Saturday, July 20, 2024
Homeमहत्वाची बातमीMumbai: मुंबई महानगराला आंतरराष्ट्रीय शाश्वत शहर बनवणार - फडणवीस

Mumbai: मुंबई महानगराला आंतरराष्ट्रीय शाश्वत शहर बनवणार – फडणवीस

मुंबई : मुंबई(mumbai) सुशोभीकरण प्रकल्पातून सुमारे २० हजार चौरस मीटरहून अधिक क्षेत्रावर हरित क्षेत्र फुलवण्यात आले आहे. यासोबत मियावाकी प्रकल्पातून देखील नागरी वन निर्मिती केली जात आहे. आंतरराष्ट्रीय महानगर म्हणून ख्याती असलेल्या मुंबईला आता आंतरराष्ट्रीय शाश्वत महानगर बनवण्यासाठी महाराष्ट्र शासन व महापालिका संयुक्तपणे विविध पायाभूत प्रकल्पांच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहे, असे उद्गार राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) यांनी काढले.

मुंबईत, ए विभागातील कॅप्टन प्रकाश पेठे मार्गावरील सुरक्षा उद्यान आणि मादाम कामा मार्गावरील पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान यांच्या सुशोभीकरण कामांचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी २७ ऑगस्टला सायंकाळी झाले, त्यावेळी ते बोलत होते.

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष तथा स्थानिक आमदार ॲड. राहुल नार्वेकर, कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांची या सोहळ्यास विशेष उपस्थिती होती. अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महापालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू, अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे, उपायुक्त (परिमंडळ १) डॉ. श्रीमती संगीता हसनाळे, ए विभागाचे सहायक आयुक्त श्री. जयदीप मोरे, माजी नगरसेवक . मकरंद नार्वेकर, माजी नगरसेविका श्रीमती हर्षिता नार्वेकर, माजी नगरसेवक आकाश राजपुरोहित यांच्यासह स्थानिक रहिवाशी संघटनांचे पदाधिकारी व अन्य विविध मान्यवर देखील सोहळ्यास उपस्थित होते.

याप्रसंगी जनसमुदायाला संबोधित करताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सुरक्षा उद्यान आणि जवाहरलाल नेहरु उद्यान या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रशासकीय व कायदेशीर संघर्षानंतर दोन्ही जागा महापालिकेला प्राप्त झाल्या आहेत. अल्पावधीतच या दोन्ही उद्यानांचे सुशोभीकरण करुन, हरितक्षेत्र तयार करुन बृहन्मुंबई महपालिकेने चांगली कामगिरी केली आहे. त्यासोबत, या परिसरांमधील वेगवेगळ्या रहिवाशी संघटनांनी, स्थानिक नागरिकांनी देखील या जागा संपादन तसेच त्यांच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहे. रहिवाशी संघटना जागृत असतील तर नेमका कसा विकास साध्य होवू शकतो, हे या दोन्ही उदाहरणांमधून दिसून आले आहे, असे सांगून . फडणवीस यांनी स्थानिक नागरिकांचे कौतुकही केले.

पुढे ते म्हणाले की, मुंबई महानगरामध्ये आता आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेशी पायाभूत सुविधा निर्मिती करतानाच या महानगराला आंतरराष्ट्रीय शाश्वत महानगर बनवायचे आहे. त्यासाठी हरित क्षेत्र निर्मितीवर देखील भर देण्यात येत आहे. मुंबई सुशोभीकरण प्रकल्पातून सुमारे २० हजार चौरस मीटरहून अधिक क्षेत्रावर उद्याने फुलवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे मियावाकी पद्धतीने नागरी वने निर्मिती करण्यात येत आहे. मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचा अंशतः टप्पा तसेच मुंबई पारबंदर प्रकल्प हे दोन्ही वर्षअखेरीस कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत. मेट्रो प्रकल्प पूर्णत्वाकडे सरकत आहेत. वर्सोवा ते विरारपर्यंत किनारी मार्गासाठी जपान सरकारचे सहकार्य मिळणार असून यामुळे कफ परेड ते विरार हा प्रवास भविष्यात अवघ्या ४५ मिनिटांमध्ये पूर्ण होईल, असे आश्वासक उद्गारही फडणवीस यांनी काढले. मुंबई पूरनियंत्रण प्रकल्पासाठी देखील जपान सरकार सहकार्य करणार आहे, असे सांगून मुंबईतील एकूणच जीवनमान सुखकर करण्यासाठी महाराष्ट्र शासन व बृहन्मुंबई महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न सुरु राहतील, त्यास नागरिकांचे सहकार्य आवश्यक आहे, असेही त्यांनी नमूद केले.

महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर म्हणाले की, ए विभाग हा मुंबईतील अतिशय महत्त्वाचा परिसर आहे. केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाच्या कार्यालयांसह राज्याचे तसेच मुंबई महानगराचे मुख्यालय, पुरातन वारसा असणाऱया इमारती, महत्त्वाची व ऐतिहासिक स्थळं, सर्व प्रकारच्या वसाहती असा हा परिसर आहे. या विभागात रहिवाशी लोकसंख्या अवघी १३ लाख इतकी असली तरी दररोज ये-जा करणारी लोकसंख्या तब्बल ४८ लाख इतकी आहे. कुलाबा, कफ परेड सारखा परिसर आता राज्यातच नव्हे तर देशात आदर्श वसाहत म्हणून गणला जाईल, या दिशेने कामे सुरु आहेत, असे नार्वेकर यांनी नमूद केले. सुरक्षा उद्यान व नेहरु उद्यानाच्या संपादन आणि विकासामध्ये स्थानिक रहिवाशी संघटनांचे मोठे पाठबळ लाभले, असे नमूद करुन कुलाबा विधानसभा मतदारसंघातील रहिवाशांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले की, आज लोकार्पण झालेल्या दोन्ही उद्यानांच्या विकास व सुशोभीकरणामध्ये प्रशासनाच्या प्रयत्नांसोबतच रहिवाशांचे समर्पण व सहकार्य उल्लेखनीय राहिले आहे. नागरिक व शासन, प्रशासनाच्या सहकार्यातून या परिसरामध्ये इतरही विकास कामे होत असून ती लवकरच पूर्णत्वास येतील, असे लोढा यांनी नमूद केले.

याप्रसंगी उपआयुक्त (परिमंडळ १) डॉ. संगीता हसनाळे, माजी नगरसेवक . मकरंद नार्वेकर, माजी नगरसेविका श्रीमती हर्षिता नार्वेकर, तसेच नरिमन पॉइंट चर्चगेट सिटीझन्स असोसिएशनचे अतुल कुमार, माय ड्रीम कुलाबा संघटनेचे श्री. घनश्याम हेगडे आदी मान्यवरांची देखील समयोचित भाषणे झाली.

सुरक्षा उद्यान आणि नेहरु उद्यान या दोन्ही ठिकाणी महपालिकेने पदपथ निर्मिती, सुशोभीत विद्युत खांब, विविध वृक्षांची व पुष्प रोपांची लागवड, संरक्षक भिंत बांधणी व सुशोभीकरण, ज्येष्ठ नागरिकांसाठी योगा आदी सुविधा विकसित केल्या आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -