अपुऱ्या सुविधांमुळे रुग्णांची गैरसोय
भाईंदर : मीरा भाईंदरमध्ये झपाट्याने वाढत असलेली लोकसंख्या त्यातच एकमेव असलेले शासकीय रुग्णालय त्यात सुध्दा वैद्यकीय सुविधा आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा अभाव, वैद्यकीय साधनांची कमतरता यामुळे रुग्णांची होणारी गैरसोय पाहता भाईंदर पश्चिमेचे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी रुग्णालयच व्हेंटिलेटरवर असल्याची स्थिती झाली आहे, त्यामुळे वैद्यकीय सेवेअभावी कळवा महापालिका रुग्णालयात झालेल्या मनुष्यहानी दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
मीरा भाईंदर शहरात भारतरत्न पंडित भीमसेन जोशी ह्या शासकीय रुग्णालयात अवघ्या २०० खाटा आहेत. यासाठी शासन मंजुर ३६५ डॉक्टर व कर्मचारी आहेत. शासनाच्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेसह इतर अनेक योजनांचा लाभ रुग्णांना उपलब्ध आहे. तसेच राज्य शासनाच्या मोफत वैद्यकीय चाचणी जसे की ईसीजी, क्ष किरण, सी. टी. स्कॅन, रक्त तपासणी यासह मोफत औषधाची सुविधा उपलब्ध आहे. परंतु वैद्यकीय साधनांची कमतरता, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा अभाव यामुळे यातील एकही सुविधा सुरळीत नाही.
रुग्णालय प्रशासनाकडून राज्य सरकारकडे पुरेशा आर्थिक निधीची तसेच रिक्त पदे भरण्यासाठी मागणी करूनही त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे रुग्णांचे आणि नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. तसेच नागरीकांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. यासाठी मीरा भाईंदरचे माजी नगरसेवक अजित पाटील यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) मिलिंद म्हैसकर यांच्याकडे निवेदन देऊन गैरसोयी दूर करण्याची विनंती केली आहे. भारतरत्न पंडित भीमसेन जोशी हे शासकीय रुग्णालय या बाबतीत नक्कीच पावले उचलेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.