Wednesday, July 24, 2024
Homeसाप्ताहिककोलाजShravan poems : काव्यरंग

Shravan poems : काव्यरंग

रेऽऽऽ, पावसा!!

पावसा, रे पावसा
अरे तू अस्सा-तस्सा,
आभाळातून खाली
गडगडतोस कसा? …१

पावसा, रे पावसा
काय रे तुझा थाट,
ढोल-नगारे-ताशांसवे
विजेचा लखलखाट! …२

पावसा, रे पावसा
घर तुझे ढगात,
ये नां उतरून अंगणात
डाव मांडू दोघांत! …३

पावसा, रे पावसा
खिशात तुझ्या गारा,
कधी उधळतोस, कधी
रिमझिम बरसतोस धारा! …४

पावसा, रे पावसा
चल मज्जा करू थोडी,
चिंब भिजू, पाण्यात सोडू
कागदाची होडी! …५

पावसा, रे पावसा
येऽ! नको खाऊस भाव,
बेडूकमामा बोलावतो
डराँवऽ डराँवऽ डराँवऽ! …६

पावसा, रे पावसा
तुझी पाहू किती वाट,
ये रे गड्या आता तरी
नक्को फिरवूस पाठ! …७

पावसा, रे पावसा
गड्या! ये कस्सा धावून,
आज नक्को अभ्यास, मिळू दे सुट्टी
शाळाच जाऊ दे वाहून!! …८

– पांडुपुत्र, (प्रा. डॉ. प्रकाश पांडुरंग गोसावी), कल्याण

या डोंगरानो…

या इथल्या डोंगरानो,
अलगद या खाली
कातळ देहावर,
जुलमाची नक्षी काळी….

ते लुटत राहिले झाडं
झाली फितूर देवराई,
ती केव्हाच मावळतीला
कुणी म्हणत होते आई…..

सांग तिला,
म्हणावं आता
तिच्यासारखे जळत नसते कुणी
दिवेलागणीच्या ओळीत,
उभी सुरात मिणमिणती गाणी…

उभे घर चोरले कुणी,
तरीही बंद राहिले दार
रानशिसविच्या वाटेवर
पुनव जागी ठार…

तीचे ओल्या प्रार्थनेचे हात,
अलगद कुणी चोरले
घर जपताना मातीचे,
वेशीवर कोणी थकत राहिले…

हे असेच कित्येक डोंगर,
माझ्यातून जातात काही
पल्याड जाता जाता,
आल्याड भरून उरावे आई…

– अनुज केसरकर

श्रावण वैभव

रिमझिम येती सरी
ऊन पावसाचा खेळ
सप्तरंगाचे इंद्रधनू
स्वर्ग धरेचा मेळ ll१ll

पुष्पलता सुगंधित
अत्तराची लयलूट
प्रसन्न ओलाव्यात
नदी नाल्यांची एकजूट ll२ll

शेते डोलती लयीत
वाऱ्याच्या मंद झुळकीत
मयूर करीती नर्तन
गाती पर्जन्य गीत ll३ll

सणांची असे रेलचेल
निसर्गास मिळे मान
मंगळागौर, रक्षाबंधन
होई नात्यांचा सान्मान ll४ll

राखूया सारे वैभव
टाळूनी प्रदूषण
जापूया सृष्टीचे सृजन
अंतरी जागवू श्रावण ll५ll

– अनुराधा मेहेंदळे, ठाणे

अनाकलनीय…

मला सांगा, पाऊस आहे कसा?
कधी तो असा, तर कधी तसा…
कधी भयाण आस, तर कधी मातीचा सुवास
कधी हवा-हवासा, तर कधी नको-नकोसा
कधी खट्याळ, अल्लड, तर कधी धूर्त, लबाड
कधी वाटतो भोळा, तर कधी करतो चोळामोळा…
मग, मला सांगा, पाऊस आहे कसा?
कधी तो असा, तर कधी तसा…

कधी हळूवार बरसतो, तर कधी झोडपून काढतो
कधी कधी तो नुसताच पडतो, तर कधी धु धु धूतो
कधी होतो बेधुंद
प्रियकर, तर कधी उजाडतो
सुखी संसार
कधी तो भागवतो तहान, तर कधी उडवतो दाणादाण…
मग मला सांगा, पाऊस आहे कसा?
कधी तो असा, तर कधी तसा…
कधी कधी संततधार, तर कधी मुसळधार
कधी उजवतो; रुजवतो, तर कधी उखडून दूर फेकतो
नाही आला तर खडखडाट, मात्र पुरेसा पडला तर भरभराट
जेव्हां तो फेर धरून नाचतो, तेव्हा सर्वांनाच हवासा वाटतो
मात्र कधी धो धो कोसळून, भला मोठा डोंगरच देतो ढकलून
अन‌् मिट्ट अंधारात एखादी टुमदार इर्शाळवाडीच टाकतो गिळून…

आता तिथं उरलाय अनेकांच्या आयुष्याचा चिखल
थिजलेले हुंदके, कटू आठवणी, असंख्य स्वप्नांचा चुराडा
अनाथ चिमुरड्यांचा आक्रोश, शून्यातल्या नजरा
अन् आसमंतात भरून राहिलेला प्रदीर्घ हंबरडा…
तेंव्हा मला सांगा, हा पाऊस आहे कसा? सखा की एकदम परका?
नव्हे, तो तर आहे अनाकलनीय, अनाकलनीय, अनाकलनीय…

– दी.प. (स्वच्छंदी), भांडुप

नारळी पौर्णिमा

आला नारळी पौर्णिमेचा सण
कोळीराजा बागडतो आनंदानं
सागराला श्रीफळ वाहत
करुनी मनोभावे पूजन

दर्याराजा देव कोळ्यांचा
सकलांचा तो रक्षणकर्ता
सदा प्रसन्न तो होतो
त्याच्या जीवनातला सुखकर्ता

नारळी पौर्णिमेचा सण
येतो मांगल्य घेऊन
खवळलेला समुद्र शांत होतो
कोळ्यांचा भक्तिभाव पाहून

सागरात होड्या सोडुनी
नित्य चाले मासेमारी
कष्टाचे चीज होऊनी
सुख नांदे त्यांच्या घरी

नारळी पौर्णिमेचा सण
भाऊबहिणीच्या बंधनाचा
बहीण भावास बांधते
धागा पवित्र रेशमाचा

– रवींद्र व्ही. चालीकवार, महागाव, जि. यवतमाळ

आला श्रावण…

आला श्रावण! आला श्रावण!
सणांचा आनंद घेऊन आला…

पहिला सण नागपंचमीचा
नागदेवतेच्या पूजेचा…

सण दुसरा नारळी पौर्णिमेचा
कोळी बांधवांच्या आनंदाचा…

सोबतीला सण रक्षाबंधनाचा
भाऊ बहिणीच्या नात्याचा…

सण आला जन्माष्टमीचा
बाळगोपाळांच्या दहीहंडीचा…

श्रावण सरता गणपती आले
गौराईचे आगमन झाले…

असा हा श्रावण सणांचा
सर्वांच्या उत्साहाचा-आनंदाचा……

– हृतिका रवींद्र कोळी, इयत्ता – सहावी,
शाळेचे नाव – सेंट जॉन द बॅप्टिस्ट हायस्कूल, ठाणे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -