
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा
बंगळुरु : दक्षिण आफ्रिका व ग्रीसच्या दौर्यावरुन भारतात दाखल होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) बंगळुरु येथील इस्रोच्या (ISRO) मुख्यालयात आले. त्यानंतर शास्त्रज्ञांशी संवाद साधण्यासाठी ते इस्रो कॅम्पसमध्ये पोहोचले. यावेळी त्यांनी एक मोठी घोषणा केली. २३ ऑगस्ट हा भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जावा असा क्षण दरवर्षी भारतात 'राष्ट्रीय अवकाश दिन' (National Space Day) म्हणून साजरा करण्यात येणार आहे. भारतीय शास्त्रज्ञांकडून प्रेरणा घेत आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणार्या तरुणांचे मनोबल वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असं पंतप्रधान म्हणाले. यामुळे हा दिवस प्रत्येक भारतीयाच्या कायम लक्षात राहणार आहे.
भारताने अद्वितीय अशी कामगिरी करत चांद्रयान-३ (Chandrayaan-3) मोहिम फत्ते केली. संपूर्ण जगाने याची दखल घेत भारताचे अभिनंदन केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (South pole of Moon) उतरणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला. या अभिमानास्पद बाबीचा भारतात दरवर्षी राष्ट्रीय अवकाश दिनाच्या निमित्ताने सोहळा साजरा करण्यात येणार आहे. प्रत्येक भारतीयाला गर्व वाटेल अशीच ही बाब आहे.
चांद्रयान-३ चे चंद्रावर यशस्वी लँडिंग केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रो टीमच्या शास्त्रज्ञांचे अभिनंदन केलं. त्यांचं मन आनंदानं भरून गेलं असल्याचंही यावेळी पंतप्रधानांनी सांगितलं. ते म्हणाले की, "तुम्ही केलेल्या कामाची माहिती देशवासियांना मिळाली पाहिजे. हा प्रवास सोपा नव्हता. मून लँडरचं सॉफ्ट लँडिंग सुनिश्चित करण्यासाठी, शास्त्रज्ञांनी आर्टिफिशियल देखील बनवलं. विक्रम लँडर उतरवून त्याची चाचणी घेण्यात आली. इतक्या परीक्षा देऊन मून लँडर तिथे सुखरुप पोहोचलं, त्यामुळे त्याला यश मिळणार हे निश्चित होतं. आज जेव्हा मी पाहतो की, भारतातील तरुण पिढी सायन्स, स्पेस आणि इनोवेशन या संदर्भात जाणून घेण्यासाठी उत्सुक आहे, त्यामागे हेच यश आहे."
भारतातील लहान मूलही आपल्या वैज्ञानिकांमध्ये भविष्य पाहत आहे
मंगळयान आणि चांद्रयानचं यश आणि गगनयानच्या तयारीनं देशाला एक नवं चैतन्य दिलं आहे. आज भारतातील थोरामोठ्यांच्या तोंडी चांद्रयानाचं नाव आहे. आज भारतातील लहान मूलही आपल्या वैज्ञानिकांमध्ये भविष्य पाहत आहे. संपूर्ण भारताच्या पिढीला तुम्ही जागृत करून ऊर्जा दिली, हेही तुमचं कर्तृत्व आहे. तुम्ही तुमच्या यशाची खोल छाप सोडली आहे. आजपासून रात्रीच्या वेळी चंद्र पाहणाऱ्या कोणत्याही लहान मुलाला विश्वास बसेल की, माझा देश जसा चंद्रावर पोहोचला आहे, तेवढीच हिंमत आणि चैतन्य त्या मुलामध्येही आहे. मुलांमध्ये स्वप्नांची बीजं तुम्ही पेरली आहेत. ती वटवृक्ष बनतील आणि विकसित भारताचा पाया बनतील. तरुण पिढीला सतत प्रेरणा मिळावी यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. २३ ऑगस्ट रोजी भारतानं चंद्रावर तिरंगा फडकावला, तो दिवस भारत 'राष्ट्रीय अवकाश दिवस' म्हणून साजरा करेल. हा दिवस आपल्याला नेहमीच प्रेरणा देत राहील.