Gaav tasa changla : नाटक तसं चांगलं, पण उत्सवांना टांगलेलं…!

Share
  • पाचवा वेद : भालचंद्र कुबल

संगीत रंगभूमी, बालरंगभूमी, प्रायोगिक रंगभूमी, दलित रंगभूमी, लोकरंगभूमी अशा अनेकविध नाट्यप्रकारांनी भारतातीलच नव्हे, तर जागतिक रंगभूमीवर नाट्यचळवळ रंगकर्मीनी जिवंत ठेवली आहे. महाराष्ट्राचे पुरोगामित्व सिद्ध करणारी कामगार रंगभूमी यापैकीच एक. जगाच्या इतिहासातही कामगार रंगभूमीला एक बलस्थान प्राप्त झालेले आहे. साधारणतः ज्या काळात रशियात या रंगभूमीचा उगम झाला, त्याच सुमारास महाराष्ट्रातही ही नाट्यचळवळ सुरू झाल्याचे आढळते. त्यातही तिचे उगमस्थान मुंबई आहे, हा इतिहास विसरून चालणार नाही. कामगारांनी, कामगारांसाठी, कामगारांचे प्रश्न मांडणारी ती कामगार रंगभूमी अशी हिची व्याख्या ढोबळमनाने करता येईल.

मध्य मुंबईतील लालबाग, परळ, शिवडी, आगरबाजार, सातरस्ता, वरळी, काळाचौकी या विभागात असलेल्या मिलमजुरांनी कामगार रंगभूमी बहरास आणली. सुरुवातीला गणेशोत्सव, नवरात्र अथवा सामूहिक सणासमारंभापुरती मर्यादित असलेली ही रंगभूमी १९३९ ते १९५० या कालावधीत झपाट्याने फोफावत गेली. साधारणपणे १९४८ ते १९६३ हा कामगार रंगभूमीचा सुवर्णकाळ समजला जातो. स्वातंत्र्याच्या चळवळीपासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापर्यंत कामगार रंगभूमीचे योगदान विसरता येणार नाही. कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि नाशकातल्या मिलमजुरांच्या मनोरंजनाचे उद्दिष्ट समोर ठेऊन सादर होणारी निर्भेळ करमणूक राजकीय आणि सामाजिक चळवळीचा भाग बनली. लालबागचे हनुमान थिएटर, दामोदर हाॅल, गिरगावातील भांगवाडी नाट्यगृह अशा १५ ते २० नाट्यगृहात कामगार रंगभूमीवरील नाटके सातत्याने होत असत. नाटके लिहिणे, दिग्दर्शित करणे, त्यात अभिनय करणे, संगीत, नेपथ्य ते तिकीट विक्री या सर्व कामांत मिलमध्ये काम करणारे मिलमजूर हिरीरीने भाग घेत. त्यात सर्वात आवड असलेला कामगारवर्ग हा कोकणातला होता. होळी, गोकुळाष्टमी, गणपतीसाठी हमखास गावी जाणारा आणि गावात चाकरमानी म्हणून मिरवणारा हा वर्गच या रंगाकृतींचा ‘नाट्यनिर्माता’ होता. कित्येक नाटके कामगार रंगभूमीवर, केवळ मनोरंजन हा हेतू न बाळगता, समाजप्रबोधनाचे कार्य करणारी होती. सामाजिक प्रश्नाला वाचा फोडण्याचे हमखास माध्यम म्हणून या कामगार रंगभूमीकडे पाहिले जाई. मात्र ८० च्या दशकातील मिल कामगारांचा संप जसा या वर्गाला उद्ध्वस्त करून गेला, तसाच तो मुंबईत स्थित असलेली कामगार रंगभूमी पार लयाला घेऊन गेला. दुर्दैवाने आज मुंबईत नामशेष होत चाललेल्या मराठी माणसासोबत कामगार रंगभूमीच्या खाणाखुणा पुसल्या जाऊ शकतात ही भीती आम्हा नाट्यअभ्यासकांच्या मनात घर करून राहिली आहे.

मात्र त्यातही एक नवी रंगभूमी कोकणातील तीनही जिल्ह्यात बाळसे धरू लागली, ती म्हणजे “उत्सवी रंगभूमी”. पोटापाण्याची आबाळ झालेला कामगारवर्ग ८०च्या दशकात कोकणातल्या आपल्या मूळ गावात स्थिरावला आणि गेल्या ४० वर्षांत विविध उत्सवांच्या जागरणाप्रीत्यर्थ या उत्सवी रंगभूमीचा कायापालट झाला. कामगार रंगभूमीच्या संक्रमणावस्थेतून निर्माण झालेली उत्सवी रंगभूमी हे जागतिक पातळीवरील ‘थिएटर ट्रान्सफाॅरमेशन’चे एकमेव उदाहरण असेल. अशा या रंगभूमीवरील कित्येक नाटके मुंबईतील चाकरमानी जगवताहेत आणि अशीच पार्श्वभूमी असलेले “गाव तसो चांगलो” हे मालवणी नाटक पहाण्याचा योग आला.

‘गाव तसो चांगलो’चा मी पाहिलेला २१वा प्रयोग दामोदर नाट्यगृहात हाऊसफुल्ल गर्दीत पार पडला. विनोदाच्या बाजाने जाणारे हे नाटक जाता जाता सद्यपरिस्थितीशी निगडित एक सामाजिक प्रश्न मांडून मनोरंजनाचा निखळ अनुभव देते. मालवणी संस्कृतीशी एकरूप झालेले हे नाटक, तुम्ही जर गावकऱ्यांच्या नजरेतून पाहिलंत, तर मिळणारा आनंद काही औरच असेल. उत्सवांनिमित्त सादर होणारी अशी नाटके बहुतांशी १०-१२ पात्रांची, संघर्षमय कथानकाची, टाळ्यांच्या संवादाची आणि हॅप्पी एंडिंगची असतात. “गाव तसो चांगलो” हे नाटकही यास अपवाद नाही.

हरहुन्नरी तात्या गावात येणाऱ्या औष्णिक विद्युत प्रकल्पाविरोधात स्वतःच्या मालकीच्या जमिनी कुठल्याही अामिषावर विकायच्या नाहीत, हे गावसभेत ठरून सुद्धा मुलाच्या हट्टासाठी विकतात. गावात सादर होणाऱ्या नाटकासाठी मुंबईहून हिरोईन आणली जाते. तिची बडदास्त राखण्यासाठीचे गावकऱ्यांचे प्रयत्न, गावकार अप्पाच्या मुलीसाठी झुरणारे तीन तीन प्रियकर, सरपंचाचे तात्यांसाठीचे रचलेले षडयंत्र आणि प्रकल्पाविरोधात गावकऱ्यांची झालेली एकजूट अशी अनेक उपकथानके असलेली नाट्यकथा अडीज पावणेतीन तासांच्या कालावधीत कुठेच रेंगाळत नाही. विशेष म्हणजे पहिल्या अंकात कथासूत्राची पार्श्वभूमी तयार करण्यासाठी खर्ची घातलेला वेळ, दुसऱ्या अंकात सव्याज भरून काढला जातो. दुसऱ्या अंकात कथानक इतक्या वेगाने पुढे सरकते की, विनोदाला दाद द्यावी की, कथानकातील आघात पचवावेत, हेच कळंत नाही. यशस्वी नाटकाची वीण ही प्रेक्षकांना घट्ट बांधून ठेवण्यात यशस्वी झालेली असते. या नाटकाबाबतही तेच म्हणावे लागेल.

कोकणी माणसांच्या गजालींसारखी या नाटकाची लेखनशैली आहे. ती एका दिशेनेच जाईल, याची खात्री नाही. लेखक किशोर तळवडकर यांना या नाटकाद्वारे अनेक मुद्दे मांडायचे असल्याचे सतत जाणवत राहाते; परंतु प्रत्येक मुद्यासाठी स्वतंत्र नाटक न लिहिता एकाच दगडात जेवढे मारता येतील तेवढे पक्षी ते मारतात. नाटकाच्या सुरुवातीपासून विचार केला तर बाहेरील नाट्यसंस्थेचे नाटक न आणता गावातल्या मंडळींनीच नाटक सादर केले पाहिजे हा अट्टहास, एकाच मुलीवर तिघांनी प्रेम करण्यासाठी केलेला विनोदी प्रयत्न, औष्णिक विद्युत प्रकल्पास विरोध दर्शवणारा संघर्ष, सरपंचाने तात्यांना कोणा तलाठ्याच्या मृत्यूबाबत संशयित म्हणून गुंतवल्याचे षडयंत्र, हे षडयंत्र उघड व्हावे म्हणून नटी बनून आलेल्या सीबीआय इन्स्पेक्टरचा सरपंचावर उलटवलेला डाव, त्यांच्या मुलाचे शहरी चंगळवादासाठी जमीन विकण्याचे नाटक अशा एक नाही, तर अनेक समांतर ट्रॅक्सवरून कथानक धावत रहाते. त्यामुळे एक मुद्दा संपला की त्यातून दुसरा मुद्दा लेखकाने मांडूनच ठेवलेला असतो. गावाकडच्या गजाली या अशाच असतात, त्याना एकसंधपणा कधीच नसतो. तसे या नाटकाच्या कथासूत्राबाबत बोलता येईल, मात्र प्रत्येक प्रसंगास विनोदाची दिलेली फोडणी प्रेक्षकांचे चैतन्य जागृत ठेवते, त्यामुळे लेखक किशोर तळवडकर यांचे अभिनंदनच करावे लागेल. मात्र नाटक मालवणी आहे म्हणून वस्त्रहरण या नाटकाचा प्रभाव सिद्धच करायला पाहिजे असे नाही. नाटकाच्या एकंदर रचनेवर हा प्रभाव सातत्याने जाणवत राहतो. ज्या एका गोष्टीवर नाटकाचा डोलारा पेलला जातो ती म्हणजे अभिनय. नाटकातील सर्व पात्रांचे अभिनय दृष्ट लागेल, असे झाले आहेत.

श्रीराम धुरी, रामचंद्र सारंग, अर्चना बामणे, श्रुती कदम, रेखा गावकर यांच्या सफाईदार अभिनयास तोड नाही. कुठलेही अभिनय प्रशिक्षण न घेता केवळ दिग्दर्शकीय मार्गदर्शनावर प्रेक्षकांना गुंतवून ठेवण्याच्या या मंडळींच्या अभिनय कौशल्याने आपण भारावून जातो. या सर्वांची मोट बांधणारे नंदू तळवडकरांचे मात्र विशेष अभिनंदन करायला हवे. स्वतः दिग्दर्शन करता करता, प्रमुख भूमिकेसाठी अभिनयदेखील करायचा ही सोपी गोष्ट नाही. त्यामुळे बहुआयामी व्यक्तिमत्त्वाप्रमाणे नंदू आपल्याला नाटकात जाणवत राहातो. कधी कधी वाटतं की या मंडळींना योग्य संधी उपलब्ध न झाल्याने किंवा स्ट्रगलिंगची ताकद अपुरी पडल्याने, ही मंडळी मागे राहिली असावीत. हौसेखातर नाटक करणे, हे कायमस्वरूपी नशिबी आल्याने व्यावसायिक मूल्य या नटमंडळींना कधी मिळालेच नाही. मिळालीच, तर एखाद्या वाहिनीवरच्या मालवणी नाटकातील तुटपुंज्या भूमिकेवर समाधान मानणाऱ्या या रंगकर्मींचा स्ट्रगल हा वाखाणण्याजोगाच आहे.

नंदू जोशी, प्रकाश मालडकर, योगेश शेडगे, किशोर तळवडकर, उदय पाटकर आदी सहकलाकारांनीही “गाव तसो…”ला योग्य ती साथ दिली आहे. अब्दुल मुजावर, श्री रामेश्वर कलामंच, अनुजा थिएटर्स आणि स्मितहरी प्राॅडक्शनद्वारा निर्मित “गाव तसो चांगलो” ही नाट्याकृती आहे चांगली. पण ती उत्सवाला टांगली गेल्याने शहरात बघायला मिळेलच, याची खात्री मात्र देता येत नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

या २ घरांच्या उंबरठ्यावरूनच मागे जाते लक्ष्मी, कुटुंबात राहते आर्थिक तंगी

मुंबई: आचार्य चाणक्य यांनी अशा घरांचे वर्णन निती शास्त्रात केले आहे जिथे लक्ष्मी मातेला जायला…

3 hours ago

विधिमंडळात विश्वविजेत्या क्रिकेटपटूंचा सत्कार; मुख्यमंत्र्यांकडून ११ कोटींचे बक्षीस

मुंबई : आयसीसी टी २० विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने दैदीप्यमान कामगिरी करत विश्वचषक जिंकला. भारतीय…

3 hours ago

Motorolaने भारतात लाँच केला नवा फ्लिप फोन, ५ इंचाचा कव्हर डिस्प्ले

मुंबई: Motorola Razr 50 Ultra गुरूवारी भारतात लाँच करण्यात आला. हा कंपनीचा नवा क्लॅमशेल-स्टाईलचा फोल्डेबल…

4 hours ago

Video: बरं झालं सूर्याच्या हाताला बॉल बसला नाहीतर…विधानभवनात रोहितची मराठीत फटकेबाजी

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकून आलेल्या टीम इंडियाचे गुरूवारी मुंबईत अतिशय भव्य दिव्य स्वागत झाले.…

5 hours ago

‘ब्रेन इटिंग अमिबा’ मुळे केरळमध्ये तीन मुलांचा मृत्यू

थिरुवनंतपुरम : केरळमध्ये दुषित पाण्यात आंघोळ केल्यामुळे १४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. अमिबामुळे मेंदूला…

5 hours ago

T20 World Cup नंतर ऑलिम्पिकमध्ये फडकणार तिरंगा? राहुल द्रविडने पंतप्रधान मोदींना दिले वचन!

मुंबई: भारतीय खेळाडू टी-२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर मायदेशात परतले आहेत. यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वातील टीम इंडियाच्या…

6 hours ago