पंढरीनाथचा ‘पॅडी’ कधी झाला ते कळलेच नाही. आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा, युनिव्हर्सिटी युथ फेस्टिव्हलमधून करिअरला सुरुवात झाली. मात्र रंगमंचाचे मूलभूत प्रशिक्षण नव्हते, मग थोरामोठ्यांची काॅपी करता करता, त्याने स्वतःच स्वतःला घडवले. एखाद्याची नक्कल करायची ठरवल्यास त्या व्यक्तीच्या स्वभावातील लकबांचे बारकावे तो प्रथम टिपतो, त्यानुसार मग भावमुद्रांवर काम करणे सोपे जाते, म्हणूनच प्रेक्षकांशी साधलेला भाव-संवाद मनाला भिडतो.
श्रावणसरी सदरातील आजचा पाहुणा आहे, पंढरीनाथ कांबळे! मुलाखतीदरम्यान त्याने बोलायला सुरुवात केली आणि प्रत्येकजण त्याने सांगितलेल्या अनुभवांवर अंतर्मुख होऊन ऐकत तरी होता किंवा हसून दिलखुलास दाद तरी देत होता. अगदी शालेय जीवनापासून रंगकर्मी म्हणून सुरू झालेला त्याचा नाट्यप्रवास आजमितीला सेलिब्रेटी स्टेटसपर्यंत येऊन पोहोचलाय याचे सारे श्रेय त्याच्या अथक परिश्रमांना आहे.
केवळ गाण्याची आवड या गुणामुळे शाळेत गायनाच्या सरांनी घेतलेली परीक्षा आणि त्यात सिद्ध करून दाखवलेली योग्यता त्याला या क्षेत्रात मुशाफिरी करायला कारणीभूत ठरली. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान भाग घेता येईल अशा प्रत्येक करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये पंढरीनाथचा समावेश असे. पंढरीनाथचा ‘पॅडी’ तोवर झाला नव्हता. आंतर महाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा वा युनिव्हर्सिटी युथ फेस्टिव्हल, पॅडीची उपस्थिती ठरलेली असायची. रंगमंचाचे मूलभूत प्रशिक्षण नसल्याने थोरामोठ्यांची काॅपी करता करता, त्याने स्वतःचा अभ्यासक्रम स्वतःच तयार करून त्यात स्वतःच विद्यार्थी बनला. पॅडीच्या आंगिक अभिनयाचा अभ्यास केल्यास असे दिसून येईल की, एखाद्याची नक्कल करायची ठरवल्यास त्या व्यक्तीच्या स्वभावातील लकबांचे बारकावे तो प्रथम टिपतो, त्यानुसार मग त्याला एक्सप्रेशन्सवर (भावमुद्रांवर) काम करणे सोपे जाते आणि म्हणूनच त्याने प्रेक्षकांशी साधलेला भाव-संवाद मनाला भिडत जातो.
पदवी शिक्षण पूर्ण झाल्यावर रंगभूमीसाठी काहीतरी करावे पेक्षा आपण नट म्हणून प्रस्थापित व्हावे या उद्देशाने भरत जाधव, विकास कदम, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, देवेंद्र पेम इत्यादींनी एकत्र येऊन एक हौशी नाट्यसंस्था स्थापन केली. विविध स्पर्धांमधून भाग घेणे व जास्तीत जास्त लोकांसमोर आपले नाट्यगुण मांडणे एवढा साधा सरळ उद्देश यामागे होता. देवेंद्र पेम दिग्दर्शित ‘प्लँचेट’ ही एकांकिका त्यावेळी भरपूर गाजली आणि त्यामुळे पॅडीचा व्यावसायिक नाट्यक्षेत्रात प्रवेश झाला. विनय आपटे यांचे “तुमचा मुलगा करतो काय?” किंवा राजेश देशपांडेचं ‘कु. गंगुबाई नाॅनमॅट्रिक’ या नाटकांनी पॅडी ओळखला जाऊ लागला. दरम्यान मंत्रालयातून आलेल्या शासकीय नोकरीच्या संधीमुळे पुढे नोकरी की, नाटक हा पेच निर्माण झाला. नोकरीवर रुजू झाल्यानंतर नशिबाने चांगल्या अधिकाऱ्यांच्या मेहेरबानीमुळे घरच्या आर्थिक जबाबदारीला पाठबळ मिळाले. ‘कु. गंगुबाई नाॅनमॅट्रिक’ हे नाटक महाराष्ट्रात तुफान गाजलं. यातील ‘च्छू’ची व्यक्तिरेखा प्रचंड लोकप्रिय झाली. आजही इतक्या वर्षांनंतर ‘पॅडी’ याच नावाने ओळखला जातो.
गंगुबाईची पुढे मालिका झाली. मात्र तिला प्रेक्षकांचा अजिबात रिस्पॉन्स न मिळाल्याने बंद पडली. मात्र त्यातील कलावंत घरोघरी पोहोचले. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’, ‘फू बाई फू’ या विनोदी स्किट्सच्या मालिकेची लोकप्रियता वाढवायला ‘पॅडी’ कामी आला. पॅडीमुळे, तर काही स्किट्सना वन्समोअर घ्यावा लागला आणि मग मात्र ‘पॅडी’ सुटला. आज अनेक चित्रपट, टीव्ही मालिका, वेब सीरिज त्याच्या नावावर असूनसुद्धा त्याचे मन रमते ते नाटकातच. सध्या रंगभूमीवर धुमाकूळ घालत असलेल्या ‘कुर्रर्रर्र’ नाटकात पॅडी जोरदार बॅटिंग करतो. विशाखा सुभेदार, प्रसाद खांडेकर व नम्रता संभेराव सारखे तगडे विनोदवीर असताना स्लॅपस्टिक काॅमेडीच्या जोरावर तो आपली खेळी खेळत राहातो.
स्लॅपस्टिक काॅमेडीचा जन्मदाता असलेल्या चार्ली चॅप्लिनकडून प्रेरणा घेऊन मराठीत विजय पाटकरांनी त्या स्टाईलचे अनुकरण केले. मात्र एवढ्या गॅपनंतर अशा विनोदी लकबीचा अभिनयासाठी वापर करणारा पॅडीशिवाय दुसरा कुणी आढळत नाही. ‘कुर्रर्रर्र’मध्ये दोन-तीन वेळा, तर चक्क पोटावरून स्लाईड होताना पॅडी प्रेक्षागार डोक्यावर घेतो.
अतिशयोक्ती विनोदाचं हमखास आणि खणखणीत नाणं म्हणजे ‘पॅडी’. टीव्ही मालिका करण्याबद्दल चौफेर ताकदीचे नट तसे नाखूषच असतात. कारण कोणतीही मालिका थोडीफार प्रेक्षकप्रिय झाली तरी कमीत कमी एक वर्ष ठिय्या धरून बसलेली असतेच असते. त्यात सर्व कथानकांचा भर हा नायक-नायिकांच्याच बाजूने फेर धरत असतो. अशा मालिकांना गाजलेले किंवा अभिनयात उजवे असलेले नट चटणी, पापड, लोणच्यासारखे हवे असतात. कथानकात वाव नसलेली ही मंडळी मालिकेला नाव मिळवून देत आलेली आपण पाहतोच. पॅडीने असे ‘ब’ दर्जाचे रोल करण्यापेक्षा स्वतंत्र अस्तित्व असलेल्या छोट्या छोट्या स्किटच्या मालिका (महाराष्ट्राची हास्यजत्रा, फु बाई फू, काॅमेडी एक्स्प्रेस) करणे पसंत केले. या त्याच्या निर्णयाने तो प्रेक्षकांसमोर ठळकरीत्या अधोरेखित झाला. थोडेफार गायन, थोडेफार ढोलकी वादन हे जोडकलागुण त्याला युनिक नट बनवून गेले.
पुनरावृत्तीची विनोदशैली (रिपिटेड ह्युमर स्टाईल) कलाकाराचे आविष्कार सामर्थ्य कमकुवत करते. दामुअण्णा मालवणकर ते मकरंद अनासपुरे सातत्याने त्याच त्याच विनोदी शैलीमुळे भविष्यातील कलाकृतींसाठी निष्प्रभ ठरत गेले. यापासून धडा घेत पॅडीने आपली विनोदशैली कायम बदलत ठेवली. सोबत विनोदाला लागणारं टायमिंगचं हत्यार त्याने सतत धारदारपणे वापरलं. नाट्यक्षेत्र हे असं क्षेत्र आहे की, केवळ चढाओढीपायी यात एकमेकांबाबत अंतर्कलह आढळतात. पॅडी कांबळे हा असा कलावंत आहे की, ज्याच्याबद्दल भले-भले कलाकार नेहमीच चांगलं बोलताना आढळतील.
वैष्णवी भोगले
एखादे नाटक, सिनेमा किंवा मालिका लोकप्रिय होण्यामागे अनेक कारणे असतात. मात्र त्या अभिनेत्याच्या तोंडूनच त्या लोकप्रियतेची कथा ऐकण्याची संधी मिळते, तेव्हा त्यांनी घेतलेली मेहनत त्यांच्या वक्तव्यातून दिसून येते. टीव्हीच्या पडद्यावर आपण ज्या कलाकारांना विविध भूमिका साकारताना पाहत असतो त्यांना पाहण्याची, त्यांच्याशी गप्पा मारण्याची इच्छा मला होती. मी मनोरंजन विश्वातल्या कोणत्याच व्यक्तीला, अभिनेत्याला, अभिनेत्रीला आजवर भेटले नाही. मनात मात्र खूप उत्सुकता होती! माझ्या मनात यायचे की, जर खरोखरच आपल्याला अशा एखाद्या लोकप्रिय अभिनेत्याला भेटता आले तर…! आणि ती संधी मला ‘प्रहार’ वर्तमानपत्राच्या कार्यालयात मिळाली. ‘प्रहार’मध्ये मी जेव्हा नवीनच रुजू झाले, तेव्हा “श्रावणसरी” या नावाचे एक सदर सुरू झाले होते. ज्यात विविध क्षेत्रांतील नावाजलेल्या कलाकारांना बोलवून, त्यांच्याशी गप्पा मारून त्यांचे अनुभव जाणून घेतले जातात. त्यांच्या मुलाखती या श्रावणसरी कॉलममध्ये प्रसिद्ध केल्या जातात. ‘श्रावणसरी’च्या ६व्या पुष्पात अभिनेते पंढरीनाथ कांबळे ऊर्फ ‘पॅडी’ यांना आमंत्रित करण्यात आले होते, त्यावेळी मला पहिल्यांदा एका अभिनेत्याला भेटता आले. त्यांच्याशी गप्पा मारून त्यांचे अनुभव जाणून घेता आले. यावेळी त्यांच्या उत्स्फूर्त आणि विनोदी शैलीमुळे खूप मनोरंजनही झाले. आपल्या सभोवतालच्या लोकांना हसवण्यासाठी नेहमी सज्ज राहणे हीच त्यांची खासियत असल्याचे मला जाणवले.
मातीला आकार दिला की, मातीचे सुबक मडके तयार होते. आपले आयुष्य जसजसे पुढे सरकते, आपण परिश्रम, मेहनत घेतो तसे आपल्याला त्या गोष्टी सहज शक्य होत जातात. तसेच काहीसे पंढरीनाथ कांबळे यांच्याबाबतीत घडत गेले. ते लहानपणाचा अनुभव सांगताना म्हणाले की, “मी जेव्हा शाळेत होतो, तेव्हा मित्रांनी सांगितलेला विनोद ते परत माझ्या तोंडून ऐकण्यासाठी उत्सुक असायचे. मी ज्या पद्धतीने त्यांना तो विनोद सांगायचो तो त्यांना आवडायचा. त्यावेळी त्या कलेची जाण नसली तरी त्याबद्दल मला आवड निर्माण झाली. मग तेच माझं करिअर झालं.” एकदा का आपल्याबद्दल आपलेपणा, आदर निर्माण झाला की आपण इतरांच्या नजरेत आपोआप मोठे होतो. हे संस्कार त्यांच्यात लहानपणापासूनच रुजत गेले. विनोदाची आवड त्यांना होतीच; परंतु आजोबा भजनी मंडळात गात होते. त्यामुळे संगीत त्यांच्या रक्तातच भिनले होते. ते गाणीसुद्धा सुंदर गातात. एकदा मन लावून पाहिलं की ते कोणतंही वाद्य सराईतपणे वाजवतात. आपण त्यांना ‘हास्यजत्रा’ या कार्यक्रमात ढोलकी वाजवतानाही पाहिले आहेच.
त्यांच्या अगदी सुरुवातीच्या नाटकात त्यांनी दिव्याजवळ उडणाऱ्या पाखरांची भूमिका साकारली होती. या नाटकामुळे त्यांना खरी ओळख मिळाली. त्यामुळे त्यांची व्यावसायिक दारे उघडली गेली. १९९५ साली सवाई एकांकिका स्पर्धेत त्यांना प्रथम पारितोषिक मिळाले. सध्या रंगभूमीवर सुरू असलेल्या ‘कुर्रर्रर्र’ नाटकासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार त्यांना मिळाला. त्यांचे गंगूबाई हे नाटक, ढगाला लागली कळ हा अल्बम, हास्यजत्रेतील काही प्रहसनं लोकप्रिय आहेत. त्यांना आता मनोरंजन क्षेत्रात २२ वर्षे पूर्ण झालीत. ते म्हणतात की, “तुमचं काम लोकांना आवडू लागलं की, तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो’’. लोक तुमची कदर करू लागतात, सर्वांकडून आदर मिळू लागतो. लोक जोडले जातात. त्यांनी सांगितलेल्या अनुभवातून खूप काही शिकण्यास मिळाले. चाळीत शिक्षण घेऊन मोठा झालेला हा मुलगा आज मराठी मनोरंजन क्षेत्रात आघाडीवर असला तरी त्याचे पाय जमिनीवर आहेत. तो आज लोकप्रिय आहे ते त्याच्या हरहुन्नरी स्वभावामुळे. विनोदी अभिनेता पॅडी सर्वांना माहीत असला तरी त्यांच्यात एक संवेदनशील माणूसदेखील दडला आहे, हे त्यांच्याशी संवाद साधताना वेळोवेळी जाणवत गेलं. भविष्यात गंभीर किंवा तशाच पद्धतीची भूमिकाही ते करतील, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अशाच विविधरंगी भूमिकांमधून ते यापुढेही आपल्याला दिसतील, अशी आशा आहे. त्यासाठी पुढील वाटचालीकरिता पॅडी यांना शुभेच्छा!
सायली वंजारे
आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी,
किती चातक चोचीने
प्यावा वर्षाऋतू तरी!
सौर वर्षातील इंद्रधनुषी श्रावण महिन्यातील लहरी पाऊस, ऊन-पावसाचा लपंडाव, सणावारांची मालिका, निसर्गाने अलंकारांची केलेली उधळण यामुळे हा सुकुमार श्रावण जणू काही ऊर्जेचा स्रोतच घेऊन आला आहे, अगदी तसाच कलासक्त ऊर्जेचे भांडार असणारे पंढरीनाथ कांबळे म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके ‘पॅडी’ यांनी प्रहारमध्ये सध्या सुरू असलेल्या ‘श्रावणसरी’च्या सातव्या पुष्पात आपल्या विनोदी शैलीने सर्वत्र हशा पिकवला. गप्पांची सुरुवातच “ये ब्बात नमस्कार मंडळी!” या उद्गारांनी करून त्यांनी प्रहारचे वातावरणच मोहरून टाकले. विनोदी किस्स्यांची उधळण, कोट्यांच्या वर्षावासोबत गाणी आणि गझलांचा मिलाफ साधत या मैफलीत वेगळीच रंगत आणली. बोलतानाही डोळ्यांच्या हालचाली, अभिनयातील बारकावे, बोलण्यातील लहेजा, बिनधास्तपणा, विचारांच्या प्रगल्भतेला असणारा विनोदी शैलीचा बाज यामुळे गप्पांचा फड चांगलाच रंगला. विजय पाटकरांनंतर सहजतेने ‘स्लॅपस्टिक कॉमेडी’ करण्यात पॅडीचा हातखंड असल्याचा उल्लेख झाला, तेव्हा विजय पाटकरांना आपण लहानपणापासून कसे ‘अभ्यासत’ आलो आहोत, याचे प्रात्यक्षिकच त्यांनी विजय पाटकरांच्या अभिनयातील बारकावे साभिनय सादर करून दाखवले.
“कलाकार भूमिकेला निवडत नसतो, तर भूमिका कलाकाराला निवडत असते, या मताशी मी सहमत असून प्रेक्षकांकडून मिळणारी प्रत्येक टाळी माझी जबाबदारी वाढवत असते. एक चांगला कलाकार होण्यासोबतच चांगला माणूस कसे होता येईल. कोणी माझा दुस्वास करणार नाही, याची मी सतत काळजी घेत असतो. विजय चव्हाण, विजय पाटकर, जॉनी लिव्हर, भरत जाधव अशा अजातशत्रू अभिनेत्यांना मी आदर्श मानतो. आज मी रंगभूमीवर जे काही काम करतोय त्या कामात कोणाचेही अनुकरण नसल्याने कदाचित माझ्या स्वतंत्र शैलीची एक छाप पडली आहे आणि हीच माझ्या कामाची पोहोचपावती आहे.तात. तालमीमुळे वाद्यांची लागलेली आवड आणि आजोबांकडून मिळालेला गायनाचा वारसा त्यांनी आजवर जोपासला आहे. पुढे भविष्यात स्वतःच्या निर्मिती कंपनीमधून सिनेमा करण्याचा त्यांचा मानस आहे. ‘पंढरी’च्या नावानेच मराठी माणसाच्या मनात आनंद तरंग उठू लागतात. अशाच तरंगात या ‘पंढरी’ची ही मैफलही रंगली. पॅडीचे हे बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमत्त्व श्रावणातील इंद्रधनुष्याप्रमाणे लोभस होते. त्यांच्या पुढील कारकिर्दीतही असेच आनंदाचे तरंग उठतील, अशी सर्वच चाहत्यांना खात्री आहे.
पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…
काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…
साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…
मृणालिनी कुलकर्णी कन्नड साहित्यिक भैरप्पा यांनी त्यांना सरस्वती सन्मानाचे मिळालेले ‘पाच लाख रुपये परत करतांना…
डाॅ. स्वाती गानू वयाची दहा-बारा वर्षे मुलांशी आपण किती सहज बोलू शकतो, गप्पा मारू शकतो,…
सतीश पाटणकर नारायण गणेश गोरे तथा नानासाहेब गोरे हे समाजवादी विचारवंत तसेच मराठी लेखक आणि…