पाऊस पडतो रिमझिम बाई…

Share
  • ओंजळ : पल्लवी अष्टेकर

आपल्या सुरेल आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी सविताताई अनेकांना ज्ञात आहे. तिची आई, मावशी व मामा अशी सर्वच मंडळी गायनात तज्ज्ञ. सविताताईंकडे घराण्याच्या परंपरेनुसार ही आवड उपजतच आली. त्यांनी काही नाटकांतही कामे केली असून तिला महाराष्ट्र राज्य नाट्य विभागाकडून उत्कृष्ट अभिनयासाठी ‘रौप्य पदक’ प्राप्त झाले आहे.

अनादी कालापासून सुरांचे महत्त्व आपण जाणून आहोत. सकाळी पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आपले मन प्रसन्न करतो. काही लोक मुद्दाम समुद्रात उसळणाऱ्या लाटांचा आवाज ऐकायला बाहेर पडतात. उंचावरून पडणाऱ्या पाण्याचा आवाज ही निसर्गनिर्मित संगीताची विविध रूपे. मानवनिर्मित संगीताची महती काही कमी नाही. अनेक गायन कलाकारांनी आपली भारतीय संस्कृती समृद्ध केली आहे. असे म्हणतात की, द्वापारयुगात भगवान श्रीकृष्णाच्या बासरीतून निघणाऱ्या संगीताने गोपी मंत्रमुग्ध होत असत. संगीत ऐकताना व्यक्तीच्या सर्व चिंता, दु:खं आणि वेदना विसरून जातात. संगीतामध्ये चिंता, नैराश्य, निद्रानाश इ. बरे करण्याचे सामर्थ्य आहे.

‘पाऊस पडतो रिमझिम बाई’ हे गदिमांचे सुंदर निसर्गगीत कोल्हापुरातील प्रसिद्ध गायिका सविता कबनूरकर ताईंचे अत्यंत आवडते. आपल्या सुरेल आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी सविताताई अनेकांना ज्ञात आहे. मी तिच्यासोबत मनमुराद गप्पा करायच्या असे ठरविले.

सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते सुबोध भावे दरवर्षी खंडोबा नवरात्र उत्सवात वेगवेगळ्या गायन कलाकारांना निमंत्रित करत असतात. सुबोध भावे यांच्या पुण्यातील जुन्या घरात खाली खंडोबाचे देऊळ आहे. तिथे वेगवेगळे गायक-गायिका येऊन आपली सेवा देतात. त्या काळात दररोज दोन तासांचा तरी गायनाचा कार्यक्रम असतो. सविताताईंचा तिथे एकूण दोन तास शास्त्रीय व नंतर सुगम संगीताचा कार्यक्रम चालला. ती म्हणते, “गायन हे क्षेत्र आल्हाददायक व चैतन्यमयी आहे. या क्षेत्रात असंख्य माणसं जोडली जातात, त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळते.”

सविताताईंच्या पणजोबांचे नाव गुंडूबुवा इंगळे. गायकी ही त्यांची जन्मजात कला व परंपरागत व्यवसाय. सविताताईंचे आजोबा केशवबुवा इंगळे हे इचलकरंजी येथील घोरपडे सरकारात राजदरबारी गायचे. हे संस्थान खालसा झाल्यावर तिचे आजोबा पुण्याला आले व त्यांनी ‘माधव संगीत विद्यालया’ची स्थापना केली.

सविताताईंकडे घराण्याच्या परंपरेनुसार ही आवड उपजतच आली. शालेय वयात नववी-दहावीपासून विविध कार्यक्रमांत तिने भावगीते गाण्यास सुरुवात केली. तिची आई, मावशी व मामा अशी सर्वच मंडळी गायनात तज्ज्ञ. सविताताईंच्या घराण्याचा हा ठेवा तिचा उत्साह द्विगुणीत होण्यासाठी कारणीभूत ठरला.

लग्नानंतर तिची मुलगी सायली वर्षा-दीड वर्षांची असताना तिने शिवाजी विद्यापीठातून दोन वर्षांचा गायनाचा डिप्लोमा पूर्ण केला. तेव्हा दोनही वर्षे ती नंबरात होती. तिने शास्त्रीय संगीतात एम. ए. ही पदवी प्राप्त केली आहे.

कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळतानाच तिने वासंती टेंबे यांच्याकडे जवळपास आठ ते दहा वर्षे जयपूर घराण्याची गायकी आत्मसात केली. त्यानंतर सुखदा काणे यांच्याकडे ती ग्वाल्हेर घराण्याची गायकी शिकली.

सविताताई दर खंडेनवमीला आपल्या वाद्यांची पूजा करते. जसे एखाद्या बाईला दागिन्यांची आवड असते व ती त्यांना जीवापलीकडे जपण्याचा प्रयत्न करते, तसेच गायक आपल्या वाद्यांवर प्रेम करतो. त्यादिवशी ती सरस्वती पूजन करते. सविताताईंच्या गायन क्लासचे नाव ‘स्वरमयी’ असे आहे. २००३ या वर्षी गुढीपाडव्याला सुरू झालेल्या या क्लासला वीस वर्षे पूर्ण झाली. मुख्य म्हणजे सविताताईंचा गायन क्लास एक दिवसही बंद नव्हता. परदेशातील अनेक विद्यार्थी तिच्याकडे ऑनलाइन संगीत शिकतात.

सविताताई म्हणते, “जगात भारतासारखी संस्कृती इतरत्र पाहायला मिळत नाही. त्यामुळे भारतीय संगीत शिकण्याची ओढ परदेशांत अनेकांना असते.” तिचे गायनाचे कार्यक्रम कोल्हापूर, सांगली, वाई, नरसोबा वाडी, पुणे, मुंबई येथे होतात. दरवर्षी फेब्रुवारीत वाई येथे ‘कृष्णावेणी’ या कार्यक्रमात भारतातून संगीतातले दिग्गज येतात.

सविताताई सांगते, “अंदाजे १५ वर्षांपूर्वीचा एक प्रसंग मला आवर्जून आठवतो. सुप्रसिद्ध गीतकार सुधीर मोघे यांच्या गाण्यांचा एक कार्यक्रम कोल्हापुरात करायचा असे ठरले. त्यांनी आपणहून गाण्यांचे निवेदन करणार असल्याचे सांगितले. गाण्यांचे निवेदन करताना त्यांनी आपल्या प्रत्येक गाण्याचा इतिहास, त्यामागचा अनुभव सांगितला. प्रत्येक गाणं त्यांनी कशासाठी लिहिलं, ते गाणं लिहिण्यामागची गोष्टं त्यांनी सुंदर रीतीने विशद केली. सविताताईने त्या कार्यक्रमात हे प्रत्येक गीत गायले. तिच्यासाठी हा आनंददायी व अविस्मरणीय प्रसंग होता. तेव्हा सुधीर मोघे म्हणाले, “मी चाल लावलेली गाणी तुला शिकवेन”; परंतु त्या आधीच ते निवर्तले, ही सल मनात राहून गेली आहे. अशा अनेक कलाकारांचे गुण, त्यांच्यातील कलाविष्कार पाहण्याचे भाग्य मला लाभले व त्यामुळे माझ्यातली कलाही मी समृद्धपणे घडवण्याचा प्रयत्न केला व त्याला श्रोत्यांनी दाद दिली, असे सविताताई म्हणते.
सविताताईने कोल्हापूर व सांगली आकाशवाणीसाठी अनेक जिंगल्ससाठी आपला आवाज दिला आहे. जाहिरातींसाठी तिने व्हाॅइस ओव्हरही केला आहे. डाॅक्युमेंट्री फिल्म्ससाठी तिने डबिंग केले आहे. रेडिओच्या ‘टोमॅटो व मिरची’ या चॅनल्सवरही तिने केलेल्या जाहिराती प्रसारित होतात. आपल्या आवडीच्या कामातून मिळणारा आनंद निर्भेळ असतो, असे ती म्हणते.

आपल्या भूतकाळातील आठवणीत रमून जाताना ती म्हणते, “शालेय वयात मी सातवीपासून सौभद्र, स्वयंवर, शारदा, एकच प्याला अशा अनेक नाटकांत काम केले.” सविताताईला राज्य नाट्य स्पर्धेत, तिने काम केलेल्या नाटकासाठी महाराष्ट्र राज्य नाट्य विभागाकडून उत्कृष्ट अभिनयासाठी ‘रौप्य पदक’ प्राप्त झाले आहे. तसेच शालेय वयात नाट्यवाचन, संगीत प्रवेश, एकांकिका यांमध्ये अनेक बक्षिसे मिळाली आहेत. ‘क्राइम डायरी’ नावाच्या मालिकेतही तिने काही भागांत काम केले.

सविताताईची मोठी कन्या सायली ही ‘ॲडव्हरटायझिंग एजन्सी’मध्ये नोकरी करते व धाकटी सिमरन जर्मन भाषा (C-1) पर्यंत शिकली व पुण्यात जर्मन भाषा शिकवते. पुण्यातील प्रसिद्ध नृत्यांगना शर्वरीताई जमेनीस यांच्याकडे ती कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेते आहे. “आयुष्याने जेवढे मला दिले आहे त्यात मी समाधानी आहे” असे सविताताई म्हणते. सध्या प्रसिद्ध लेखिका अरुणा ढेरे यांच्या ‘कृष्ण किनारा’ या पुस्तकातील ‘राधा’ या भागाचे अभिवाचनाचे प्रयोग ती व तिचे सहकलाकार करणार आहेत. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: ऋषभ पंत घरच्या मैदानावर दिल्लीला रोखणार?

मुंबई(ज्ञानेश सावंत): दिल्लीचा संघ सध्या अव्वल तीन संघा मध्ये आहे व पहिल्या फेरीत दिल्लीने लखनऊ…

13 minutes ago

Heat wave: उष्णतेच्या लाटेपासून असा करा बचाव…जाणून घ्या या टिप्स

मुंबई: सध्या सगळीकडेच उष्णतेच्या लाटेने नागरिक त्रस्त आहेत. राज्यातही तापमानाचा पारा दिवसेंदिवस चांगलाच वाढत आहे.…

45 minutes ago

कोकण रेल्वेने प्रवास करण्याआधी हे जरूर वाचा…

कोकणातून मुंबईकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्या ठाण्यापर्यंत धावणार रत्नागिरी : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या…

1 hour ago

‘चला वाचू या! सुट्टीतील वाचनालय’, मुंबई महानगरपालिकेकडून विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम

येत्या २ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत भरणार हे वाचनालय महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांसमवेत खासगी…

2 hours ago

चंद्रपूर: येत्या २४ एप्रिल पर्यंत उष्णतेचा ‘येलो अलर्ट’

चंद्रपूर : गेल्या आठवड्यापासून चंद्रपूर जिल्ह्याला तीव्र उन्हाचा तडाखा बसत असून दिनांक २१ ते २४…

3 hours ago

KKR vs GT, IPL 2025: गुजरातविरुद्ध घरच्या मैदानावर कोलकत्त्याचा लाजिरवाणा पराभव

कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…

10 hours ago