सकाळीच फोन वाजला. ‘हॅलो मी मालती बोलते आहे.’ ‘बोल. आज एकदम सकाळीच काय काम काढलंस ?’
‘अगं, उद्या तुला सवाष्ण यायला जमेल का जिवतीची. पहिला शुक्रवार आहे.’ ‘हो जमेल. पण यंदा अगदी लगेच… सुनेला सुट्टी आहे का उद्या तुझ्या?’
‘नाही. पण मी घालणार आहे. आता त्यांच्या नादालाच लागायचं नाही. गेल्या वर्षी शेवटी अगदी अखेरीस कसे बसे करायची वेळ आली. म्हणून यंदा विचारतच बसायचं नाही असं ठरवलंय. तुम्ही दोघे या.’ ‘दोघे कशाला?’ हसतच विचारलं शांताने.
‘तुला त्यांच्या एकट्यांसाठी करत बसायला नको. ह्यांना पण कंपनी मिळेल. छान गप्पा-गोष्टी करू.’ ‘बरं. पण त्यांना मधुमेह आहे हो. तेव्हा…’
‘असू दे. सगळा तिखट मिठाचा स्वयंपाक करते. आमच्याकडे पण तसेच तर आहे.’
जेवण झाल्यावर मालती म्हणाली, ‘निघायची घाई चालणार नाही हं. खूप दिवसांनी आलात. थांबा आता संध्याकाळपर्यंत.’ ‘तुम्ही दोघी करा इथे आराम. आम्ही जरा आत पडतो.’ मालतीबाईंचे यजमान मनोहरपंत म्हणाले.
बाहेर दोघींच्या गप्पा रंगात आल्या. बोलण्यात सुनांचाच विषय प्रामुख्याने होता. थोड्या वेळाने मनोहरपंत आणि सुधाकरराव बाहेर आले.
‘सुनांची चर्चा झाली असली, तर जरा चहा-पाण्याचे बघा.’ मनोहरपंत म्हणाले.
‘तुम्हाला चेष्टा करायला काय जातं! पण किती नाही म्हटलं तरी आमच्या वेळा आठवतात.’
‘कबूल आहे. पण आता काळानुसार बदलायला हवं. आताच्या पिढीचे विचार वेगळे आहेत. तशा समस्याही वेगळ्या आहेत. नोकऱ्यांचे स्वरूप वेगळे आहे. आपणही नोकऱ्या केल्या. पण आपल्या सरकारी नोकऱ्यांमध्ये कामाचा एवढा ताण नव्हता. मला सांगा, किती वेळा दोघी नोकरीच्या वेळेत मस्जीद, क्रॉफर्ड मार्केटला जाऊन आलेल्या आहात?’ दोघींनी फक्त एकमेकींकडे बघितले.
‘व्रतवैकल्यांचे कारण पुढे करून तुम्ही बायका हक्काने उशिरा यायचात. तुमच्यासाठी त्या मंगळागौरीच्या पूजा, श्रावण सवाष्ण म्हणजे एकेक पर्वणीच असायची. तसे आताच्या मुलींना नाही. त्या अधिक शिकलेल्याही आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तेवढा पदभार पण आहे. त्यांचं करिअरिस्ट असणं आपण पण समजून घ्यायला हवं. त्यांना या गोष्टीत रस नाही. हे लक्षात घेऊन आपणच आग्रही न राहाणं हिताचं नव्हे का!’ सुधाकरराव म्हणाले.
‘सासरेबुवांनाच सुनांचे एवढे पुळके आल्यावर आम्ही काय बोलायचं!’ शांताबाई म्हणाल्या.
‘तसं नाही. चिडून सुटणारे हे प्रश्न नाहीत. त्यांच्या जागी जाऊन पण विचार केला पाहिजे. आता आपल्या सारखी कायमस्वरूपी नोकरी नाही त्यांची. एकेक वर्षाचे करार असतात. खूप जपून राहावे लागते. तरच नोकरी टिकू शकते. आपण हक्काचे निवृत्तिवेतन घेत आहोत म्हणून निवांत आहोत. त्यांच्या डोक्यावर तलवार आहे.’
‘आम्हालाही कळते सारे. पण जरा सवड मिळाली की हे भटकायला जाणार. मग घराचे काय! कायम आम्हीच करत बसायचं ना!’
‘असं बघा, हे काही त्यांनी आपल्या डोक्यावर ठेवलेले नाही. आपण स्वेच्छेने करतो. मग त्या बाबतीत बोलून ते ऐकूनही घेणार नाहीत. ज्यायोगे वाद निर्माण होतील. त्यापेक्षा आपले आपल्याला होईल ते करावे. आणि गोडीने घ्यावे हे उत्तम. म्हणजे त्यात मौजही राहते. आता आजचेच बघा. आज आपली मुले-सुना घरात नाहीत म्हणून आपल्याला हे सगळे मोकळेपणानी बोलता येत आहे. आपण समवयस्क आहोत म्हणून आपले विचारही जुळत आहेत. तसेच त्यांचे विचार त्यांच्या समवयस्कांशी जुळतात. म्हणून सवड मिळेल, तेव्हा जातात भटकायला.
पूर्वी स्त्रियांना फक्त चार भिंतीतलेच विश्व होते. या व्रतवैकल्यांच्या निमित्ताने त्यांना एकमेकींना भेटण्याची संधी मिळत होती. केवळ मैत्रिणींना भेटण्यासाठी असे कोणी त्यांना कुठे जाऊ दिले नसते. आता अशा निमित्तांची गरजच नाही. अर्थात आपल्या वेळीही अशा निमित्यांची तशी गरज नसली तरी आपले व्याप सांभाळून आपण हेही केले. कारण नाही म्हणण्याची धिटाई आपल्यात नव्हती. तसे विचारही नव्हते. पण आताच्या मुलांचे तसे नाही. आपण घरात असल्यामुळे घराची काळजीही नाही.’ ‘म्हणूनच कसला विचारही नाही. हल्ली त्यामुळेच वृद्धाश्रमांची संख्या वाढत चाललेली आहे.’
‘वहिनी, एका बाजूने वृद्धाश्रमांची संख्या वाढत चालली असली तरी आई-वडील दत्तक घेणारेही काहीजण बघायला मिळतातच की. त्यांना आई-वडिलांची उणीव भासते, कारण स्वातंत्र्यातले पारतंत्र्य त्यांनी अनुभवलेले असते. घराची जवाबदारी घेणारे, नातवंडांवर संस्कार करणारे त्यांच्या घरी कोणी नसते. वेद काळात आश्रम व्यवस्था सांगितली गेली. त्याप्रमाणे पाहता आता आपला वानप्रस्थाश्रमाचा काळ आहे व मुलांचा गृहस्थाश्रमातील जबाबदाऱ्या घेण्याचा काळ आहे.’
‘मग काय करायचं?’
‘श्रावण महिन्यात पूर्वी लोक महिनाभर काही तरी नेम करायचे. आपण महिनाभर मुले म्हणतील तसे कुठेही न रागावता करण्याचा नेम करू या. म्हणजे त्यांना स्वातंत्र्य आणि जबाबदारी दोन्ही एकदम मिळेल. आपण कशात लुडबूड न करता सल्ला फक्त मागितला, तरच देण्याचे धोरण ठेऊ या. त्यांच्या कलांनी घेण्याची कलाटणी काय वळण घेते तेही कळेल.’
‘शुभस्य शीघ्रम. सुधाकरराव छान तोडगा सुचवला. लगेच अमलात आणू या.’ मनोहरपंत म्हणाले. दोघी एकमेकींकडे बघून सूचक हसल्या. आणि निरोप घेतला. थोड्या वेळाने सुनबाई घरी आली. हसतमुखाने मालतीबाईं सामोऱ्या गेल्या.
‘आई सॉरी, तुमच्या एकट्यांवर पडलं सगळं आज. पण रजा घेणं शक्यच नव्हतं इन्स्पेक्शनमुळे.’
‘असू दे.’ म्हणत मालतीबाई आत त्यांच्या खोलीत गेल्या. आता दोघीं मैत्रिणींकडे सुखद अनुभव येत होते. साधारण महिन्याभराने सुधाकरराव व मनोहरपंतांनी चौघांचे लांबच्या तीर्थयात्रेचे बुकिंग केले. परत आल्यावर दोघांच्याही मुलं, सुनांनी एकमुखाने म्हटले, ‘तुम्ही नव्हता तर फार सुने वाटत होते.’
नेम यशस्वी झाल्याचे समाधान यात्रा करून आलेल्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…
नागपूर: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुख्यमंत्री सचिवालयात आयोजित जनता दरबारात जनतेच्या समस्या जाणून घेतल्या…