
- टर्निंग पॉइंट : युवराज अवसरमल
विठ्ठल काळे छोट्या भूमिकेमध्ये अभिनयाची छाप पाडून मोठ्या भूमिका प्राप्त करणारा लेखक व अभिनेता आहे. त्याची कथा असणारा व त्यात स्वतः भूमिका करणारा त्याचा ‘बाप ल्योक’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आहे.
विठ्ठलच बालपण सोलापूर जिल्ह्यातील, बार्शी तालुक्यातील पानगाव येथे झाला. संत तुकाराम विद्यालयात त्याचे शालेय शिक्षण झाले, तर श्री शिवाजी विद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण झाले. महाविद्यालयात गेल्यावर अभिनय करण्याची संधी त्याला मिळाली. महाविद्यालयात युवक महोत्सवमध्ये त्याने भाग घेतला होता. इंग्रजी विषयामध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर त्याने पुण्यातून इंग्रजी विषयातून (साहित्य) एम.ए. केलं. पुणे युनिव्हर्सिटी मध्ये फिल्म मेकिंगचा कोर्स होता. त्यामध्ये त्याला प्रवेश घेता आला नाही; परंतु त्याचे काही मित्र तेथे होते. त्यामुळे तो तेथे जायचा. तेथे अभिनयाचे व प्रॉडक्शनचे काम करायचा.
तेथे एका शॉर्ट फिल्ममध्ये त्याने काम केले होते. ते काम पाहायला ज्येष्ठ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचा सहाय्यक आला होता. त्याचे काम पाहून त्याला चंद्रकांत कुलकर्णींच्या ऑफिसमध्ये बोलावण्यात आले. त्यावेळी ‘संत तुकाराम’ या मराठी चित्रपटात प्रथम अभिनय करण्याची संधी मिळाली. हा चित्रपट त्याच्या जीवनातील टर्निंग पॉइंट ठरला. त्यामध्ये त्याने लक्ष्मण लोहाराची भूमिका केली होती. अभिनेता प्रवीण तरडेंनी त्यात त्यांच्या वडिलांची भूमिका केली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांच्याकडून भरपूर गोष्टी त्याने शिकून घेतल्या. या क्षेत्रात तो यशस्वी होईल की नाही याबद्दल तो साशंक होता; परंतु तेथे त्याच्या अभिनयाचे कौतुक झाल्याने त्याचा आत्मविश्वास वाढला.
त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे यांचा ‘समन्वय’ हा ग्रुप त्याने जॉइन केला. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत भाग घेतला. पृथ्वी थिएटरमध्ये भरणारा ‘थेस्पो’ या नाटकाच्या फेस्टिव्हलमध्ये त्याने भाग घेतला. हॉलिवूडनिर्मित ‘हॉटेल मुंबई’, फ्रान्स निर्मित ‘दी फील्ड’, ‘सैराट’, ‘पुनश्च हरिओम,’ ‘कागर’, ‘राक्षस’, ‘घर, बंदूक, बिर्याणी’ या चित्रपटात त्याने भूमिका केल्या.
वडील-मुलाच्या नात्यावर आधारित कथा विठ्ठलने लिहिली. ती दिग्दर्शक मकरंद मानेंना आवडली. नाईंटी नाइन प्रोडक्शनचे विजय शिंदे व बहुरूपी प्रोडक्शनच्या शशांक शेंडे व मकरंद माने यांनी ‘बाप ल्योक’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाचे शूटिंग तुळजापूर परिसरात झाले. चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे असून त्यांच्या मुलाची भूमिका विठ्ठल काळे याने साकारली आहे. या दोघांसोबत अभिनेत्री पायल जाधव, नीता शेंडे चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट अनेक नानाविध नात्यांची गुंफण असून बाप-लेकाच्या नात्यातील मायेचा पदर उलगडून दाखविणारा आहे.