मुद्दा आहे जागरण म्हणजेच जागरूकता. याअंतर्गत विविध मासिकांचे प्रकाशन केले जाते. तसेच सेवा साधना नावाचा वार्षिक अंकही काढला जातो. ‘सेवा दिशा’ या अंकाचं पाच वर्षांतून एकदा, तर सेवापुंज या अंकामध्ये विविध संस्था संघटनांच्या यशस्वी आणि प्रेरक प्रयोगांची माहिती प्रकाशित केली जाते. तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल सामग्रीसुद्धा प्रकाशित केली जाते. देशातल्या प्रत्येक राज्यात सेवा भारतीची प्रांत रचना आहे. या सर्व प्रांतामधील समविचारी संस्थांना एकत्रित आणून वेळोवेळी ‘सेवा संगम’ या मंचाचे आयोजन केले जाते. तसेच दर पाच वर्षांनी ‘राष्ट्रीय सेवा संगम’ आयोजित केला जातो.

राष्ट्रीय सेवा भारतीचा दुसरा आयाम आहे अध्ययन. या अंतर्गत देशभरात निर्माण झालेल्या किंवा होत असलेल्या विविध सामाजिक समस्याच अध्ययन केल जाते. उदाहरणच द्यायचं झालं, तर ईशान्येकडील राज्यातील बरेचसे विद्यार्थी इतर राज्यातील छात्रावासांमध्ये राहायला जातात. त्यांचं शिक्षण पूर्ण झालं की, त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात तसेच त्यांच्या माध्यमातून त्यांच्या गावात झालेल्या परिवर्तनाचा अभ्यास केला गेला होता. नवी दिल्ली येथे २०१७ साली महिलांसाठी एक प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी १५ ते ३५ वयोगटातील महिलांच्या सद्यस्थितीवर आधारित अभ्यास करण्यासाठी व्यावहारिक प्रशिक्षण देण्यात आले होते. गेल्या काही वर्षापासून देशातल्या विविध भागांत पूर, दुष्काळ, भूकंप, मुसळधार पाऊस, वादळ अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती येण्याचे प्रमाण वाढू लागले आहे ते पाहता ‘आपत्ती व्यवस्थापन’ हा देखील एक महत्त्वाचा आयाम राष्ट्रीय सेवा भारतीतर्फे आता राबवला जातोय.

एखाद्या ठिकाणी नैसर्गिक आपत्ती ओढवली, तर त्वरित अनेक संस्था सक्रिय होऊन त्या ठिकाणी काम करत असतात. काही वर्षांपूर्वी नेपाळमध्ये आलेला भूकंप तसेच आसाममध्ये आलेले वादळ आणि पुरामुळे खूप नुकसान झालं होतं. त्या ठिकाणी सेवा भारतीच्या अनेक संस्थांनी मदत केली होती. नेपाळमध्ये एके ठिकाणी शाळा बांधण्यासाठी चार कोटी रुपयांची मदत दिली गेली होती. केरळमध्ये आलेल्या पुरामुळे नुकसान झालेल्या लोकांना घर बांधून देण्यात आली होती. काही वेळा त्या भागातल्या सरकारी अधिकाऱ्यांसोबत विचारमंथन करूनही गरज असेल, तिथे मदत केली जाते तसेच त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घेतला जातो. त्याशिवाय देशभरात सुरू असलेल्या स्वयंसहायता गटांना एकत्रित आणून त्यांनाही अधिक सबळ करण्याचं काम केलं जाते. नवीन प्रकल्प सुरू करणाऱ्या तसेच आधीचे प्रकल्प प्रभावीरित्या राबवण्यासाठी वैभव श्री पत्रिका तयार करण्यात आली होती.

आजपर्यंत देशातल्या २३ प्रांतांमध्ये वैभव श्री प्रकल्प चालू आहेत. सेवा भारतीचा आणखी एक महत्त्वाचा आयाम म्हणजे प्रशिक्षण. याअंतर्गत कार्यकर्ता तसेच विविध संस्थांच्या प्रतिनिधींना प्रशिक्षण देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. हे प्रशिक्षण वर्ग देशभरात वेळोवेळी आयोजित केले जातात. प्रशिक्षणात दुसरा महत्त्वपूर्ण मुद्दा असतो तो म्हणजे कॉपोरेट सोशल रिस्पाँसीबिलिटी म्हणजेच सी. एस.आर. संबधीचे प्रशिक्षण. मोठमोठ्या कंपन्या, बँका यांच्याकडून चांगल्या सेवा प्रकल्पांना आर्थिक मदत मिळू शकते. त्यासाठी हे प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जातात. अशा रीतीने जागरण, सहयोग, अध्ययन, प्रशिक्षण हे चार आयाम केंद्रिभूत धरून सेवा भारती देशभरात सामाजिक उत्थानाच कार्य करत आहे. संघटनेच्या नावातच ‘सेवा’ हा शब्द आहे. त्यामुळे सेवेचं व्रत घेऊन सेवा करणाऱ्या सर्व संस्थाना सहाय्य करणे यासाठी राष्ट्रीय सेवा भारतीचे काम सुरू आहे.

joshishibani@yahoo. com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -