Thursday, July 18, 2024
Homeसाप्ताहिककोलाजBanda mandir : बांदा शहरातील लोकांचे श्रद्धास्थान स्वयंभू श्री बांदेश्वर मंदिर व...

Banda mandir : बांदा शहरातील लोकांचे श्रद्धास्थान स्वयंभू श्री बांदेश्वर मंदिर व भूमिकादेवी

  • कोकणी बाणा : सतीश पाटणकर

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील बांदा हे निसर्गरम्य गाव. संस्थान काळात ‘बांदे’ असा उल्लेख असलेल्या या गावाचे संस्थानांच्या विलीनीकरणानंतर ‘बांदा’ असे नामकरण झाले. स्वयंभू श्री बांदेश्वर मंदिर व भूमिकादेवी-गोवा व सिंधुदुर्गच्या सीमेवरील सावंतवाडी तालुक्यातील बांदा या शहरातील लोकांचे श्रद्धास्थान. बांद्याचा आधिपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री देव बांदेश्वराचे देवस्थान अत्यंत जागृत आहे. पंधराव्या शतकापासून येथल्या जागृतीची प्रचिती अनेकांनी वेळोवेळी अनुभवली आहे. बांदेश्वराच्या साक्षात्काराची आख्यायिकाही प्रसिद्ध आहे. या शिवलिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे या एकाच लिंगात बारा स्वयंभू लिंगे समाविष्ट आहेत. खोदकामाच्या वेळी चुकून एका लिंगास तडा गेल्यामुळे या ठिकाणी सद्यस्थितीत साडेअकरा शिवलिंगे आहेत, असे जाणकार सांगतात. मंदिराच्या गाभाऱ्यात १ फूट खाली ही मंदिरे खोलगट भागात आहेत. त्या सभोवताली वर्तुळाकार पिंडी असून त्यावर धातूचे आच्छादन आहे. त्यातील छिद्रामधून अभिषेकाचे पाणी आत जाते. श्री बांदेश्वर-भूमिका हे एक जागृत देवस्थान आहे.

मंदिराच्या गाभाऱ्याचे पावित्र्य राखण्यासाठी केवळ पूजाऱ्यांनाच आत प्रवेश असतो. भाविकांना बाहेरूनच दर्शनाचा लाभ होतो. मुख्य लिंग पाहता येत नसल्याने लिंगाशेजारीच बाण लिंग स्थापन केलेले आहे. त्याचे दर्शन होते; परंतु सर्व भाविकांना बाहेरून स्वयंभू लिंगावर थेट अभिषेक करता येतो. मंदिराच्या मागे असलेल्या विहिरीच्या टाकीचे पाणी पाइपद्वारे थेट लिंगावर पडते. भाविक विहिरीचे पाणी काढून टाकीत ओततात व त्याचा थेट लिंगावर अभिषेक करतात. श्री बांदेश्वराच्या डाव्या बाजूला श्रीगणेश, तर उजव्या-बाजूला हनुमंताची मूर्ती विराजमान आहे. लिंगासमोर नंदीची सुबक मूर्ती आहे. बांदेश्वर मंदिराच्या शेजारी बांद्याची ग्रामदेवता श्री देवी भूमिका माऊली, श्री रवळनाथ, श्री गणेश, भूतनाथ, वेताळ आदी पंचायतनादी मंदिरे आहेत. आपले प्रत्येक कार्य या देवतांच्या कृपेमुळेच तडीस जाते, अशी ग्रामवासीयांची अतूट श्रद्धा आहे. त्यामुळे ग्रामवासीय कोणत्याही नवीन उद्योगाचा अथवा कार्याचा प्रारंभ या देवतांना श्रीफळ अर्पण करून आणि देवतांना गाऱ्हाणे घालून करतात.

बांदा गावचे ग्रामदैवत श्री भूमिकादेवी आणि बांदावासीयांचे श्रद्धास्थान असलेले स्वयंभू श्री देव बांदेश्वर यांचे आताचे मंदिर राजस्थानमधील ढोलपुरी गुलाबी रंगाच्या दगडांनी बांधलेले आहे. त्याच्यावर अतिशय सुंदर कलाकुसर करण्यात आली आहे. नूतन मंदिराचा कलशारोहण कोल्हापूर येथील करवीर पीठाचे शंकराचार्य विद्यानृसिंह भारती यांच्या हस्ते करण्यात आले. वर्ष १५५० ते १५५३ च्या सुमारास नार जोग सावंत मोरया ही शिवभक्त व्यक्ती देवस्थान मर्यादाप्रमुख होती. तिला गुरे चरत असताना आता जेथे श्री बांदेश्वर देवस्थान आहे, त्या ठिकाणी गच्च राईमध्ये गाय पान्हा सोडताना दिसली. त्याने त्या ठिकाणी पाहिले असता, त्याला पिंडी दिसली. त्याने याविषयी तत्कालीन लोकांना दाखवले. राईची साफसफाई करून पिंडी मोकळी केली असता, त्या ठिकाणी ११ पूर्ण लिंगे आणि १ अर्धवट, अशी साडेअकरा लिंगे आत असल्याचे दिसून आले. १२ पूर्ण लिंगे असती, तर या ठिकाणाला काशी विश्वेश्वराचे महत्त्व प्राप्त झाले असते.

त्यावेळच्या कर्त्यापुरुषांनी स्थापत्य शास्त्रज्ञांचा सल्ला घेऊन ऊन, वारा, पाऊस, वीज, धरणीकंप यांपासून मंदिराला कोणताही धोका पोहोचू नये; म्हणून मंदिराचा घुमट आणि आतील भाग यांची चुना वापरून रचनात्मक बांधणी केली आहे. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर ‘नार जोग सावंत मोरया’ हा शिलालेख कोरलेला आहे. तसे पाहिले, तर बांद्याचा इतिहास १२व्या शतकापर्यंत जातो. ही ग्रामरचना मोडी लिपी चालू केलेल्या हेमाडपंत यांनी रचली. आजचे ग्रामदैवत श्री भूमिका आणि सर्व परिवार देवतांची मंदिरे ही आज ‘देवकोंड’ म्हणून जो भाग आहे, त्या ठिकाणी होती. आजही तेथे एक ब्राह्मण मंदिर आहे. स्वयंभू लिंग सापडल्यावर सर्व देवालये एकत्र असावीत, या उद्देशाने वर्ष १७५३ च्या सुमारास श्री भूमिकादेवी आणि इतर देवतांची मंदिरे आजच्या श्री बांदेश्वर मंदिराजवळ बांधण्यात आली आणि त्याला ‘श्री बांदेश्वर भूमिका पंचायतन’, असे संबोधण्यास प्रारंभ झाला.

प्रत्येक सोमवारी रात्री श्री बांदेश्वर मंदिरामध्ये भजन असते. जत्रेपासून मृग नक्षत्रापर्यंत श्रींची भजनाच्या जयघोषात पालखी काढली जाते. प्रत्येक सोमवारी पालखी प्रदक्षिणेचा कार्यक्रम असणारे जवळच्या पंचक्रोशीतील हे एकमेव स्वयंभू मंदिर आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या ३ राज्यांमध्ये श्री देव बांदेश्वराचे भक्त विखुरलेले आहेत. देवस्थानाच्या संदर्भातील कौल श्री भूमिकादेवीच्या मंदिरात, तर भक्तगणांचे कौल श्री देव रवळनाथ मंदिरात लावले जातात. येथे ६५ तांदळांचे कौल लावण्याची पद्धत आहे. विनंतीप्रमाणे प्रत्येक कौलाचा अर्थ असतो. गुढीपाडवा, श्रीरामनवमी, हनुमान जयंती, देसरूढ, नारळी पौर्णिमा, नवरात्रोत्सव, नरकचतुर्दशी, देवदिवाळी, महाशिवरात्र, होलिकोत्सव आदी उत्सव मंदिरात साजरे केले जातात. दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच मार्गशीर्ष कृष्ण पक्ष प्रतिपदा या तिथीला देवतांचा जत्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. या दिवशी पहाटे भूमिकादेवीला स्नान घातले जाते आणि वस्त्रालंकारांनी देवीला सजवून देवीची पूजा केली जाते. प्रथम वरसलदारांकरवी देवीची ५ फळांनी ओटी भरली जाते. त्यानंतर माहेरवाशिणी, भाविक, देवीची ओटी भरतात. देवीला नवस बोलणे, नवस फेडणे इत्यादी कार्ये होतात. रात्री श्री बांदेश्वर-भूमिका देवतांची पालखी प्रदक्षिणा होते. वर्षातून केवळ एकदाच जत्रोत्सवाच्या दिवशी या दोन्ही देवतांच्या मंदिरांभोवती एकत्रित प्रदक्षिणा होते. अन्य वेळी केवळ श्री बांदेश्वर मंदिराभोवती देवतांची पालखी प्रदक्षिणा होते. रात्री दशावतारी नाट्यप्रयोग होतो. दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिरात दहीकाला होतो. त्यानंतर देवता पालखीसह स्नानासाठी नदीवर जातात. नदीवरून पुन्हा मंदिरात येताना मार्गात भाविक पालखीत धन, फळ, खाद्यपदार्थ इत्यादी अर्पण करतात. पालखी मंदिरात आल्यानंतर दुपारी समाराधनेने जत्रोत्सवाची सांगता होते.

(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -