
जितेंद्र आव्हाडांच्या कोल्हापुरी चप्पलेवर हसन मुश्रीफांचे चोख प्रत्युत्तर!
कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार यांच्या गटातील आमदार जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हापूरमधील सभेत अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर (Jitendra Awhad vs Hasan Mushrif) जोरदार टीका केली होती. त्यावर 'मी नाय त्यातली.. म्हणणा-या जितेंद्र आव्हाड यांच्या लपवलेल्या गोष्टी उघडकीस आल्यावर लोकच त्यांना असली कोल्हापुरी पायताणाने हाणतील,' अशी प्रतिक्रिया हसन मुश्रीफ यांनी दिली.
जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हापूर सभेत अजित पवार गटाच्या नेत्यांवर जोरदार टीका केली होती. आव्हाड यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांना थेट गद्दार म्हटलं होतं. गद्दारी काही लोकांच्या रक्तातच असते, ते आता महाराष्ट्राला दिसत आहे. जे साप बिळात होते, ते बाहेर पडले आहेत. या सापांना चेचण्यासाठी आपल्याला पायतानाचा वापर करावा लागेल. कोल्हापुरात पायताण प्रसिद्घ आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राने करावा, असा टोला आव्हाडांनी लगावला होता.
त्यावर हसन मुश्रीफ म्हणाले की, जितेंद्र आव्हाड मला फार ज्युनियर आहेत. त्यांनी पवार साहेबांवर काय जादू केली, मला माहित नाही. पण त्यांनी ठाण्यात पक्ष संपविण्याचं काम केलं आहे. त्यांनी अजित पवार आणि आमच्याविषयी असं बोलायला नको. ज्यावेळी आम्ही सत्तेत जाण्यासाठी शरद पवारांना पत्र दिलं होतं. त्यात ५३ स्वाक्षऱ्या होत्या. त्यात जितेंद्र आव्हाड यांचीही स्वाक्षरी होती. तेव्हा कुठं गेला होता तुझा धर्म असा सवाल करत मुश्रीफ म्हणाले, कोल्हापुरात चप्पल प्रसिद्ध नाही, कापशीची चप्पल प्रसिद्ध आहे. ती बसली की कळेल त्यांना, असे मुश्रीफ म्हणाले.