Sunday, May 25, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडी

Ajit Pawar NCP : शरद पवारांचा यूटर्न! म्हणतात 'मी तसं म्हणालोच नाही!'

Ajit Pawar NCP : शरद पवारांचा यूटर्न! म्हणतात 'मी तसं म्हणालोच नाही!'

दादा पुन्हा येणार का, यावरही व्यक्त झाले काका...


सातारा : 'अजितदादा (Ajit Pawar) आमचेच नेते आहेत, राष्ट्रवादीत कोणतीही फूट पडलेली नाही', असं विधान करत राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज सकाळी खळबळ उडवून दिली होती. राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. परंतु काही तासांतच त्यांनी पत्रकार परिषद घेत 'मी तसं म्हणालोच नाही!' असा खुलासा केल्याने अन्य नेतेमंडळी तोंडावर आपटली आहेत.


बारामतीत आज सकाळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी केलेल्या 'अजितदादा आमचेच नेते आहेत' या विधानामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. विशेष म्हणजे शरद पवारांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) देखील काल याच पद्धतीचं वक्तव्य केलं होतं. त्यामुळे अनेक तर्क-वितर्कांना उधाण आलेले असताना अवघ्या काही तासांतच शरद पवारांनी आपल्या वक्तव्यावरुन यूटर्न घेतला आहे. साताऱ्यात बोलताना सकाळच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत, मी तसं बोललोच नाही असं शरद पवार म्हणाले आहेत.


सुप्रिया सुळे यांनी काल केलेल्या वक्तव्याचा संदर्भ देत शरद पवार म्हणाले, अजित पवार आमचे नेते आहेत असं मी म्हणालो नाही. सुप्रिया त्यांची धाकटी बहिण आहे. त्यामुळे बहिण भावांच्या नात्यात सहजपणे बोललेल्या गोष्टीचे राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही. आज जी भूमिका आमच्या सहकाऱ्यांनी घेतली ते आमचे कुणाचेही नेते नाहीत, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं.


अजित पवार स्वगृही परतणार का या प्रश्नाचं अप्रत्यक्षरित्या शरद पवारांनी उत्तर दिलं. ते म्हणाले, फूट म्हणजे एखादा मोठा गट फुटला गेला तर त्याला फूट म्हणतात. आमच्यातल्या काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली. पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळी आम्ही त्यांना संधी दिली. आता परत संधी मागायची नसते आणि मागितली तर ती द्यायची नसते. सध्या आमची भूमिका दुसरी आहे, असं पवारांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं.



अजित पवारांची मात्र नो कमेंट्स भूमिका


दरम्यान, अजित पवार यांना आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यांबद्दल विचारण्यात आलं. यावेळी त्यांनी 'नो कमेंट्स' असं म्हणत कोणतंही भाष्य करण्यास नकार दिला.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment