
भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : भारतीय रेल्वे (Indian Railway) म्हणजे भारतीयांची जीवनवाहिनी. अतिशय स्वस्त दरात अख्खा भारतप्रवास जरी करायचा असेल तरी सामान्य माणसाला रेल्वेचा जनरल कोच (General Coach) सहज परवडण्यासारखा आहे. म्हणूनच की काय रेल्वेमध्ये गर्दीही प्रचंड असते. जनरल कोचमध्ये वाढणारी ही गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. यानुसार एखाद्या ट्रेनमधील स्लीपर कोचमध्ये (Sleeper coach) प्रवासी संख्या कमी असल्यास त्या कोचचे रुपांतर जनरल कोचमध्ये करण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाकडून २१ ऑगस्ट रोजी देण्यात आले आहेत.
भारतीय रेल्वेमध्ये जनरल डब्यापासून ते फर्स्ट एसी (1 tier AC) ते डब्यापर्यंत सुविधा आहेत. प्रत्येक प्रवासी आपल्याला परवडणाऱ्या डब्याने प्रवास करतात. या प्रत्येक कोचची रेल्वेने एक क्षमता ठरवून दिलेली आहे. मात्र जनरल कोचच्या तिकिटासाठी कोणतीही मर्यादा नाही. जोपर्यंत ट्रेन सुटत नाही तोपर्यंत जनरल कोचचे तिकिट दिले जाते. त्यामुळ जनरल कोचमध्ये कायम गर्दी पाहायला मिळते. रेल्वे मंत्रालयाच्या झोनल ऑथरिटीने दिलेल्या माहितीनुसार जनरल डब्यावर येणारा प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषत: दिवसा धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये हा प्लॅन लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
रेल्वेच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानुसार ज्या ट्रेनच्या स्लीपर कोचमधील प्रवाशांची संख्या कमी असेल त्या कोचला जनरल कोचमध्ये बदलण्याची शिफारस करण्यात येणार आहे. या निर्णयाचा मुख्य उद्देश रेल्वेला अतिरिक्त महसूल मिळावा आणि लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सुविधा मिळाव्यात हा आहे. प्रवाशांचा प्रवास आरामदायी आणि सुखकर करण्यासठी भारतीय रेल्वेने हे पाऊल उचलले आहे.
कोणत्या कोचची किती क्षमता?
रेल्वेच्या फर्स्ट क्लास एसी कोचमध्ये १८ ते २४ जणांना, सेकंड क्लास एसी मध्ये ४८ ते ५४, थर्ड एसीमध्ये ६४ ते ७२, स्लीपरमध्ये ७२ ते ८० आणि जनरल कोचमध्ये ९० जणांना प्रवास करण्याची सुविधा असते. मात्र जनरल कोचमध्ये १८० हून अधिक प्रवासी प्रवास करतात. जनरल कोचमधील वाढत्या गर्दीचे कारण थ्री टायर एसी कोचची संख्या हे देखील आहे. रेल्वेने जास्त फायदा मिळवण्यासाठी थ्री टायर एसी कोचची संख्या वाढवली आहे. जनरल कोचच्या तुलनेत थ्री टायर एसी कोचमधून रेल्वेला जास्त महसूल मिळतो.