Tuesday, April 22, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथन...तरच जाता येतं ‘चांद के उस पार!’

…तरच जाता येतं ‘चांद के उस पार!’

दृष्टिक्षेप: अनघा निकम-मगदूम

‘अशक्य’ इथून ‘शक्य’ इथपर्यंतचा प्रवास पूर्ण करण्यासाठी या मार्गामध्ये महत्त्वाकांक्षा, निष्ठा, कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास याची आवश्यकता असते. तेव्हाच ही गोष्ट साध्य होते. याचे विद्यमान उदाहरण म्हणजे चांद्रयान-३ होय. यापूर्वीचे चांद्रयान इच्छित स्थळी पोहोचू शकले नाही म्हणून डोळ्यांत पाणी आलेल्या ‘इस्रो’च्या वैज्ञानिकांना अवघ्या जगाने पाहिले होते. पण ते डोळ्यांतले पाणी पराभवाचे किंवा निराशेचे नव्हते, तर “आम्ही पुन्हा प्रयत्न करू” हा दृढ निश्चय त्या अश्रूंमध्ये होता हे आता सिद्ध झाले आहे. म्हणूनच जे उर्वरित जगाला जमलं नाही ते भारतीय शास्त्रज्ञांनी करून दाखवलं. त्यांच्या या ‘करून दाखवलं’च्या आधी अपयशाची एक पायरी होती. मात्र ती पायरी अत्यंत आत्मविश्वासाने ओलांडून आज भारतीय शास्त्रज्ञांचं चांद्रयान-३ चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचले आहे.

आज या नव्या आधुनिक काळात जीवन जगताना पराभवाचे, अपयशाचे अनेक प्रसंग अनेकांच्या समोर येत असतात. काळ बदलला आहे. सामाजिक व्यवस्था पूर्णपणे बदलली आहे. एकेकाळी असलेली एकत्रित कुटुंब पद्धती आता ‘न्यूक्लिअर फॅमिली’ यामध्ये सामावली आहे. त्यातही यश, अपयश, सुख, आनंद याचे मापदंड बदलले आहेत. पूर्वी सुखाची झोप, पूर्ण जेवण आणि कुटुंबीयांसमवेत आनंदाचे चार क्षण ही सुखी कुटुंबाची, सुखी माणसाची व्याख्या होती. मात्र आता वेलफर्निश्ड फ्लॅट, मोठा बंगला, घरासमोर चारचाकी गाडी, घरातल्या प्रत्येकासाठी दुचाकी, दर महिन्याला येणारा गलेलठ्ठ पगार, तरुणाईची पब संस्कृती, आईच्या किटी पार्टी किंवा टारगेटच्या मागे धावत तासनतास ऑफिस कामांमध्ये असणं, तर वडिलांचे स्टेटस जपण्यासाठी असलेली धडपड या सगळ्यात सुखाची व्याख्या बदलली आहे. पण समुद्रामध्ये भरतीनंतर ओहोटी आणि ओहोटीनंतर भरती हे चक्र अविरत सुरूच आहे.

दिवसानंतर रात्र आणि रात्रीनंतर दिवस हा नियम निसर्गाने अद्यापही मोडलेला नाही. तसंच मनुष्याच्या जीवनामध्ये सुखासोबत दुःख येणं हे क्रमप्राप्त आहे. मात्र ज्या ‘सुख’ नावाच्या गोष्टीसाठी आजचा माणूस धडपडत आहे, ज्या वेगाने त्याला त्याच्या संकल्पनेनुसार सुखी व्हायचं आहे, ते पाहता आयुष्यात अडचणीसुद्धा त्याचं वेगाने येणारं आहेत. मात्र अशा वेळी येणाऱ्या दुःखाचा सामना करण्याची ताकद मात्र आज लोकांमध्ये दिसत नाही. सुखानंतर येणारं दुःखाचं ऊन हे सहन करावंच लागतं. हा निसर्ग नियमच समजून घ्यायचा नसल्याने दुःखासोबत लढण्याची ताकद सुद्धा दिसून येत नाही.

शाळेत पेपरमध्ये मार्क्स कमी पडले म्हणून आलेले हताशपण, बरोबरच्या मित्रापेक्षा माझ्याकडे असलेला मोबाइल कमी किमतीचा म्हणून आलेला नैराश्य, शेजारच्यापेक्षा माझा पगार कमी, शेजारच्यापेक्षा माझ्याकडे असलेली सुखाची साधने कमी म्हणून आलेलं नैराश्य या सगळ्यातून आपण जी सुखाची व्याख्या करतो, त्यातून या दुःखाचा सामना कसा करायचा हे आजच्या पिढीला कोणीच सांगितलेलं नाही. सुखं मोठं की समाधान हे कोणीच समजावलेलं नाही. त्यामुळेच अनेकांचा चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यू झालेला पाहायला मिळतो. यातून बाहेर पडण्यचा रस्ता कोणालाच माहीत नसल्याने अनेकदा आत्महत्या हा शेवटचा पर्याय स्वीकारताना दिसून येतो. कधी कधी आत्महत्येसोबत संपूर्ण कुटुंबच संपवण्याची एक वृत्ती हळूहळू समाजामध्ये बळवलेली दिसून येते. मी सुखी नाही, तर दुसराही सुखी होणार नाही, असं म्हणत दुसऱ्याचं आयुष्य पणाला लावले जातं आहे. हा सगळा परिणाम विस्कळीत झालेला समाज, विस्कळीत झालेली कुटुंब पद्धती यामुळेच असल्याचे दिसून येते.

खूप पूर्वी एकत्रित कुटुंब पद्धतीत येणाऱ्या संकटांचा सामना करण्याची ताकद ही आपोआपच कुटुंबामध्ये शिकवली जायची. एकावर आलेले संकट संपूर्ण कुटुंब झेलत असे. त्यामुळे दुःखसुद्धा हलके होत असे. आताच्या न्यूक्लिअर कुटुंबामध्ये आई-वडील आणि मूल यांनी एकमेकांमध्ये घातलेल्या भिंतींमुळे, अपयशाचा सामना करण्याची ताकद कोणालाच नसल्यामुळे एकमेकांचे दुःख एकमेकांचे अपयश वाटून घेण्यासाठीसुद्धा सध्या कोणीही पुढे आलेले दिसून येत नाही.

चांद्रयान-३ हे खूप मोठे स्वप्नं भारताच्या इस्रोने पाहिलं. पण ज्या वेळेला त्यांचा पहिला प्रयत्न फसला, त्यावेळेला साहजिकच दुःख होणं अपेक्षित होतं. मात्र त्याच वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या सर्वांना जवळ घेऊन त्यांच्या पाठीवर मारलेली थाप ही त्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी एक खूप मोठी गोष्ट होती. आपल्या कुटुंबप्रमुखाने आपल्या अपयशामध्ये खंबीरपणे उभं राहणं ही गोष्ट आज सर्वात मोठी गोष्ट आहे. “मी आहे तुझ्यासोबत” हा विश्वास कोणीतरी देणं आवश्यक आहे. आम्ही सगळेच देशवासीय तुमच्यासोबत आहोत, तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल हा संदेश आणि विश्वास पंतप्रधानांनी इस्रोच्या सर्व वैज्ञानिकांना दिला आणि त्यानंतर २३ ऑगस्ट २०२३ हा ऐतिहासिक दिवस भारतासह अवघ्या जगाला पाहिला.

‘वसुधैव कुटुम्बकम’ ही संकल्पना भारताची आहे. असं असताना ‘मी आणि माझं कुटुंब’, ‘मी माझा’ या संकल्पना बदलून जर आपण ‘आम्ही’ या संकल्पनेने जगत राहिलो, तर अनेक गोष्टींवर मात करणं शक्य होऊ शकतं. दुःख, अपयश दुसऱ्यांसोबत वाटलं की ते कमी होतं. जगण्याचा बळ देतं. जगण्यासाठी अशक्य गोष्ट शक्य करण्यासाठी, नवे मार्ग यातूनच मिळत असतात. भारतीय संस्कृतीमध्येच जगण्याची, यशस्वी होण्याची मूल्य दडलेली आहेत. मात्र आपण पश्चात्य संस्कृतीचं अनुकरण करतो. आपल्या परंपरेकडे दुर्लक्ष करतो. आज भारत महासत्ता होण्याच्या दिशेने पावलं टाकत आहे. अशा वेळेला इथली तरुणाई शरीरानं, आर्थिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या सुद्धा सक्षम असणे गरजेचे आहे.

दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या आत्महत्येच्या घटना, गुन्हेगारी या गोष्टी चिंताजनक आहेत. अशा वेळेला दक्षिण ध्रुवावर दिमाखात पोहोचलेल्या चंद्रयान-३ च्या प्रवासाची कहाणी उदाहरण म्हणून सर्वांनाच तितकीच उपयोगी आहे. एकीचं बळ आणि अपयशाचा सामना करण्याची हिम्मत या दोन्ही गोष्टी केवळ अशा मोठ्या घटनांसाठीच नाही, तर सर्वसामान्यातल्या सामान्य माणसासाठी सुद्धा जगण्याला बळ देतात. एकूणच मोठ्या गोष्टींतूनच आपल्याला जगण्याचा मार्ग मिळत असतो. चांगलं घडत असतं, त्यातून चांगल्या गोष्टी स्वीकारत आपल्या जीवनाशी त्या जोडतच या जीवनाचा मार्ग चालत आत्मविश्वासाने पुढे जायचं असतं.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -