
बाली : इंडोनेशियामध्ये आज सकाळी सकाळी भूकंपाचे जोरदार झटके बसले. इंडोनेशियाची राजधानी बालीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. ज्यामुळे लोक भयभीत जाले. या भूकंपाची तीव्रता ७.० रिश्टर स्केल इतकी होती. युरोपीय-भूमध्यसागरीय भूकंप विज्ञान केंद्राच्या हवाल्याने रॉयटर्सने ही माहिती दिली.
हा भूकंप इतका तीव्र होता की घरातील सर्व गोष्टी हलू लागल्या आणि लोकांनी आपल्या घरातून पळ काढला. दरम्यान, या भूकंपामध्ये किती नुकसान झाले आहे याची माहिती मिळू शकलेली नाही. मात्र ज्या तीव्रतेचा भूकंपाचा धक्का होता त्यावरून जिवितहानीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ईएमएससीच्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र इंडोनेशियाच्या मातरम येथून २०१ किमी उत्तरेला आणि पृथ्वीच्या पृष्ठभागापासून ५१८ किमी खाली होते. अमेरिकन भूवैज्ञानिक सर्वेक्षणानुसार या भूकंपाची तीव्रता ७.१ इतकी होती.
याआधी भारताच्या छत्तीसगडमधील उत्तर क्षेत्र सरगुजा जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी उशिरा भूकंपाचे हलके धक्के जाणवले होते. मात्र या घटनेत कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाल्याची माहिती नाही.