Friday, July 5, 2024
Homeसंपादकीयविशेष लेखबहीण असावी, तर सुमन कुलकर्णीसारखीच...!

बहीण असावी, तर सुमन कुलकर्णीसारखीच…!

भालचंद्र कुबल

ती खऱ्या अर्थाने सुवासिनी होती. ५० वर्षांहून अधिक काळ संसार केल्यानंतर गृहस्थाश्रमात रमलेली सीमा एक आदर्शवत गृहिणी होती. काही वर्षांपासून त्यांना अल्झायमर या असाध्य रोगाने ग्रासले होते. रमेश देव-सीमा देव यांच्या लग्नाच्या ५०व्या वर्धापन दिनी प्रेक्षकांना उल्हसित करून गेलेले त्यांचे शेवटचे दर्शन कुणीही विसरू शकत नाही. रमेश देवांच्या नावापुढे घट्ट चिकटलेले सीमा देव हे नाव सिनेरसिकांच्या मनावर पती-पत्नी म्हणूनच कोरले गेले होते, ते सुवासिनी, जगाच्या पाठीवर, मोलकरीण, यंदा कर्तव्य आहे, या सुखांनो या, आनंद यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमुळेच.

सीमा देवांचा स्वभाव किंबहुना एकूणच अंदाज रमेश देवांच्या विरुद्ध होता. रमेश देव म्हणजे उत्साहाचा, चैतन्याचा खळाळता झराच; परंतु सीमा देव कडक शिस्तीची, धोरणी, महत्त्वाकांक्षी पण प्रामाणिक स्वभावाची होती. पडद्यावर आणि पडद्यामागे अशी दोन-दोन रूपे त्यांना मान्य नव्हती. त्यामुळेच की काय, महिला प्रेक्षक वर्गाला हा त्यांचा स्वभाव अतिशय भावत असे. त्यांची आणि रमेश देवांची झालेली ट्रेनमधली पहिली भेट, त्यातही ‘आंधळा मारतो डोळा’ चित्रपटात गाजलेला खलनायक म्हणून ओळख झाल्याने काहीसा तिरस्कार अशा संमिश्र स्नेहभावातून सुरू झालेले प्रेमप्रकरण आणि लगेचच झालेलं लग्न या सर्व सुरसकथा त्यांच्या मुलाखतींमधून समोर आल्या आहेत.

गिरगावातल्या राममोहन शाळेत शिकणारी नलिनी सराफ नवरात्रीत खेळल्या जाणाऱ्या मेळ्यात, उत्सवप्रसंगी होणाऱ्या खेळ्यात, गणेशोत्सवातील नाटकात हिरीरीने भाग घेत असे. जयश्री गडकरांची ओळखही याच काळातली. दोघीही मेळ्यांमध्ये दृष्ट लागेल, असे नृत्य करीत असतं. पुढे योगायोगाने रमेश देवांशी झालेली भेट व दोघांनाही मिळालेले चित्रपट जरी निरनिराळे असले तरी ही जोडी एकमेकांसाठी लकी ठरली. ‘आलिया भोगासी’ या चित्रपटातून सीमा देव यांचे पदार्पण झाले. संगीतकार कल्याणजी आनंदजी यांच्या वाद्यवृंदात त्या गायिका होत्या.

सीमा-रमेश देव हे प्रेमप्रकरण तब्बल चार वर्षे चालल्यानंतर १९६३ साली दोघेही विवाह बंधनात अडकले. रमेश देव हे सीमा देवांपेक्षा १२ वर्षांनी मोठे होते. पुढे अजिंक्य आणि अभिनय दोन अपत्ये त्यांना झाली. सिनेसृष्टीत अजिंक्य कलाकार म्हणून तर अभिनय दिग्दर्शक, कथा-पटकथा लेखक म्हणून स्थिरावले आहेत. गृहिणी म्हणून त्यांची कारकीर्द तेवढीच यशस्वी होती.

‘जेता’ चित्रपटातील पुनर्पदार्पणाचे औचित्य साधून त्यांची मुलाखत घेताना सहज विचारले होते की, तुम्ही तुमचे आत्मचरित्र का लिहीत नाही? त्यावर त्या विषण्णपणे हसल्या होत्या. “माझ्या आयुष्यात फारसे संघर्ष प्रसंग आलेच नाहीत आणि जे काही आले, त्याला सामोरं जायचं काम माझ्या नवऱ्यानंच केलं, लग्नाअगोदर माझ्या घरच्यांची थोडीफार कुरबूर असे; परंतु आमच्या लग्नाच्या निर्णयाने तीदेखील मोडीत निघाली.” मात्र पुढे त्यांना झालेल्या अल्झायमर या आजाराबद्दल ऐकलं आणि आत्मचरित्राच्या सर्व आशा धुळीला मिळाल्या. आयुष्याच्या एका उंचीवर पोहोचल्यानंतर आपलाच भूतकाळ आपल्याच विस्मृतीत जावा यासारखे दुःख नाही; परंतु आपल्या कौटुंबिक जीवनातल्या गोष्टी आपल्यापुरत्याच मर्यादित असाव्यात, या निर्णयावर त्या पत्नी आणि आई या नात्याने ठाम होत्या. कुठलेही सेलिब्रिटी स्टेटस त्यानी उभ्या आयुष्यात कधीही बाळगले नाही. म्हणून दोन्ही मुलांना सर्वसामान्य मराठी कुटुंबातील शिस्त त्यांनी लावली.

एकदा ‘आता होती गेली कुठं’च्या चित्रीकरणात फाइट सीनमध्ये अजिंक्य हाताला ट्यूबलाइट लागल्याने जखमी झाला होता. प्रथमोपचार वगैर सर्व व्यवस्थित झाले होते; परंतु त्याला टेन्शन होतं, आई काय बोलेल याचं आणि कदाचित ती उद्या शूटिंगलाही पाठवणार नाही. शिवाय निर्माता दिग्दर्शकाला फोन करून सांगण्याची तिची हिम्मत होती. मध्यमवर्गीय गौड सारस्वत ब्राह्मण घरातील कर्मठपणावर मात करत नाटक, सिनेमा आणि नंतर स्वतःच्या मालकीचे प्राॅडक्शन हाऊस अशा कौटुंबिक अर्थार्जनाच्या आलेखातही त्यांचा मोलाचा वाटा होता.

२०१७ साली पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये त्याना सिनेसृष्टीच्या सेवेबद्दल जीवनगौरव देऊन सन्मानित करण्यात आले होते. जवळपास ८० मराठी-हिंदी चित्रपटात भूमिका केल्याबद्दल राजा परांजपे स्मृती जीवनगौरव पुरस्कारही त्यांना प्रदान करण्यात आला होता. जुने ते सोने, सरस्वतीचंद्र, आनंद, अपराध, दादा, सर्जा या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष लक्षणीय ठरल्या. अगदी २०२० साली प्रकाशित झालेल्या ‘जेता’ या चित्रपटापर्यंत विविध भूमिका साकारण्याचं त्यांचं अभिनय सामर्थ्य उल्लेखनीय होते. कुठल्याही गाॅसिपमध्ये न अडकता सोज्वळ गृहिणी आणि सकस अभिनेत्री म्हणून त्यांच्या चाहत्या वर्गाला सुखावणारी कारकीर्द वयाच्या ८१व्या वर्षी संपली. निरनिराळ्या कौटुंबिक भूमिकांमधून भेटलेल्या सीमा देवांनी ‘आनंद’मधील राजेश खन्नाच्या बहिणीच्या रूपात अजरामर करून ठेवलेल्या सुमन कुलकर्णीला चित्रपट रसिक विसरू शकत नाहीत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -