- कथा : प्रा. देवबा पाटील
बससाठी बसस्थानक किंवा विमानासाठी विमानतळ असते तसे अंतराळयानांसाठी अवकाशात अवकाशस्थानकाचीही निर्मिती केली आहे. पृथ्वीभोवती किंवा दुसऱ्या कोणत्या खगोलीय वस्तूभोवती भ्रमण करत ठेवलेले अवकाशयान म्हणजेच अवकाशस्थानक.
संदीप व दीपा या भाऊ-बहिणीची यक्षासोबतची अंतराळ सफरीतील प्रश्नावली काही संपत नव्हती व यक्षही त्यांना समर्पक उत्तरे देत होता.
“अवकाश स्थानकाबद्दल तुम्हाला काही माहिती असेल, तर कृपया आम्हाला सांगा ना.” दीपा म्हणाली.
यक्ष सांगू लागला, “बससाठी जसे बसस्थानक किंवा विमानासाठी विमानतळ अथवा जहाजांसाठी बंदर असते तसे अंतराळयानांसाठी आता शास्त्रज्ञांनी अवकाशात अवकाश स्थानकाचीही निर्मिती केली आहे. पृथ्वीभोवती किंवा दुसऱ्या कोणत्या खगोलीय वस्तूभोवती भ्रमण करीत ठेवण्यात आलेले अवकाशयान म्हणजेच अवकाश स्थानक.” यक्ष सांगू लागला, “पृथ्वीवरून ग्रहांवर उपग्रह पाठविणे व ते परत आणणे यासाठी लागणाऱ्या अग्निबाणांना भरपूर इंधन लागते नि ते खूप महाग पडते. अग्निबाणांचे वजनही खूप वाढते. या अडचणींतून मार्ग काढण्यासाठी शास्त्रज्ञ या ग्रहांची वा चंद्राचीही उपग्रह उड्डाणयात्रा एका टप्प्यात न करता २ टप्प्यात करतात.”
“२ टप्प्यात? ती कशी?” संदीपने प्रश्न केला. “त्यासाठी शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या पृष्ठभागापासून अंदाजे १००० मैल उंचीवर पृथ्वीच्या कृत्रिम उपग्रहांचा प्लॅटफॉर्म म्हणून एक कृत्रिम उपग्रह कायमचा फिरता स्थापित केला. त्याला अंतराळ स्थानक म्हणतात. हे अंतराळ स्थानक एकाच जागी स्थिर नसून तेसुद्धा पृथ्वीपासून ठरावीक उंचीवर पृथ्वीच्याच गतीने तिच्याभोवती सतत परिभ्रमण करीत असते. ते पृथ्वीच्या गतीनेच पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असल्याने पृथ्वीवरून मात्र आपणास स्थिर दिसते. या अवकाशस्थानकावर विविध अंतरिक्ष प्रयोगशाळा व अंतराळ उड्डाणतळ असतो. तेथे अंतराळवीरांसाठी सर्व सुविधा उपलब्ध असतात.” यक्षाने सांगितले.
“बस स्थानकावर किंवा रेल्वे स्थानकावर कसे कार्य होत असते हे तर तुम्हाला महीतच आहे.” यक्ष म्हणाला. “बस स्थानकावर या गावाहून त्या गावाकडे अशा येणाऱ्या-जाणाऱ्या बसेस येत-जात असतात. त्या तेथे थांबल्या म्हणजे काही प्रवासी बसमधून खाली उतरतात व काही प्रवासी बसमध्ये चढतात.” दीपाने सांगितले. “ज्यांच्याजवळ सामान असते ते सामानासह चढतात किंवा उतरतात. तसेच कार्य रेल्वे स्थानकावरसुद्धा आगगाडी आल्यावर होते.” संदीपने दीपाच्या सांगण्याला पुस्ती जोडली.
“बरोबर, यक्ष पुढे सांगू लागला, “बसस्थानकावर किंवा रेल्वेस्थानकावर जशी प्रवाशांची व मालाची चढउतार होते तशीच या अंतराळस्थानकावर अंतराळवीरांची व संशोधनसामग्रीची चढउतार होते. अवकाशयानाचे अवकाशस्थानकावरील उड्डाणतळावरून उड्डाण व त्यावर उतरणे दोन्हीही होते. पहिल्या टप्प्यात पृथ्वीवरून उपग्रहासह अग्निबाण या अंतरिक्षस्थानकावर जातात. तेथून शास्त्रज्ञ म्हणजे अंतरिक्षवीर आवश्यक त्या ग्रहाकडे सुयोग्य रीतीने प्रक्षेपण करतात. परतीचा प्रवासही असा दोन टप्प्यांत करता येतो. म्हणजे ग्रहाकडील उपग्रह प्रथम अवकाशस्थानकावर उतरतात. तेथून मग ते पृथ्वीकडे येतात. अशा प्रकारे इंधनाची व खर्चाची खूप बचत करता होते. एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहावर उड्डाण करण्यासाठी मधला थांबा म्हणून अंतराळस्थानक खूप उपयुक्त ठरते. तेथून विविध ग्रहांवर व पृथ्वीकडे दळणवळण करणे सोयीचे झाले आहे. तसेच अवकाशस्थानकाने यानाचे ग्रहांवर उड्डाणासाठीचे अंतर कमी झाल्याने त्यावरून यानांची अवकाशात झेप घेणेही स्वस्त झाले आहे.” “ते अवकाशस्थानक पृथ्वीभोवती कसे फिरते ठेवतात? कारण ते तर पृथ्वीपासून १००० मैलच अंतरावर असते असे म्हणतात तुम्ही सांगितले.” दीपाने विचारणा केली.
यक्ष म्हणाला, “अवकाशस्थानक ज्या उंचीवर व ज्या वेगाने फिरत असते तेथे गुरुत्वाकर्षणाचा जोर व केंद्रोत्सारी प्रेरकाचा जोर समसमान व एकमेकांच्या विरुद्ध दिशेला असतात. त्यामुळे ते पृथ्वीभोवती ठराविक मार्गावर एकसारखे फिरत राहते. फिरती अंतराळ वेधशाळासुद्धा अशीच अंतराळात फिरती ठेवतात. आता तर शास्त्रज्ञ चंद्र व मंगळ यांनाही अवकाशस्थानक बनविण्याच्या तयारीत आहेत. म्हणजे तेथून आणखी दूरच्या इतर ग्रहांवर किंवा परग्रहावंर जाणे सोयीचे व स्वस्त हाईल.”
“या फिरत्या अवकाशस्थानकावर फिरणारेही अंतराळयान कसे जाते मग?” दीपानेच पुन्हा विचारले.
यक्ष म्हणाला, “अवकाशस्थानक व अंतराळयान हे दोन्हीही पृथ्वीभोवती फिरत असतात. अवकाशस्थानकाला गाठून अंतराळयान त्याला जोडायचे असते. अंतराळयान हे अवकाशस्थानकाच्या मागावरच असते. पृथ्वीभोवती फिरता फिरता लवकरच एक वेळ अशी येते की, त्यावेळी ते दोघेही एकमेकांना खालीवर येतात. अशावेळी अंतराळयान हे बरोबर तंतोतंत अवकाशस्थानकाखाली नेतात व त्याला एका विशिष्ट यंत्रणेच्या सहाय्याने अवकाशस्थानकाशी जोडतात. दोन्ही यानांची जोडणी पक्की झाल्याची दोन्ही यानांचे चालक कमांडर खात्री करून घेतात. ती खात्री झाल्यावर मग अवकाशशास्त्रज्ञ अंतराळयानातून बाहेर येऊन अवकाशस्थानकात जातात.”
असे ते अवकाशयानात हसत खेळत विद्यार्जन करीत होते.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra