सिडको : गेल्या वर्षभरापासून ठाकरे गटातील पक्ष गळती काही करता थांबायचे नाव घेत नसल्याचे दिसून येत असताना आता पुन्हा एक मोठा नेता भारतीय जनता पक्षाच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून त्याबाबत परिसरात मोठया प्रमाणात चर्चेला उधाण आले आहे.
गेल्या वर्षभरामध्ये शहर व जिल्ह्यात ठाकरे गटाला मोठ्या प्रमाणात पक्ष गळती लागल्याचे दिसून येत आहे. ही गळती थांबविण्यासाठी वरिष्ठ स्तरावर काही प्रमाणात प्रयत्न देखील सातत्याने सुरू आहेत. मात्र भाजपा व शिंदे गटाकडून नेहमीच ठाकरे गटातील थोड्याफार प्रमाणात का होईना पक्ष प्रवेश आजही सुरू आहेत.
एकीकडे शिर्डी लोकसभेच्या माजी खासदाराने मातोश्रीवर जाऊन पक्ष प्रवेश घेतल्याचा सुखद धक्का ठाकरे गटाला मिळाला असतानाच आता येथून पुन्हा एकदा मोठं व्यक्तिमत्व आपल्या कुटुंबासह भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा समोर येत आहे. याबाबत भाजपाच्या वरिष्ठ स्तरावर देखील प्राथमिक बोलणे झाल्याचे समजत असून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ग्रीन सिग्नल मिळताच पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याचे समजते.
मात्र ठाकरे गटातील हे व्यक्तिमत्त्व नेमके आहे, तरी कोण ? याबाबत दोन्ही गटाकडून कमालीची गुप्तता ठेवण्यात येत आहे. असे असले तरी पक्षप्रवेश सोहळ्याच्या जय्यत तयारीची चाहूल मात्र लागली आहे. याबाबत परिसरामध्ये चर्चेला उधाण आले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पदाधिकारी व कार्यकर्ते देखील प्रवेश करणार असल्याचे समजते. पक्षप्रवेश सोहळा येथे की मुंबईत याबाबत देखील मौन बाळगण्यात येत आहे.