
वाहतूक कोंडीत अडकले सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण... आणि मग...
मुंबई : सध्या राज्यात खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ऐन गणेशोत्सवाच्या वेळी चाकरमान्यांना गावी जाताना अनेक अडथळे येण्याची शक्यता आहे. याचे कारण म्हणजे १५ हजार कोटींचा खर्च करुनही मुंबई-गोवा महामार्ग (Mumbai Goa highway) अजून पूर्ण झालेला नाही. प्रवाशांचे खूप हाल होत असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण (Ravindra Chavhan) सातत्याने बांधकामाचा आढावा घेत आहेत. पण आज याच कामात असताना त्यांनाच वाहतूक कोंडीचा (Traffic jam) फटका बसला आहे.
मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करताना मंत्री रविंद्र चव्हाण वाहतूक कोंडीत अडकले होते. अखेर ताफा विरुद्ध दिशेने काढत त्यांनी कसाबसा वाहतूक कोंडीतून मार्ग काढला. त्यामुळे इतकी वर्षे कोकणवासीय या खड्ड्यांमधून आणि त्यामुळे होणार्या वाहतूक कोंडीतून किती हाल सोसत प्रवास करत असतील याचा अखेर मंत्री महोदयांना आज अंदाज आला असावा अशी प्रतिक्रिया कोकणवासीयांमधून व्यक्त केली जात आहे.
आज सकाळपासूनच मंत्री रविंद्र चव्हाण यांचा पाहणी दौरा सुरु होता. यावेळेस मुंबई-गोवा महामार्गावर पेणच्या दिशेने जाणारी एक बस बंद पडली. त्यामुळे ही वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. परंतु तास-सव्वातास झाल्यानंतरही ही बस या ठिकाणाहून हलवण्यात आली नाही. मागच्या बाजूला वाहनांची गर्दी वाढल्याने बस हलवणे कठीण झाले हाते. त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला उभी करुन एका बाजूने गाड्या पुढे सोडण्यात येत होत्या. या गोष्टीचा प्रवाशांसोबतच मंत्री चव्हाणांना देखील फटका बसला.
चाकरमान्यांच्या वाट्याला सुखकर प्रवास येईल का?
मंत्री रविंद्र चव्हाण बसचे कारण पुढे करत असले तरी मुंबई-गोवा महामार्गावर इतर दिवशीही मोठमोठ्या खड्ड्यांचा व वाहतूक कोंडीचा प्रवाशांना सामना करावा लागतो. या गोष्टीकडे लक्ष देण्याऐवजी निवडणुकीचे वारे वाहू लागल्याने महामार्गावरून सध्या राजकारण सुरू आहे. भाजपचे कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मात्र जुलै २०१९ मध्येच या गोष्टीची दखल घेतली. चौपदरीकरणाचे रखडलेले काम पूर्ण होत नसल्याने २०१९ मध्ये नितेश राणे यांनी संबंधित अभियंत्याला चिखलाने आंघोळ घातली होती. त्यांनी केलेल्या अनोख्या आंदोलनाचे महत्त्व कोकणवासीयांना आता कळले आहे. परंतु मंत्री महोदयांना आता फटका बसल्यावर याची जाणीव होईल का आणि गणेशोत्सवाआधी चाकरमान्यांच्या वाट्याला सुखकर प्रवास येईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.