
जाणून घ्या किती तापमान...
बंगळुरु : भारताने अद्वितीय अशी कामगिरी करत चांद्रयान-३ (Chandrayaan-3) मोहिम यशस्वी केली. चांद्रयान-३ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरल्यानंतर आता मुख्य कामाला सुरुवात झाली आहे. यासंबंधीची सर्व माहिती इस्रो (ISRO) सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवत आहे. नुकतेच विक्रमच्या ChaSTE पेलोडने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील मातीचे तापमान मोजले आहे व त्याची प्राथमिक माहिती पाठविली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर केलेली ही पहिली तपासणी आहे. असे करणारा भारत हा पहिला देश आहे. माहितीचा सविस्तर अभ्यास सुरू असल्याचे इस्रोने म्हटले आहे.
इस्रोने शेअर केलेल्या आलेखानुसार चंद्राच्या पृष्ठभागाचे तापमान अंदाजे ५० अंश सेल्सिअस आहे. खोलवर गेल्यावर तापमान झपाट्याने घसरते. ८० मिमीच्या आत गेल्यानंतर, तापमान -१० अंशांपर्यंत खाली येते. सूर्य चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर क्षितिजाच्या खाली किंवा वर फिरतो, त्यामुळे सूर्यप्रकाशाच्या वेळी तापमान १३० °F (५४°C) पेक्षा जास्त होते. शास्त्रज्ञांच्या मते, प्रकाशाच्या या काळातही, उंच पर्वतावर काळ्या सावल्या पडतात. काही खड्डे कायमस्वरूपी सावली असलेल्या भागात आहेत ज्यांनी अब्जावधी वर्षांमध्ये दिवसाचा प्रकाश पाहिला नाही, तेथे तापमान −३३४°F ते −४१४°F (−२०३°C ते −२४८°C) पर्यंत असते.
Chandrayaan-3 Mission:
Here are the first observations from the ChaSTE payload onboard Vikram Lander.
ChaSTE (Chandra's Surface Thermophysical Experiment) measures the temperature profile of the lunar topsoil around the pole, to understand the thermal behaviour of the moon's… pic.twitter.com/VZ1cjWHTnd
— ISRO (@isro) August 27, 2023
इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ म्हणाले की, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश आहे. दक्षिण ध्रुवावरील चंद्राचा पृष्ठभाग, पर्वत आणि दऱ्यांमुळे अतिशय गुंतागुंतीचा आहे आणि मोजणीतील थोडीशी चूक देखील लँडर मोहीम अयशस्वी होऊ शकते. त्याचबरोबर प्रज्ञान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावरून काढत असलेले फोटो इस्रोच्या स्थानकांपर्यंत पोहोचण्यास वेळ लागेल, अशीही माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले की, ISRO यामध्ये अमेरिका, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियासारख्या इतर देशांच्या ग्राउंड स्टेशनची मदत घेत आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर वातावरण नसल्यामुळे सर्व सावल्या गडद दिसत आहेत आणि त्यामुळे स्पष्ट फोटो मिळणे कठीण होत असल्याचेही त्यांनी सांगितले.