Saturday, July 20, 2024
Homeसाप्ताहिककोलाजChandrayaan 3 : चंद्र आहे साक्षीला...

Chandrayaan 3 : चंद्र आहे साक्षीला…

  • विशेष : प्रमोद काळे , ज्येष्ठ अवकाश संशोधक.

चांद्रयान-१ आणि चांद्रयान-२ च्या अनुभवानंतर आरंभलेल्या भारताच्या चांद्रयान-३ चे यश अफाट आणि अचाट असून या मोहिमेमुळे समस्त भारतीयांना ऊर्जेचा मोठा स्त्रोत दिला आहे, असे म्हणता येईल. चांद्रयान-३ मोहिमेचा १४ दिवसांचा कृतिशील कालावधी समस्त मानवजातीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्यात भविष्याचा नूर आणि सूर बदलण्याची ताकद आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.

ब्रह्मांडाचा समस्त सजीवसृष्टीवर होणारा बरा-वाईट परिणाम अभ्यासणारी भारतीय अभ्यासप्रणाली एकीकडे, पृथ्वीशी जवळीक साधणाऱ्या आणि कमी-अधिक प्रमाणात तिच्यावर प्रभाव दाखवणाऱ्या गृह-ताऱ्यांचा अभ्यास एकीकडे आणि या मालिकेतील ग्रह-उपग्रहांची मानवी भावनाभावनांशी सुरेख सांगड घालत त्यांना आपल्या कल्पनाविश्वात ध्रुवाचे स्थान देणारी बाळबोध संस्कारमाला एकीकडे… ‘चांद्रयान-३’च्या आनंदमयी यशानंतर भारताने जणू आकाशमालांशी सख्य राखणारी ही साधी-सोपी भावना, त्यांच्या आपल्यावरील परिणामांचा परामर्श आणि भविष्यात त्यांच्यापासून होणारे लाभ या सर्वांचा त्रिवेणीसंगम साधला आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ‘चांद्रयान-३’ च्या यशामुळे आता खरोखरच मुलांना कल्पनाविलासाची सैर घडवून आणणारा चांदोमामा हाकेच्या अंतरावर आल्याचा भास होत आहे. तो लिंबोणीच्या झाडामागे लपला नसून पृथ्वीपासून अमूक अंतरावर आहे, हे कदाचित आता आपले बालगोपाळही नेमकेपणाने सांगू शकतील. इस्रोचे हे बाळकडू भारतातील मुला-मुलींना, युवक-युवतींना ब्रह्मांडाकडे पाहण्याची एक नवी आणि आश्वासक दृष्टी देऊन जाईल. साहजिकच वर्तमानाबरोबरच भविष्य घडवण्यात ही मानसिकता मोलाची भूमिका बजावेल. म्हणूनच भारताचे चंद्रावरील आरोहण अत्यंत महत्त्वाचे आहे.

‘चांद्रयान-३’ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सेफ लँडिंग केले आणि असे करणारा जगातील प्रथम देश होण्याचा बहुमान मिळवला. आता पुढचे १४ दिवस भारताने पाठवलेले हे चांद्रयान अभ्यास करून महत्त्वपूर्ण माहिती पृथ्वीवर पाठवण्याचे काम करणार आहे. त्याच्याकडून मिळणाऱ्या माहितीद्वारे अनेक प्रश्नांची, समस्यांची, कुतूहलाची, अज्ञानाची गुपिते उघडण्यास मदत होणार आहे. अर्थात पुढचे १४ दिवस चंद्रावर प्रकाश असल्यामुळे तशा स्थितीत काम करता यावे यासाठी रोव्हर खास पद्धतीने संरक्षित केले आहे. प्रकाशाचा विपरित परिणाम होऊ नये, यासाठी त्यावर मल्टीलेअर इन्सुलेशन लावले गेले आहे. यामुळे तीव्र प्रकाशात रोव्हर गरम होणार नाही. १४ दिवसांनंतर प्रकाश नाहीसा झाला की, चंद्रावरील परिस्थिती आमूलाग्र बदलेल. चंद्रावरील पृष्ठभागाचे तापमान उणे १७० सेल्सियसपर्यंत खाली जाईल. तापमान इतके खाली जाते, तेव्हा रोव्हरमधील बॅटरी काम करू शकत नाहीत. खेरीज अंधार असल्यामुळे त्याला कोणतीही ऊर्जा उत्पन्न करता येणार नाही. त्यामुळेच १४ दिवसांनंतर परत चंद्रावर प्रकाश येईल, तेव्हा बॅटरीज चांगल्या असल्या तरच रोव्हर सुरू राहील, आपल्याला सोलर पॅनलचा उपयोग करता येईल, वीज उत्पन्न होईल आणि रोव्हरच्या आतील उपकरणे काम करू शकतील. पण सध्या तरी आपण याबाबत नक्की काय होईल, याचे अनुमान लावू शकणार नाही.

अमेरिका आणि चीनने चंद्रावर आपले यान पाठवले तेव्हा त्यावर न्युक्लिअर पॉवर सोर्सही लावला होता. त्यामुळे चंद्रावर रात्र असताना उपकरणाला उष्णता उत्पन्न करता येत होती. त्यामुळेच ही याने तिथे अधिक काळ टिकू शकली. मात्र चांद्रयानामध्ये ही प्रणाली नसल्यामुळे १४ दिवसांनंतर काय होईल, हा एक अभ्यासाचा आणि औत्सुक्याचा विषय असणार आहे. अपेक्षेप्रमाणे कमालीच्या थंड तापमानामुळे लँडर आणि रोव्हरने काम करणे बंद केले तरी ती उपकरणे कायमस्वरूपी चंद्रावरच राहतील. ती पृथ्वीवर आणली जाणार नाहीत. चांद्रयान-३ साठी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाची जागा निवडण्यामागेही काही कारणे आहेत. चांद्रयान-१ मोहिमेमध्ये चंद्रावर पाणी असल्याचे स्पष्ट झाले होतेच. प्रकाश पूर्णपणे पोहोचत नसलेल्या खाचखळग्यांमध्ये हे पाणी असल्याचे संकेतही मिळाले होती आणि असे खाचखळगे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आहेत. या भागात पाणी टिकू शकेल पण ते बर्फाच्या स्वरूपात असेल, असाही कयास बांधला गेला. म्हणूनच त्याचा साकल्याने शोध घेण्यासाठी चांद्रयान-३ साठी या जागेची निवड करण्यात आली. एकदा चंद्रावर पाणी आहे आणि ते कुठे आहे हे समजले, तर चंद्रावर वसाहत करायची झाल्यास आपल्याला त्याचा उपयोग करून घेता येईल. सूर्यप्रकाशाचा वापर करून या पाण्याचे विघटन करून आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळवू शकतो. जे इंधन म्हणून वापरणे शक्य आहे. अशा पद्धतीने चांद्रयान-३ विविध प्रकारच्या संशोधनाला दिशा देण्याचे काम करणार आहे.

चंद्राच्या पृष्ठभागावर अलगद उतरलेला रोव्हर थोडा दूर म्हणजे ५०० मीटर अंतर चालणार आहे. अर्थातच त्याची गती अत्यंत मंद असेल. आपण जाणतो की, चंद्रावर रेतीपेक्षाही बारीक माती आहे. काही ठिकाणी ती खूप खोलवर जाते, तर काही ठिकाणचा पृष्ठभाग दगडांनी व्यापलेला आढळतो. असे असताना रोव्हरने चालायला सुरुवात केली की, या ध्रुवावर थोडी कठीण जमीन कुठे आहे, हेदेखील समजणार आहे. रोव्हर या कठीण जमिनीवरूनच पुढे चालत जाईल. या प्रवासात तो तिथले फोटो आणि अन्य महत्त्वपूर्ण माहिती पृथ्वीवर पाठवेल. या सर्व माहितीचा उपयोग आगामी चांद्रमोहिमांसाठी अत्यंत मोलाची भूमिका बजावेल. ‘चांद्रयान-३’ने चंद्रावर यशस्वीरीत्या सॉफ्ट लँडिंग केल्यामुळे भविष्यात मानवाला तिथे पाठवायचे असेल, तर त्यांना घेऊन जाणारे मोठे यान याच पद्धतीने चंद्रावर उतरवणे शक्य होणार आहे. अर्थातच मानवाला चंद्रावर घेऊन जाणारे रॉकेट आता वापरलेल्या रॉकेटपेक्षा बरेच मोठे असेल आणि मानवाला पुन्हा पृथ्वीवर आणण्याच्या क्षमतेचे असेल. म्हणजेच आताचे यश आगामी गगनयान मोहिमेसाठी मैलाचा दगड ठरेल, याबाबत शंका नाही.

यापूर्वी भारताने चांद्रयान-१ आणि चांद्रयान-२ चंद्रावर पाठवले. त्यातील चांद्रयान-१ ला पूर्ण यश मिळाले. ते योग्य कक्षेत चंद्राभोवती फिरत राहिले, त्यातून उपकरण बाहेर पडले आणि त्याचे क्रॅश लँडिंग का होईना, पण घडून आले. चांद्रयान-२ मध्ये ऑर्बिटर आणि लँडर होते. त्यातील ऑर्बिटर अजूनही चांगल्या पद्धतीने काम करत आहे. दुर्दैवाने खाली येताना शेवटच्या काही क्षणात लँडर चंद्रावर आदळले आणि क्रॅश झाले. मात्र आधी उल्लेख केल्यामुळे ऑर्बिटरद्वारे आजही चंद्रावरील चांगल्या प्रकारचे फोटो, इमेजेस मिळत आहेत. त्यांचा उपयोग करूनच चांद्रयान-३ चे लँडर आपण चंद्रावर पोहोचवू शकलो. मुख्य म्हणजे आधीच्या ऑर्बिटरची उत्तम स्थिती लक्षात घेऊन चांद्रयान-३ मध्ये ऑर्बिटर पाठवण्याची गरज नसल्याचे तज्ज्ञांनी ठरवले होते. त्याऐवजी या यानात चंद्रावरून पृथ्वीचे फोटो घेणारे एक महत्त्वपूर्ण उपकरण पाठवण्यात आले आहे. त्या प्रतिमांचा उपयोग करूनच आपल्याला पाणी, जीवसृष्टी असणारा ग्रह दुरून कसा दिसतो हे समजू शकेल. इतक्या दुरून पृथ्वीकडे बघितल्यावर ती कशी दिसते हे समोर असल्यामुळे आपण अन्य ग्रहांचा अभ्यास आणि निरीक्षण अधिक सजगतेने आणि अभ्यासपूर्वक करू शकू. आणखी एक बाब म्हणजे चंद्रावरील प्रकाश कसा परावर्तित होतो, याचाही अभ्यास केला जाणार आहे. त्यामुळे आपल्या सौरमालेच्या बाहेरच्या सृष्टीचा अभ्यास करताना दुरूनही तिथे जीवसृष्टी असू शकेल ससकी नाही, हे आपल्याला कळू शकेल.

पृथ्वीवर भूकंप होतात. पृथ्वीच्या गाभ्यामध्ये अत्यंत गरम असा लाव्हा असतो आणि तो वर येतो. पृथ्वीच्या गाभ्यातील प्लेट्स हलतात आणि हे देखील भूकंपाचे एक कारण असते. या पार्श्वभूमीवर चंद्रावरही भूकंप होतो का, याचा अभ्यास चांद्रयान-३ मोहिमेमध्ये केला जाणार आहे. त्यासाठी चंद्राच्या गर्भातील हालचालींचा अभ्यास करणारे, नोंद घेणारे एक उपकरण जोडण्यात आले आहे. त्याद्वारे चंद्रावरील कंपनांचा, अंतर्गत हालचालींचा अभ्यास करण्यास योग्य ती दिशा मिळणे शक्य होणार आहे. याशिवाय रेझर रेट्रो रिफ्लेक्टर नावाचे एक उपकरणही आहे. या उपकरणाद्वारे प्रकाशाची दिशा जाणून घेत पृथ्वी आणि चंद्र यातील अंतराचे नेमके ज्ञान मिळणे शक्य होणार आहे. अगदी एक वा दोन सेंटिमीटरच्या अचूकतेने हे अंतर मोजता येऊ शकेल. पुढच्या संशोधनासाठी याचाही खूप चांगला उपयोग होऊ शकतो. एकूणच अशा एक ना अनेक अर्थांनी या ताज्या आणि रसरशीत यशाची फळे आपल्याला मिळणार आहेत. भारतीय अवकाश संशोधन संस्था अशी अनेक यशस्वी पावले टाकण्यास सज्ज होत आहे.

(शब्दांकन : स्वाती पेशवे)
(लेखक ‘इस्रो’मधील माजी वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -