नितेश राणे यांचा खडा सवाल
मुंबई : अयोध्येला तयार होणाऱ्या राम मंदिराविषयी (Ayodhya Ram mandir) ठाकरे गटाचे संजय राऊत (Sanjay Raut) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) वारंवार विरोधी विधाने करत आहेत. यावर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे पाकिस्तानी एजंट आहेत का? असा खडा सवाल भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उपस्थित केला आहे. अनेक मुद्दे उपस्थित करत त्यांनी या दोघांना पुन्हा चपराक लगावली आहे.
नितेश राणे म्हणाले, काही दिवसांपासून संजय राजाराम राऊत असो किंवा उद्धव ठाकरे असो, हे दोघेही पाकिस्तानी एजंट आहेत का, असा प्रश्न पडायला लागला आहे. याचं कारण म्हणजे ज्या राम मंदिरासाठी पूर्ण भारत आतुरतेने वाट पाहत आहे आणि २०२४ च्या सुरुवातीलाच देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणावर रामभक्त अयोध्येकडे जाणार आहेत, त्यावर हे दोघेही सातत्याने तिथे जात असताना दंगली भडकू शकतात, रामभक्तांवर हल्ले होऊ शकतात, अशा प्रकारची विधाने करत आहेत. जेव्हा हज यात्रेला मोठ्या प्रमाणात मुस्लिम बांधव जातात, तेव्हा अशा कुठल्याही प्रकारची विधानं ना संजय राऊत करत ना त्याचा मालक उद्धव ठाकरे करत. पण हिंदू सण आले किंवा हिंदूंच्या आयुष्यामध्ये एक मोठा क्षण राम मंदिराच्या निमित्ताने अनुभवायला मिळत असेल तेव्हाच या लोकांना दंगली भडकवण्याची भीती निर्माण करायची आहे.
पुढे ते म्हणाले, उद्धव ठाकरेंचा इतिहास हा दंगली भडकवण्याचाच आहे. २००४ ला झालेल्या ज्या बैठकीबद्दल मी वारंवार उल्लेख करतो की मातोश्रीमध्ये बैठक झाली आणि मुंबईमध्ये दंगली भडकवा, असे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले, त्या बैठकीसंदर्भात आजपर्यंत कोणीही मला टोकलेलं नाही, असं नितेश राणे म्हणाले.
उद्धव ठाकरेंच्या निकटवर्तीयांची झाली होती चौकशी
आपल्याला आठवत असेल की काही वर्षांअगोदर उद्धव ठाकरेंचे खासगी संजीव नार्वेकर आणि नीलम गोर्हेताईंची पुणे पोलिसांनी चौकशी केली होती. कारण मिळालेल्या कॉल रेकॉर्डिंग्जनुसार पुण्यामध्ये दंगली भडकवण्याचा संशय त्यांच्यावर होता. काही महिन्यांअगोदर खासदार धैर्यशील माने यांनी हाही उल्लेख केला की काही वर्षांपूर्वी जेव्हा सांगलीत दंगल घडली तेव्हा त्याच्यामागे संजय राऊतचा हात होता.
दंगलीची माहिती सरकारी यंत्रणेला द्यावी
संजय राऊत हे खासदार आहेत, उद्धव ठाकरे हे आमदार आहेत आणि एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदार भारतीय नागरिक म्हणून अगर भारताच्या विरोधात कुठलाही कट कोणी रचत असेल, भारताची शांतता बिघडवण्याची अथवा दंगली भडकवण्याची माहिती कुठल्या नागरिकाकडे असेल तर त्याने ती संबंधित पोलीस यंत्रणेला द्यावी, अशी एक जबाबदारी नागरिक म्हणून आपल्या अंगावर असते. म्हणून उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत यांच्याकडे राम मंदिराकडे जाताना दंगल होणार आहे, यासंबंधी कुठलीही माहिती असेल तर त्यांनी ती त्वरित सरकारी यंत्रणेला द्यायला हवी, असं नितेश राणे म्हणाले.
मी पत्राद्वारे सरकारला विनंती करणार
मीही स्वतः एटीएसला (ATS) पत्र लिहिणार आहे की, उद्धव ठाकरे व संजय राऊत यांची सखोल चौकशी करा आणि गरज असेल तर नार्को टेस्ट करा अशी मागणी करणार आहे. त्यांच्याकडे नेमकी काय माहिती आहे ती गोळा करुन अशा पद्धतीचा कोणताही दंगल घडवण्याचा प्रकार होणार असेल, तर तो थांबवण्याची विनंती या पत्राद्वारे मी सरकारला करणार आहे, असं नितेश राणे म्हणाले.