Monday, April 21, 2025
Homeसाप्ताहिककोलाजSeema Deo : सोज्ज्वळ चेहरा हरपला!

Seema Deo : सोज्ज्वळ चेहरा हरपला!

  • प्रसिद्ध अभिनेत्री : डॉ. निशिगंधा वाड

सीमा देव या मराठी आणि हिंदी चित्रपटांमधून विविधांगी भूमिका साकारणाऱ्या अष्टपैलू अभिनेत्री. त्यांनी एक अभिनेत्री म्हणून वेगळा ठसा उमटवला. त्यांनी रूपेरी पडद्यावर साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना आपल्या घरातलीच वाटली आणि हेच त्यांचं अभिनेत्री म्हणून मोठं यश म्हणता येईल. सीमाताई आणि रमेश देव या जोडीने मराठी चित्रसृष्टीमध्ये आपले नाव अजरामर केले आहे. सीमाताईंना वाहिलेली आदरांजली…

सीमा देव यांचं आपल्यातून असं निघून जाणं धक्कादायक आहे. रमेश देव आणि सीमा देव या कलाकार जोडप्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मी तर त्यांना रमेशकाका आणि सीमामावशी असंच संबोधायचे. सीमामावशींना प्रेक्षकांचं प्रचंड प्रेम लाभलं. सोज्ज्वळ आणि गोड चेहऱ्याच्या सीमा मावशींना रूपेरी पडद्यावर पाहणं ही एक पर्वणीच असायची. प्रत्येक भूमिकेत त्या शंभर टक्के योगदान द्यायच्या, समरसून जायच्या. प्रत्येक व्यक्तिरेखेत जीव ओतायच्या. म्हणूनच त्या अनेकांच्या लाडक्या अभिनेत्री होत्या.

रमेश काका आणि सीमा मावशी ही रूपेरी पडद्यावरची विलोभनीय जोडी होती. फक्त चित्रपटांमधूनच नाही तर वैयक्तिक आयुष्यातही ही जोडी अशीच अनोखी होती. ही अत्यंत प्रेमळ माणसं. मला त्यांच्या मुलांसोबत काम करण्याची संधी मिळाली. अजिंक्यबरोबर तर मी भरपूर काम केलं आहे. तसंच अभिनयसोबतही काही जाहिरातींमध्ये काम करण्याची संधी मला लाभली. कामाच्या निमित्ताने त्यांच्याशी सतत भेटी होत असत. मला वेळोवेळी त्यांचा सहवास लाभला. त्यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळालं.

खरं सांगायचं, तर कामाचा परिघ वेगळा आणि वैयक्तिक आयुष्यात जपलेली नाती वेगळी. मला सीमामावशींकडून खूप प्रेम मिळालं. त्यांच्याकडून आपलेपणा अनुभवता आला. सीमामावशींचा सहवास लाभल्याबद्दल मी स्वत:ला खरंच खूप भाग्यवान समजते. आज सीमा मावशी आपल्यात नाहीत याचं निश्चितच दु:ख आहे. गेली वर्ष-दोन वर्षं त्यांना खूपच यातना सहन कराव्या लागल्या. त्या अल्झायमरसारख्या दुर्धर आजाराने ग्रस्त होत्या. मात्र मुलं आणि सुनांनी त्यांची मनोभावे सेवा केली. अजिंक्य, अभिनय आणि कुटुंबातल्या सगळ्यांनी रमेशकाका आणि सीमा मावशींना खूप जपलं. या जोडप्याने आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले. या सगळ्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.

मला वाटतं, परमेश्वराने या दोघांनाही वरदान असलेलं आयुष्य दिलं. अभिनयाच्या क्षेत्रातली अत्यंत यशस्वी अशी ही जोडी होती. अत्यंत भाग्यवान अशी ही माणसं. सीमामावशींना अभिनयाची प्रचंड जाण होती. त्यांच्या प्रत्येक भूमिकेतून शालीनता झळकायची. अगदी पहिल्या चित्रपटापासूनच त्यांनी अभिनयक्षेत्रात आपली छाप उमटवायला सुरुवात केली होती. त्यांनी मराठी आणि हिंदीमध्ये मिळून ८०पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं. सीमामावशी म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीतल्या मराठी सोज्ज्वळ चेहऱ्यांपैकी एक. त्या आणि रमेशकाका या जोडीची एक वेगळीच जादू होती. रमेश देव म्हटलं की, सीमा देव आणि सीमा देव म्हटलं की, रमेश देव यांचं नाव आपसूकच तोंडात येतं. अत्यंत एकरूप अशी ही जोडी होती, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. या दोघांनीही प्रचंड काम करून ठेवलं आहे. सीमामावशींनी अभिनयाला नवा आयाम दिला. त्यांच्या अभिनयातून, कारकिर्दीतून आम्हाला खूप काही मिळालं, बरंच शिकता आलं.

सीमाताईंचं नाव घेतल्यावर त्यांचे अनेक चित्रपट डोळ्यांसमोर येतात. चित्रपटांमधल्या त्यांच्या भूमिकतेली शालीनता, सोज्ज्वळपणा प्रेक्षकांना खूप भावायचा. जगाच्या पाठीवर, सुहासिनी अशा चित्रपटांमधून त्यांनी अजरामर भूमिका साकारल्या आहेत. आज सीमाताई आपल्यात नसल्या तरी या भूमिकांमधून त्या सदैव आपल्यासोबत राहणार आहेत. चित्रपटसृष्टीत राहून एवढं चांगलं नाव कमावण्याचं, प्रतिष्ठा मिळवण्याचं भाग्य फार कमीजणांना लाभतं. सीमाताईंनी सर्वांना अभिमान वाटावा अशा भूमिका साकारल्या. ‘आनंद’मधली त्यांची भूमिका खूपच गोड होती. ही भूमिका माझ्या कायमच स्मरणात राहील. त्या भूमिकेतलं त्यांचं लाजणं, त्यांचे हावभाव हे सगळं अगदी थक्क करून टाकणारं होतं. त्यांच्याकडून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं. सेटवरचा मोकळा वावर, कुठलाही बडेजाव न मिरवणं, सगळ्यांना सांभाळून घेणं हे सगळे गुण आम्ही त्यांच्याकडूनच घेतले.

आजच्या पिढीतल्या नायिकांनाही त्यांच्याकडून खूप काही घेता येण्यासारखं आहे. आजच्या पिढीने जुने चित्रपट पाहिले, तर त्यांना या दोघांनी अभिनयक्षेत्रात दिलेल्या योगदानाची नक्कीच जाणीव होईल. ही सगळी चित्रपटसृष्टीतली जुनीजाणती माणसं. त्यांच्या जाण्याने निश्चितच एक पोकळी निर्माण झाली आहे आणि ही पोकळी काही केल्या भरून निघणारी नाही. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आम्ही या क्षेत्रात आलो. त्यांच्याकडे बघतच अभिनयाची कारकीर्द साकारली. आज सीमामावशी शरीराने आपल्यात नसल्या तरी चित्रपटांमधून त्यांचं दर्शन घडत राहणार आहे. त्यांचा अभिनय पुढच्या पिढ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. आम्हालाही त्यांच्याप्रमाणेच काम करण्याची उमेद मिळावी, हीच इच्छा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -