
- अभिनेत्री : अलका कुबल-आठल्ये
माझा आयुष्यातला पहिला मराठी चित्रपट म्हणजे ‘बापाची कमाल, पोरींची धमाल’. पहिल्याच चित्रपटात मला सीमाताईंसोबत काम करण्याची संधी मिळाली. त्यात निळूभाऊही होते. निळूभाऊ आणि सीमाताई ही जोडी आणि त्यांच्या पाच कन्या यांच्याभोवती चित्रपटाचं कथानक गुंफलं गेलं होतं. चित्रपटामध्ये मी त्यांच्या चौथ्या क्रमांकाच्या कन्येची भूमिका साकारली होती. त्यावेळी तर मी अगदीच नवखी होते. त्यानंतर मी ‘लेक चालली सासरला’ हा चित्रपट केला. सीमाताईंनी सेटवर कधीच नवखेपणाची जाणीव होऊ दिली नाही. त्यावेळी सीमा देव हे चित्रपटसृष्टीतलं मोठं नाव होतं. पण त्यांनी हा मोठेपणा कधीही मिरवला नाही. त्या सेटवर सगळ्यांशी अगदी प्रेमाने आणि मिळून मिसळून वागायच्या. माझ्यासारख्या नवख्या अभिनेत्रीला त्यांनी अगदी नीट सांभाळून घेतलं होतं. त्यांनी मला सर्वतोपरी मार्गदर्शन केलं. त्यांचं व्यक्तिमत्त्व अत्यंत साधं होतं. मागील दोन ते तीन वर्षांपासून त्या आजारी होत्या. त्यांना अल्झायमरसारखा दुर्धर आजार जडला होता. पण त्यांच्या मुलांनी आणि सुनांनी त्यांचा खूप छान सांभाळ केला. रमेशदादा असेपर्यंत त्यांना जोडीदार होता, सोबत होती. रमेश देव आणि सीमा देव ही चित्रपटसृष्टीतली सुपरहिट जोडी. या दोघांचं नाव एकमेकांपासून वेगळं करताच येणार नाही. वर्षभरापूर्वी रमेशदादांचं निधन झालं आणि सीमाताईंचा सोबती त्यांना सोडून गेला. त्यामुळे त्यांना नक्कीच एकटेपणा जाणवत असावा.
एवढी मोठी अभिनेत्री असूनही सीमाताई खूप साधेपणाने वागत होत्या. आपणही तसंच वागायला हवं ही एक शिकवण त्यांनी आपल्या वागण्या-बोलण्यातून आम्हाला दिली. उपदेशाचे डोस पिऊन जी शिकवण मिळाली नसती ती सीमाताईंना बघून, त्यांचं निरिक्षण करून मिळाली. सीमाताई कधीही भेटल्या तरी छान आदराने, प्रेमाने बोलणार, आस्थेने चौकशी करणार, असा त्यांचा अगदी गोड स्वभाव होता. आता सीमाताईंचा तो गोड हसरा चेहरा प्रत्यक्ष पाहायला मिळणार नाही, याचं खरंच खूप वाईट वाटतं.