ठाणे : ठाणे शहरातील वाहतूक कोंडीमुळे शहरात होणारे वाढते प्रदूषण लक्षात घेता जलवाहतुकीला चालना मिळावी यासाठी खासदार राजन विचारे आमदार असल्यापासून प्रयत्न करीत आहेत. त्याला अखेर यश आले असून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मार्फत पहिल्या टप्प्यात केंद्र शासनाच्या सागरमाला व राज्य शासनाच्या मदतीने उभ्या राहणाऱ्या जेट्टीना १०० कोटीला प्रशासकीय मान्यता मिळाली असून कोलशेत, भाईंदर, काल्हेर व कल्याण या चार ठिकाणी जेट्टीची कामे सुरू होत आहेत. यामधील कोलशेत येथील जेट्टीची पाहणी करण्यात आली. या कोलशेत जेट्टीसाठी ३६ कोटीची मान्यता मिळाली असून याठिकाणी रो-रो व प्रवासी जेट्टीच्या कामाला आवश्यक लागणाऱ्या पर्यावरण खात्याच्या परवानग्या दि. २० जून २०२२ रोजी CRZ व MCZMA ची मिळाली असून सदर काम बफर झोन मध्ये असल्याने हायकोर्टाची परवानगी मिळणे बाकी आहे. निविदा प्रक्रियेचे काम पूर्ण झालेले आहे परवानगी मिळताच कोलशेत व खाडी पलीकडे काल्हेर येथे याचे काम सुरू होणार आहे.
तसेच येथे येणाऱ्या प्रवाशांसाठी प्रतीक्षालय व मार्गिका तयार करून या ठिकाणी चौपाटी विकसित करण्यात आलेली आहे. याचे काम २०२१ पासून सुरू होऊन या चौपाटीसाठी ५ कोटी निधी खर्च करण्यात आलेला आहे. त्यामध्ये प्रवाशांसाठी शेड, येण्यासाठी मार्ग, पार्किंग व्यवस्था, प्लॅटफॉर्मवर फरशी, फ्लेमिंगो स्टॅच्यू, रेलिंग व इलेक्ट्रिकल वर्क व इतर सुविधा करण्यात आल्या आहेत.
या पाहणी दौऱ्याकरिता खासदार राजन विचारे, महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाचे कार्यकारी अभियंता अजित मोहिते, उप अभियंता प्रशांत सानप उपस्थित होते
घोडबंदर जेट्टी वरून पर्यटकांसाठी वॉटर स्पोर्ट्स व फेरी बोट सुरू करा – खासदार राजन विचारे यांची मागणी
घोडबंदर येथे तयार झालेल्या जेटीवरून प्रवासी बोट व पर्यटकांसाठी वॉटर स्पोर्ट्स, फेरीबोट सुरू करा अशी मागणी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे खासदार राजन विचारे यांनी केलेली आहे. आज या जेट्टीची खासदार राजन विचारे यांनी पाहणी केली असून याचे काम अंतिम टप्प्यात पूर्ण होत असल्याने लवकरात लवकर या सुविधा सुरू करा अशी मागणी केलेली आहे. तसेच महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाच्या अधिकाऱ्यांना खासदार राजन विचारे यांनी ज्या काही सेवा सुरु कराल त्यामध्ये स्थानिक नागरिकांना प्राधान्य द्या जेणेकरून त्यांनाही रोजगार उपलब्ध होईल अशा सूचना त्यावेळी देण्यात आल्या.
केंद्र शासनाच्या सागरमाला व राज्य शासनाच्या मदतीने ५०-५० टक्के अनुदानाने या जेट्टीचे सन २०१८ रोजी काम सुरू करण्यात आले होते. या जेट्टीची लांबी ५०.५x७ .४० मीटर व रूंदी ३१.५०x७.४० मीटर असून एल टाईप मध्ये ही जेट्टी विकसित केलेली आहे. या कामासाठी ७ कोटी ३५ लाख खर्च करण्यात आले. असून या जेट्टी कडे जाणारा २५० मीटरचा रोड विकसित करण्यात आलेला आहे.