क्रिकेट हा आपला एकच धर्म असे मानणाऱ्या आपल्या देशात क्रिकेटप्रेमींची संख्याही काही कमी नाही. प्रत्यक्षात जरी खेळायला मिळत नसले तरी क्रिकेट जगताशी संबंधित अनेक गोष्टींचे त्याला आकर्षणच नाही तर आवडही असते. अशा क्रिकेट चाहत्यांना आयपीएल म्हणजे एक वेगळी पर्वणीच असते हीच वाचक प्रेमींची आवड लक्षात घेऊन दैनिक ‘प्रहार’ने क्रिकेट रसिकांना आयपीएल स्पर्धेच्या वेळी त्यांना क्रिकेट पाहता पाहता व त्यातील रंजक गोष्टी वाचता वाचता त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून दैनिक प्रहारने प्रश्नमंजूषा सादर केली होती. या स्पर्धेत तब्बल ३७ हजार प्रहार वाचकांनी भाग घेतला होता. त्यातील ७०० स्पर्धकांमधून निवडक ६५ विजेत्यांना आज प्रहार कार्यालयात बक्षीस वितरणाचा कार्यक्रम पार पडला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून म्हाडाच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले, रणजी क्रिकेटपटू अंकुश जयस्वाल व ज्येष्ठ छायाचित्रकार प्रकाश पार्सेकर उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सोडतीद्वारे भाग्यवान विजेत्यांची निवड करण्यात आली. यावेळी आपल्या प्रस्तावनेत दैनिक ‘प्रहार’चे संपादक डॉ. सुकृत खांडेकर म्हणाले की, आयपीएल स्पर्धेने क्रिकेटप्रेमी जगाला वेड लावले. या ५६ दिवसांत क्रिकेट वाचकांना कशाप्रकारे जोडता येईल, यावर विचार सुरू होता. वाचकांना क्रिकेटबरोबरच त्यांच्या विचारशक्तीला वाव मिळेल, अशी प्रश्नमंजूषा सुरू करण्याची संकल्पना सुचली व ही स्पर्धा तब्बल ५६ दिवस चालली. या स्पर्धेला वाचकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. त्यातील भाग्यवान विजेत्यांना आज बक्षीस मिळवण्याची संधी मिळाली आहे. याच्याही पुढे दैनिक प्रहार निरनिराळे उपक्रम राबवून वाचकांशी जोडला जाईल, असे ते म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर महाव्यवस्थापक मनिष राणे, मुख्य लेखा परीक्षक ज्ञानेश सावंत, वरिष्ठ उपसंपादक दीपक परब व सह संपादक महेश पांचाळ उपस्थित होते. यापुढे वर्ल्डकप सुरू होत असून तेव्हाही प्रहार मोठ्या स्तरावर ही स्पर्धा आयोजित करणार असल्याची घोषणा महाव्यवस्थापक मनिष राणे यांनी यावेळी केली. या कार्यक्रमात संपूर्ण आयपीएलचे वृत्तांत लेखन करणारे वरिष्ठ उपसंपादक दीपक परब, उपसंपादक रोहित गुरव व कलात्मक मांडणी करणारे निलेश कदम यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
यापुढे वर्ल्ड कप सुरू होत असून तेव्हाही प्रहार मोठ्या स्तरावर ही स्पर्धा आयोजित करणार असल्याची घोषणा महाव्यवस्थापक मनिष राणे यांनी यावेळी केली. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन उपमहाव्यवस्थापक कौशल श्रीवास्तव यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रणव किरण भांबुरे यांनी केले. यावेळी स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. त्यामध्ये साक्षी दिनेश सडवेलकर, नागेश गणाचारी, सुवर्णा मोरे, नवीन महादेव शिर्के, विजय भिकू उतेकर, विलास गिरकर, भूषण तांडेल, पूर्वा रेडकर, धोंडी परब आणि सुवर्णा भगवान गोलटकर आदींचा समावेश आहे.