Thursday, July 25, 2024
Homeसाप्ताहिककोलाजRakshabandhan : अतूट नाते...

Rakshabandhan : अतूट नाते…

  • गुलदस्ता : मृणालिनी कुलकर्णी

बहीण-भावाचे नाते हे आरशासारखे असते. हे नाते रेशमाच्या धाग्याने बांधलेले आहे. तेथे खरं-खोटं चालत नाही. ती आपल्या आई-वडिलांची प्रतिबिंबे असतात. भावाचा आधार आणि बहिणीची माया हे अतूट नाते दरवर्षी रक्षाबंधनाला दृढ होत जाते.

नारळी पौर्णिमा! हिंदू शास्त्रानुसार श्रावणातील पौर्णिमेला समुद्राची पूजा करून समुद्रास नारळ अर्पण करतात म्हणून या दिवसाला ‘नारळी पौर्णिमा’ असे म्हणतात. नारळी पौर्णिमा हा हिंदूंचा मोठा सण! महाराष्ट्राचा सांस्कृतिक, आध्यात्मिक वारसा, जपत, संवर्धन करत, मोठ्या उत्साहाने साजरा करतात. खासकरून समुद्रकिनारी राहणारे, समुद्राशी खूप जवळचा संबंध असणारे, ज्यांची उपजीविका समुद्रावर आहे, ते कोळी बांधव नारळी पौर्णिमेच्या दिवशी वरुणदेवाचे वास्तव्य असलेल्या समुद्राच्या विराट रूपाची पूजा भक्तिभावनेने आणि कृतज्ञतेने करून आशीर्वाद मागतात. मानव आणि निसर्ग यामधील हे खास अतूट नाते!

पावसाळ्यातला खवळलेला समुद्र, पावसाळा संपत आला असताना म्हणजेच श्रावणी पौर्णिमेनंतर शांत होतो. पावसाचा जोर कमी व्हावा, समुद्राने त्यांची मर्यादा ओलांडू नये, समुद्रात कोणता धोका निर्माण होऊ नये, त्याची कृपादृष्टी सर्वांवर राहावी यासाठी कोळी बांधव समुद्राला प्रार्थना करतात.

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सारे कोळी कुटुंबीय वाजतगाजत मिरवणुकीने आपल्या पारंपरिक वेशात समुद्रातील बंदराजवळ येतात. घरच्या देवाची, नव्याने रंगविलेल्या-सजविलेल्या आपल्या बोटीची, नंतर नारळाची पूजा करून नारळाला अलगद हळुवारपणे ‘ओम वाम वरुणाय नमः’ हा मंत्र म्हणत समुद्राला अर्पण करतात. हा एक कृतज्ञता, आदर आणि भक्तीचे प्रतीक असलेला सुंदर विधी आहे. समुद्राचे आशीर्वाद मागताना पुढील वर्षातील मासेमारी सुरक्षित व्हावी, कोळीण बायका आपल्या धनीचे समुद्राने रक्षण करावे, भरपूर मासळी मिळावी, त्याच्यावर कोणते संकट येऊ नये यासाठी प्रार्थना करतात. नंतर मच्छीमार आपल्या बोटीतून समुद्रात एक फेरी मारतात असे हे कोळी बांधवांचे समुद्राशी अतूट नाते!

हिंदू धर्मात नारळ अतिशय शुभ समजला जातो. कोणतेही शुभ कार्य करताना नकारात्मक गोष्टी घडू नयेत म्हणून सर्वप्रथम नारळ फोडला जातो. श्रावण महिना हा भगवान शंकराचा म्हणून तीन डोळे असलेल्या नारळाला भगवान शंकराचे फळ मानले जाते. त्याला ‘श्रीफळ’असे म्हणतात. श्री म्हणजे लक्ष्मी आणि फळ म्हणजे नारळ. त्या रात्री नाचगाण्याचा कार्यक्रमासोबत नारळ फोडणे हा खेळ खेळतात. या साऱ्या सणात पर्यावरण आणि सागरी जीवास हानी पोहोचणार नाही, याची काळजी घेतली जाते.

याच श्रावणी पौर्णिमेला जानवे परिधान करणारे ब्राह्मण विधिपूर्वक आपले जानवे बदलतात. याला ‘पोवती पौर्णिमा’ म्हणतात. याच श्रावण पौर्णिमेस म्हणजेच नारळी पौर्णिमेच्या दिवशी, संध्याकाळी भावा-बहिणीच्या अतूट नात्याचा सण ‘राखी पौर्णिमा’ म्हणजेच रक्षाबंधन साजरा केला जातो.

बहीण-भावाचे नाते रेशमाच्या धाग्याने बांधलेले आहे. बहीण भावाच्या उजव्या हाताच्या मनगटाला राखी बांधून आपल्या भावाचा उत्कर्ष व्हावा, त्याचे आरोग्य चांगले राहावे, सुख लाभावे म्हणून प्रार्थना करते. त्याचबरोबर भावाने आपले रक्षण करावे ही त्यामागची बहिणीची मनोकामना असते. राखीस साक्ष मानून भाऊ स्वतःला त्यांत गुंतवून बहिणीच्या संरक्षणाची जबाबदारी स्वीकारतो, ते रक्षाबंधन!

बहीण-भावाचे नाते अतूट का? कारण लहानपणापासून ती एकत्र वाढलेली असतात. निकटचा सहवास लाभलेला असतो. पूर्वी भावंडे खूप होती. एकत्र खेळणे, खोड्या काढणे, सर्वांनी मिळून एकत्र खाणे, जे आहे ते वाटून घेणे, अभ्यास घेणे. आई-वडिलांची शिकवण होती कितीही भांडा, पण भविष्यात एकमेकांची साथ सोडू नका. लग्नानंतर मार्ग बदलतात; परंतु जेव्हा भावंडं एकत्र येतात तेव्हा बालपणीच्या आठवणींचा खजिना बाहेर पडतो. त्यातही आईच्या हाताचे खाणे बहिणीकडे मिळते. भावा-बहिणीत भेट देण्यात एक माहेरची भावनिक ओढ असते. बहीण-भावाचे नाते हे आरशासारखे असते. तेथे खरं-खोटं चालत नाही. ती आपल्या आई-वडिलांची प्रतिबिंबे असतात. भावाचा आधार आणि बहिणीची माया हे अतूट नाते दरवर्षी रक्षाबंधनाला दृढ होत जाते.

आजची स्त्री कर्तृत्वान आहे, अनेक घरांत तीच पूर्ण कुटुंबाचा आधार असते. तरीही संकटाच्या वेळी भाऊ आपली रक्षा करेल, हा तिचा भावावर असलेला विश्वास तिने बांधलेल्या राखीतून दिसून येतो. राखीचा धागा हा नुसता दोरा नसून एक शील आहे. रक्षण हा त्याचा अर्थ आणि धर्मही आहे. राख म्हणजे सांभाळ कर! हा त्यामागचा संकेत आहे. “ज्या समाजात ऐक्य, एकता असते तो समाज सामर्थ्यशाली बनतो हा राखी पौर्णिमेचा संदेश आहे.” याच उद्देशाने १९०५ मध्ये रवींद्रनाथ टागोरांनी बंगालमध्ये हिंदू-मुस्लीम ऐक्य मजबूत करण्यासाठी राखी महोत्सव सुरू केला होता.

राखी बंधनाच्या दिवशी आद्यदेव वरुण आणि पावसाचा देव इंद्र यांची पूजा केली जाते; परंतु भारत हा भिन्न संस्कृतीचा आणि परंपरेची भूमी असल्याने प्रत्येक प्रदेशाचा रक्षाबंधनाचा देव वेगवेगळे आहेत.
हिंदू पुराणांत पहिली राखी साचीने इंद्राच्या हातावर बांधली. त्याची कहाणी अशी-

देव-दानवांच्या युद्धांत देवाचा राजा इंद्राला, दानवांचा राजा वृत्रासुराने युद्धाचे आव्हान दिले. इंद्राला विजय मिळावा म्हणून इंद्र पत्नी साचीने विष्णूकडून मिळालेला दोरा इंद्राच्या हातावर बांधला. त्या राखीच्या प्रभावाने इंद्राला युद्धात विजय, गेलेले गतवैभव परत मिळाले. या प्रसंगाची आठवण म्हणून मनगटावर राखी बांधण्याची प्रथा पडली.

सतराव्या शतकांत राणी कर्णावती स्वतः शूर योद्ध्या होत्या. कर्णवातीकडून हुमायूनला राखी म्हणून ब्रेसलेट पाठविले. हुमायून मुसलमान असूनही तत्काळ त्यानी मेवाड गाठले नि कर्णवातीच्या राज्याचे रक्षण करत राखीची लाज राखली होती. असे हे जातीधर्माच्या पलीकडले पवित्र बंधन आहे.

महाभारतात द्रौपदीने श्रीकृष्णाचे बोटाचे वाहते रक्त थांबण्यासाठी अंगावरच्या भरजरी शालूची चिंधी त्याच्या बोटाला बांधली नि भाऊबंध नाते निर्माण झाले. त्याच बोटाने श्रीकृष्णाने द्रौपदीला न संपणारा साडीचा पुरवठा करीत तिचे रक्षण केले.

भावा-बहिणीच्या या नात्याला फक्त कुटुंबापुरते मर्यादित न ठेवता राखी बांधून बिना रक्तसंबंधाचे बंधुत्वसमान नाते आज विस्तारले जात आहेत. हा बदल चांगला आहे. अशी नाती हवीत. त्यामुळे स्त्रीकडे बघायचा दृष्टिकोन बदलेल.

रक्षाबंधनात भावाने बहिणीला दिलेले रक्षणाचे वचन खूप महत्त्वाचे आहे. बहीण मग ती कुणाचीही असो, तिचा आदर राखा. हाच संदेश, हेच अतूट नाते राखी पौर्णिमा हा सण, आपली भारतीय संस्कृती देत आहे.

mbk1801@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -