Tuesday, July 16, 2024
Homeताज्या घडामोडीHSC-SSC Timetable : दहावी-बारावी परीक्षेच्या तारखा आल्या!

HSC-SSC Timetable : दहावी-बारावी परीक्षेच्या तारखा आल्या!

राज्य शिक्षण मंडळातर्फे संभाव्य वेळापत्रक जाहीर

मुंबई : दहावी-बारावीची (HSC-SSC Exams) परीक्षा म्हटलं की विद्यार्थ्यांच्या पोटात गोळा यायला सुरुवात होते. अशातच निदान परिक्षेच्या तारखा लवकर कळल्या तर अभ्यासाचे नियोजन करणे थोडे सोपे जाते आणि मनावरील ताण कमी होतो. शिवाय शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना देखील अभ्यासक्रमाचे नियोजन करणे सोयीचे होते. याच बाबी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (Maharashtra State Board of Secondary and Higher secondary Education) फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून, तर दहावीचीपरीक्षा १ मार्चपासून सुरू होणार आहे.

राज्य शिक्षण मंडळामार्फत मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमध्ये दहावी- बारावीची लेखी परीक्षा घेण्यात येते. फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये होणाऱ्या परीक्षेचा कालावधी राज्य मंडळाने जाहीर केला आहे. त्यानुसार बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्च २०२४ दरम्यान होणार आहे. तर दहावीची परीक्षा १ ते २२ मार्च २०२४ या कालावधीत आयोजित केली आहे. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर हे वेळापत्रक देण्यात आले आहे.

दरम्यान, फक्त सुविधेकरता संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून त्याच अंतिम तारखा असतील, असं नाही. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा, उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांच्याकडे छापील स्वरूपात देण्यात येणारे वेळापत्रक अंतिम असणार आहे. त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मंडळाने काय सूचना दिल्या आहेत?

अन्य संकेतस्थळावरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेले वेळापत्रक ग्राह्य धरू नये. प्रात्यक्षिक परीक्षा, श्रेणी, तोंडी परीक्षा आणि अन्य विषयांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे परीक्षेपूर्वी मंडळामार्फत शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येईल. या वेळापत्रकांबाबत काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे, तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसाच्या आत लेखी स्वरूपात पाठवाव्यात. त्यानंतर आलेल्या सूचनांवर विचार केला जाणार नाही, असे राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी सांगितले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -