Sunday, July 7, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखShivshakti, Nehru and Modi : शिवशक्ती, नेहरू आणि मोदी

Shivshakti, Nehru and Modi : शिवशक्ती, नेहरू आणि मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देशाने चांद्रयान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरवून जगात डंका वाजला. त्यावर अनेक देशांनी भारताचे अभिनंदन केले. मोदी यांच्याच कुशल मार्गदर्शनाखाली भारताने चांद्रयान यशस्वीपणे चंद्रावर उतरवले. त्याचा भयानक पोटशूळ काँग्रेसवाल्यांच्या पोटात उठला आहे. विरोधी पक्ष म्हणून त्यांनी कोल्हेकुई चालवली आहे. त्याला काही इलाज नाही. मोदी यांनी चांद्रयान ज्या ठिकाणी उतरले त्या स्थानाचे नामांतर शिवशक्ती असे केल्याने काँग्रेसवाल्यांनी जोरदार टीका केली आहे. मोदी यातही राजकारण करत असल्याचे काँग्रेस प्रवक्ते राशिद अल्वी यांनी म्हटले आहे. पण ही निव्वळ पोटदुखी आहे, हे उघड आहे. मोदी यांनी चांद्रयान ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणाला निदान स्वतःचे नाव तरी दिले नाही. पण अल्वी यांच्या म्हणण्यानुसार मोदी यांनी या प्रकरणी राजकारण करून मताधार निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. पण काँग्रेसला मोदी यांच्यावर आरोप करण्याचा काहीही नैतिक अधिकार उरलेला नाही. कारण पहिले चांद्रयान जेव्हा चंद्रावर स्पर्श केला होता, ते साल होते २००८. त्यावेळी काँग्रेसची सत्ता होती आणि त्या ठिकाणाला काँग्रेस सरकारने जवाहर प़ॉइंट असे नाव दिले होते. त्या काँग्रेसला मोदी यांच्या या शिवशक्ती या नामकरणाबद्दल टीका करण्याचा कोणताच अधिकार पोहोचत नाही. अल्वी यांना विचारले असता ते म्हणतात की, पंडित नेहरूंनीच इस्रो स्थापन केली होती. मोदी यांना चांद्रयानाचे श्रेय मिळत असल्याचे पाहून पोटदुखी अनावर झालेल्या एका वयोवृद्ध नेत्यानेही असाच सूर काढला होता. पण इस्रोच्या स्थापनेचे श्रेय नेहरूंना द्यायचे तर मग चीनकडून भारताचा जो अपमानास्पद पराभव १९६२ मध्ये नेहरूंच्या भोळसट हिंदी चिनी भाई भाई या घोषणेमुळे झाला, त्याचे दानही नेहरूंच्या पदरात टाकले पाहिजे. नेहरू यांचे जीवलग मित्र होते कृष्णमेनन. यांच्याबद्दल जितके कमी लिहिता येईल तितके ते बरेच आहे. हे मेनन महाशय नेहरूंच्या पुस्तकांची रॉयल्टी वगैरे मिळवायचे. कृष्णमेनन यांच्यामुळेच चीनकडून भारताला नामुष्कीजनक पराभव पत्करावा लागला. इतिहासात घडलेल्या चांगल्या गोष्टींचे श्रेय नेहरू यांना द्यायचे, तर इतिहासात घडलेल्या चुकांचे मापही त्यांच्या पदरात टाकले पाहिजे. कृष्णमेनन यांच्या बेफाट कार्यशैलीमुळे मग नेहरूंना जोरदार टीका सहन करावी लागली. कित्येकांनी त्यांना बदला अशी विनंती नेहरूंना केली होती. पण नेहरूंनी कधीही कारवाई केली नाही. हा इतिहास उकरून काढण्याचे कारण हेच की इतिहासात काँग्रेसने ज्या घोडचुका केल्या, त्यांचे मापही मग नेहरूंच्या पदरात टाकले पाहिजे. काश्मीर प्रश्न युनोत कुणी नेला, तर याचेही उत्तरही नेहरू हेच आहे.

शेख अब्दुल्ला यांच्या अतिप्रेमापोटी नेहरूंनी भारतासमोर कश्मीर ही कायमची समस्या करून ठेवली. तेव्हा नेहरूंच्या काळातील घोडचुकांकडेही काँग्रेसने लक्ष दिले पाहिजे. मग नेहरूंना संसदेत राममनोहर लोहिया यांच्याकडून नेहरूंच्या टकलावर केस उगवत नाहीत तर मग ते टक्कलही चीनला देऊन टाकायचे का, असा सवाल ऐकून घ्यावा लागला होता. त्याला कारण अर्थातच कृष्णमेनन होते. पण नेहरूंनी आपल्या मित्रांना कधीही सोडले नाही. परिणामी त्यांचे राजकीय नुकसान झाले. काँग्रेसला म्हणून मोदी यांच्या कृतीवर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही, असे म्हटले आहे. तसे तर मोदी यांच्या कार्यकाळात भारताने अफाट झेप घेतली आहे. त्याची जंत्री करायची म्हटले तर एक अग्रलेख पुरणार नाही आणि तितकीच जंत्री नेहरूंच्या चुकांचीही देता येईल. मोदी यांच्या कार्यकाळात आता ब्रिक्स परिषदेचा विस्तार झाला आहे. अनेक नवीन देश जोडले जात आहेत आणि तिसरे जग आता आणखी विस्तारत आहे. नेहरूच्या काळात अलिप्त राष्ट्र परिषदेचा विस्तार फारच मर्यादित होता. आता तो कित्येक प्रबल राष्ट्रांना सामावून घेत आहे. नदी जशी उगमापासून निघून अनेक उपनद्या स्वतःमध्ये सामावून घेत विशाल होत जाते, तसेच भारताच्या अलिप्त राष्ट्र परिषदेचे झाले आहे. त्याचे श्रेय मोदी यांना दिले तर काँग्रेससह विरोधकांच्या पोटात का दुखत असते, हा सवाल आहे.

मोदी यांना हटवण्याचे बेत तयार होत आहेत पण काहीही झाले तरीही ते सिद्धीस जात नाहीत. याचे शल्य बाळगूनच सारे विरोधी नेते कायम पोटात गोळा घेऊन जगत असतात. मोदी यांच्या यशाचे विरोधकही समजून चुकले आहेत. यापुढील लोकसभा निवडणुकीतही मोदीच बाजी मारून जाणार, हे त्यांना मनोमन पटले आहे. त्यामुळे कुडमुडे पत्रकार आणि भाटचारण यांच्या बातम्यांवर विश्वासून राहून स्वतःची प्रचार मोहीम चालवणारे सारेच नेते तोंडावर आपटणार आहेत. मोदी यांच्यावर कशासाठी टीका करायची, यासाठी टपून बसलेल्या विरोधकांना मोदी यांनी चांद्रयान उतरलेल्या ठिकाणाला शिवशक्ती हे नाव दिले, हे फुसके निमित्तही पुरले. पण त्यांचीच यात हानी होण्याचा धोका जास्त आहे. वास्तविक राजकीय पक्ष जितके मोदी यांना शिव्या घालतात तितके लोक मोदी यांना मत देतात. हे समजून घेतील त्या दिवशी विरोधकांची अवस्था थोडीतरी नीट होईल. राहुल गांधी यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदी याच्यावर राफेल प्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप केले. पण त्यांची इतकी आणि त्यांच्या पक्षाची इतकी वाताहत झाली की, काँग्रेसला विरोधी नेतेपदावर हक्क सांगण्याइतक्याही जागा मिळाल्या नाहीत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -