
चंद्रकांत पाटील यांचे आदेश
मुंबई : दहावी - बारावीच्या परीक्षेत (HSC-SSC Exam) नापास झालेल्या, कमी गुण मिळालेल्या तसेच आपल्या गुणांच्या श्रेणीत सुधारणा करण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पुरवणी परीक्षेचे आयोजन केले जाते. मात्र, या परिक्षेचा निकाल लागल्यानंतर पुढील पदवीच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण होतो. हीच प्रवेश प्रक्रिया सुरळीत होण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आदेश जारी केले आहेत. यानुसार बारावी पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला आता पदवीला प्रवेश मिळणार आहे. राज्यातील सर्व विद्यापीठांना पदवीच्या रिक्त जागांवर प्रवेश देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी आदेश जारी केले आहेत.
बारावी पुरवणी परीक्षेचा ऑनलाईन निकाल काल जाहीर झाला. त्यामुळे पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना आपल्या विद्यापीठांतर्गत संलग्नित महाविद्यालयामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम (विधी, बीएड व बीपीएड वगळून) आणि पारंपरिक अभ्यासक्रमाकरिता (कला, विज्ञान व वाणिज्य विद्याशाखा) प्रवेश मिळावा आणि कोणताही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असा आदेश चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे.
तसेच या सर्व विद्यार्थ्यांच्या बाबतीत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार १८० शैक्षणिक दिवस भरतील याची दक्षता सर्व अकृषि विद्यापीठांनी घ्यावी, अशी विनंती देखील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.