
चंद्रशेखर बावनकुळे यांची घणाघाती टीका
मुंबई : सध्या महाराष्ट्रातील राजकारण पाहता सत्ताधारी किंवा विरोधी कोणत्याही मुद्द्यावरुन एकमेकांवर निशाणा साधू शकतात अशी परिस्थिती आहे. दोन दिवसांपूर्वीच भारताचं चांद्रयान-३ (Chandrayaan-3) चंद्रावर उतरलं. पण याचाही उपयोग राजकारणी टिकाटिप्पणी करण्यासाठी करत आहेत. 'तुम्ही सूर्याच्या दिशेने जरूर यान सोडा, पण आधी कांद्याचे ‘यान’ लॅण्ड करा! नाहीतर २०२४ मध्ये तुमचे सत्तेचे यान भरकटेल', अशी टीका काल ठाकरे गटाकडून (Thackeray gat) करण्यात आली. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे.
ज्यांच्या पक्षाचे यान पूर्णपणे भरकटले आहे ते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आज चांद्रयान मोहीमेवरून आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी (Narendra Modi) यांच्यावर टीका करत आहेत. कोरोना काळात जे घरात बसून जागतिक आरोग्य संघटनेला सल्ला देऊ शकतात, त्यांच्यासाठी चांद्रयानावर बोलणं म्हणजे आश्चर्य नाही, अशी घणाघाती टीका बावनकुळे यांनी ट्विट करत केली आहे.
या ट्विटमध्ये ते पुढे लिहितात, संपूर्ण जगात चांद्रयान मोहिमेच्या यशाबद्दल भारताचे कौतुक होत असताना आणि या यशाचा संपूर्ण भारतीय आनंद साजरा करीत असताना उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना पोटदुखीचा त्रास सुरू झाला आहे. अर्थात या दोघांचा हा त्रास काही नवीन नाही. दीड वर्षांपूर्वी एकनाथ जी शिंदे यांनी या दोघांच्याही पोटदुखीवर जालीम औषध दिलं होतं पण तरीही दोघांचा पोटदुखीचा आजार काही कमी झाला नाही. कांद्याच्या प्रश्नी देवेंद्र फडणवीसजींनी जापानमधून लक्ष घातल्यामुळे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांचे अश्रू अद्याप थांबले नाहीत. त्यामुळे आज त्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या घरच्या वृत्तपत्रातून गरळ ओकली.
उद्धव ठाकरे गटाच्या पक्षाचे यान संजय राऊत यांच्या नेतृत्वात भरकटलेले आहे. सध्या त्यांनी त्याची चिंता करावी. देशाची चिंता करण्यासाठी मा. मोदीजी आणि राज्याची काळजी घेण्यासाठी देवेंद्रजी सक्षम आहे. अन्यथा उबाठा गटाचे भरकटलेले यान काँग्रेसच्या धुमकेतूवर आदळून नष्ट होईल, अशी टीका करत चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे गटाला धारेवर धरलं आहे.
ज्यांच्या पक्षाचे यान पूर्णपणे भरकटले आहे ते उद्धव ठाकरे आज चांद्रयान मोहीमेवरून आदरणीय पंतप्रधान @narendramodi जी यांच्यावर टीका करत आहेत.
करोना काळात जे घरात बसून जागतिक आरोग्य संघटनेला सल्ला देऊ शकतात. त्यांच्यासाठी चांद्रयानावर बोलणं म्हणजे आश्चर्य नाही.
संपूर्ण जगात…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) August 25, 2023