- गुंतवणुकीचे साम्राज्य : डॉ. सर्वेश सुहास सोमण
मागील आठवड्यात चांद्रयान -३ चे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी साँफ्ट लॅडिंग करत भारताने अत्यंत अभिमानास्पद कामगिरी केली. दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्व ‘इस्रो’ भारतीय शास्त्रज्ञांचे अभिनंदन आणि त्यांच्या अथक परिश्रम आणि प्रयत्नांना सलाम…
चांद्रयान-३ च्या यशस्वी मोहिमेत अनेक भारतीय कंपन्यांदेखील समाविष्ट होत्या. त्या कोणत्या होत्या? आणि त्यात त्यापैकी मला उत्तम वाटणाऱ्या एका कंपनीचे मूलभूत विश्लेषण पुढील लेखात केले जाईल. तोपर्यंत या लेखात आपण इतर क्षेत्रापैकी असलेल्या एका शेअरचे मूलभूत विश्लेषण करूया.
शेअर बाजारात आज अनेक कंपन्या आहेत. त्यापैकी आरोग्य उत्तम राहण्यासाठी उपयुक्त अशी अन्न उत्पादने बनविणारी आणि या प्रकारच्या क्षेत्रात कार्यरत असणारी कंपनी म्हणजे “झायदस वेलनेस”. आज प्रामुख्याने ‘निके मार्केट’ मध्ये कार्यरत असणारी ही कंपनी आहे. शेअर मार्केटचा उपसंच असलेले मार्केट म्हणजे ‘निके मार्केट’. आपल्या “विशिष्ट उत्पादनातून मार्केट्ची म्हणजेच लोकांची गरज ओळखून ती गरज पूर्ण करणे आणि ती करीत असताना आपल्या उत्पादनाची अतिशय योग्य किंमत ठेवणे ही ‘निके मार्केट’ची ठोबळमानाने व्याख्या करता येईल. शेअर मार्केटच्या या उपसंचामधील या कंपन्या प्रामुख्याने आपल्या कंपनीच्या ‘विशिष्ट उत्पादनावरच’ मोठ्या प्रमाणात भर देत असतात.
या कंपनीचे नाव पूर्वी ‘कार्नेशन नुटरा अॅनालोग फुड्स लिमिटेड’ असे होते. जानेवारी २००९ पासून नाव बदलून “झायदस वेलनेस” असे करण्यात आले. आज ‘झायदस वेलनेस’ ही कंपनी ही निके उत्पादनात कार्यरत असल्यामुळे या कंपनीची उत्पादने आणि त्याचे फायदे याबद्दल लोकांना जाणीव करून देण्यासाठी एकूण उत्पन्नापैकी जवळपास २५ टक्के उत्पन्न ही कंपनी फक्त जाहिरातींवर खर्च करते. आज जवळपास १० हजार करोड रुपये मार्केट कॅपिटल असून कंपनीचा पी. ई. रेशो ३३ आहे. सातत्याने डीव्हिडंट देणाऱ्या या कंपनीच्या उत्पादनांना आज बाजारपेठेत चांगली मागणी आहे.
आज कंपनी शुगर फ्री, स्क्रब, बटर व न्युट्रीशन या तीन निके विभागात कार्यरत आहे. आज भारतातील सर्वाधिक खपला जाणारा कमी कॅलरी स्वीटनेर ब्रँड म्हणजे “शुगर फ्री” आज देखील त्यांचे हे उत्पादन निके मार्केटमध्ये स्वत:ची लीडरशिप पोझिशन टिकवून आहे. याशिवाय या कंपनीच्या एवरयुथ, न्युट्रीलाईट, अॅक्टीलाईफ या उत्पादनांनी देखील स्वत:ची ओळख आज बाजारपेठेत निर्माण केलेली आहे. आज १६१५ रुपये किमतीला “झायदस वेलनेस” कंपनीचे शेअर्स मिळत असून पुढील १० वर्षांचा म्हणजेच दीर्घमुदतीचा विचार करता हा शेअर चांगली वाढ दर्शवू शकतो. त्यामुळे या कंपनीचे शेअर्स पैशाचे योग्य नियोजन करून जर टप्प्याटप्प्याने खरेदी केले तर चांगला फायदा होवू शकेल.
टेक्निकल अॅनालीसीसनुसार शेअर बाजार हा तेजी दर्शवित असून पुढील आठवड्याचा विचार करता निफ्टीची १९००० ही महत्त्वाची पातळी असून जोपर्यंत निर्देशांक या महत्त्वाच्या पातळीच्या वर तोपर्यंत निर्देशांकातील तेजी टिकून राहील. अल्पमुदतीचा विचार करता एफएसएल, बालाजी टेलीफिल्म्स, एचएएल, लार्सेन अँड टुब्रो यासह अनेक शेअर्सची दिशा टेक्निकल अॅनालीसीसनुसार तेजीची असून या शेअर्समध्ये योग्य स्टॉपलॉस लावून तेजीचे व्यवहार केल्यास चांगला फायदा होऊ शकेल. गुंतवणूक करीत असताना आपल्या एकूण भांडवलाचे योग्य नियोजन करून गुंतवणूक करणे आवश्यक असते.
कमोडीटी मार्केटमध्ये टेक्निकल अॅनालीसीसनुसार मध्यम मुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची दिशा तेजीची आहे. जोपर्यंत सोने ५८,००० या पातळीच्या वर आहे, तोपर्यंत सोन्यामधील तेजी कायम राहील. या आठवड्यात चांदी या धातूमध्येदेखील मोठी वाढ झाली. या मोठ्या वाढीनंतर अल्पमुदतीच्या चार्टनुसार चांदीची दिशा आणि गती तेजीची आहे. या काही आठवड्यात कच्चे तेलात घसरण झालेली आहे. मात्र मध्यम मुदतीच्या चार्टनुसार कच्चे तेल अजूनही तेजीत असून कच्च्या तेलात झालेली मंदी ही तेजीची उत्तम संधी आहे. आता जोपर्यंत कच्चे तेल ६४०० च्या वर आहे तोपर्यंत कच्च्या तेलात पुन्हा वाढ होऊ शकते. सध्या कच्च्या तेलात होत असलेली हालचाल पाहता कमीत कमी जोखीम घेऊनच त्यामध्ये ट्रेड करावा. ट्रेड करत असताना स्टॉपलॉसचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे.
(सूचना : लेखकाची तसेच त्यांच्या जवळच्या नातेवाइकांची लेखात सुचवित असलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये कोणतीही गुंतवणूक नाही किंवा सुचविलेल्या कंपन्यांशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून कंपनीकडून कोणतेही मानधन किंवा भेटवस्तू घेतलेली नाही.)
EMAIL ID – [email protected]
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra