रवींद्र तांबे
पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रत्येक जण आपले घर व आपल्या घराच्या आसपासच्या परिसराची साफसफाई करतात. त्यानंतर पाऊस सुरू झाल्यावर घरासमोरील परिसर हिरवागार दिसत असला तरी घराच्या बाजूचे तीन ते चार फूट असणारी हिरवळ मुळासकट काढून उकिरड्यावर फेकून दिली जाते. त्यामुळे घराच्या बाजूची हिरवळ काढल्याने घर अधिक आकर्षक लांबून दिसते. त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती सुद्धा दूर होते.
उन्हाळ्यात लोकवस्तीच्या आजूबाजूला किंवा दूरठिकाणी केरकचरा तसेच अस्वच्छता पाहायला मिळते. त्याची खरी स्वच्छता पाऊस मुसळधार पडल्यावर व नद्या तुडुंब भरून वाहू लागल्यावर होते. मागील महिन्यात पावसाने जनजीवन विस्कळीत जरी केले तरी खरी स्वच्छता करून टाकली. पहिल्या पावसाने काही ठिकाणी कचरा वाहून न गेल्याने पाण्यात कचरा कुजल्याने दुर्गंधी येत होती. मी लहान असताना माझी आये म्हणायची. मोठो पावस लागत नाय तोपर्यंत घाण धुपान जाणार नाय. आता अधूनमधून पावसाच्या धारा लागत असल्या तरी मागील महिन्यात धो धो पावसाने सर्व काही धुपून गेले आहे. म्हणजे आता स्वच्छ झाले असे म्हणत असलो तरी अनेकांवर नैसर्गिक संकट आलेले होते. त्यात काहींना जीवाभावाची माणसेही कायमची गमवावी लागली. असे असले तरी आता वर्षभर बघायला नको. ही स्वच्छता नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची असते.
लोक मांगर, झोपडी, चाळ, इमारत, बंगलो आदी ठिकाणी राहतात. ग्रामीण भागात बरीच घरे बंद स्थितीत आहेत. त्यामुळे घराच्या चारी बाजूला गवत वाढल्याने व रात्री रातकिड्यांच्या आवाजामुळे पावसाळ्यामध्ये रात्रीचे भयानक दिसते. कारण बरेच दिवस घर बंद असल्याने अस्वच्छतेचे साम्राज्य दिसून येते. नंतर सणासुदीच्या दिवशी घरमालक आल्यानंतर वाडीतील मंडळींना घेऊन सफाई करतात. मात्र ग्रामीण भागात वेळच्या वेळी सफाई केली नाही, तरी दुर्गंधी किंवा आरोग्याला अपायकारक होत नाही. शहरातील चित्र मात्र वेगळे असते. सुखा कचरा आणि ओला कचरा करा असे वर्गीकरण महानगरपालिका वारंवार सांगत असते. तसे प्लास्टिकचे डबे अर्थात कचरा कुंड्या सुद्धा महानगरपालिकेमार्फत ठिकठिकाणी ठेवले जातात. मात्र आजही त्याचा बऱ्याच प्रमाणात वापर केला जात नाही. काही इमारतीमध्ये खिडकीतून कचरा फेकला जातो. याचा त्रास तळ, पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या रहिवाशांना जास्त होतो.
आपल्या महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक गावामध्ये नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जनजागृती करीत असताना गावची स्वच्छता अतिशय महत्त्वाची असते. स्वच्छता असेल तरच आपण आरोग्यदायी जीवन जणू शकतो. यात कोकण पहिल्या स्थानी आहे, असे म्हणावे लागेल. कारण स्वच्छतेच्या बाबतीत देशपातळीवर कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गौरव करण्यात आलेला आहे. जिल्ह्यात शासकीय डॉक्टरांची कमतरता भासत असली तरी फार कमी लोक सर्दी, ताप आणि खोकल्याने आजारी पडतात. सन २०१६ पासून पावसाळ्यात नागरिक माकड तापाने आजारी पडत असत. त्यात दोघांचा मृत्यू झाला तरी आता माकड ताप नियंत्रणात आहे. हे केवळ स्वच्छतेमुळे शक्य झाले आहे.
ग्रामीण भागामध्ये आपला परिसर साफ करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी शाळकरी मुले करीत असतात. ही जमेची बाजू असली तरी प्रत्येक नागरिक आपली जशी काळजी घेतो तशी निसर्गाची सुद्धा काळजी घेणे गरजेचे आहे. म्हणजे आपले घर तसेच आपला परिसर स्वच्छ ठेवा असे म्हणावे लागणार नाही. यासाठी राज्यकर्त्यांनी जनतेच्या आरोग्याकडे सुद्धा थोडा वेळ काढून लक्ष द्यायला हवा.
राज्यात नव्याने प्रकल्प राबवीत असताना त्याचे स्थानिक लोकांवर काय परिणाम होतील याचे स्पष्ट चित्र लोकांना सांगितले पाहिजे. त्याचे चांगले-वाईट परिणाम नागरिकांना सांगणे गरजेचे असते. तरच लोक त्या प्रकल्पाचे स्वागत करतील. केवळ शक्तिप्रदर्शन न करता कोणताही प्रकल्प स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊन सुरू केल्यास त्यांचेही मोलाचे सहकार्य राहील. याचा परिणाम अशा प्रकल्पामुळे आजूबाजूचा परिसर स्वच्छ राहील. त्यासाठी वेळच्या वेळी काळजी घेणे गरजेचे आहे. अशा वेळी घनकचरा विभागाची स्थापना करून दररोज स्वच्छता करून घ्यावी. तसेच घनकचऱ्याची योग्य त्या ठिकाणी विलेवाट लावावी. सुखा कचरा जाळून टाकावा.
ज्या ठिकाणी कचऱ्याची विलेवाट लावण्यात येणार त्या परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही याची सुद्धा काळजी घ्यावी लागेल. अर्थात त्या परिसराची स्वच्छता अतिशय महत्त्वाची असते. तसेच वेळच्या वेळी जंतुनाशक फवारणी करावी. जेणेकरून टाकलेल्या कचऱ्याची दुर्गंधी येणार नाही याची काळजी घ्यावी. चारी बाजूने कुंपण असावे. त्याचप्रमाणे कुंपणाला लागून वस्ती असू नये. घनकचरा विभागात काम करणाऱ्या सेवकांची सुद्धा काळजी घ्यावी. त्यांची वेळच्या वेळी डॉक्टरी तपासणी करावी. त्यांना विशेष अतिरिक्त भत्ता देण्यात यावा. अशा क्षेत्रात काम करणारे बऱ्याच प्रमाणात वसनाच्या आहारी जातात. त्यात अनेक कुटुंबे कर्जबाजारी झालेली दिसून येतात. त्यात काहींनी आत्महत्या सुद्धा केलेल्या आहेत. त्यामुळे अशा सेवकांना किमान दोन महिन्यांतून व्यसनमुक्ती कार्यक्रम राबविण्यात यावा. जेणेकरून ते व्यसनाधीन होणार नाहीत याची काळजी घेतील. अशा सेवकांच्या वसाहती सुद्धा पान व स्टारच्या पिचकाऱ्यांनी रंगलेल्या असतात. तसे कॅम्प सुद्धा वसाहतीत राबवाव्यात. आता पावसाने थोडीफार विश्रांती घेतली तरी पावसाळा ॠतू संपण्यापूर्वी केवळ गावात नव्हे, तर राज्यात प्रत्येकांनी आपले स्वच्छ घर आणि स्वच्छ परिसर केला पाहिजे.