माझे कोकण: संतोष वायंगणकर
आडाळी औद्योगिक क्षेत्रात मूळ दोडामार्ग डेगवे गावचे युवा उद्योजक स्वप्नील विठ्ठल देसाई यांना ‘लँड अलॉटमेंट’ झाल्याची माहिती व्हाॅट्सअॅपवरून समोर आली. क्षणभर बरं वाटलं. याचं कारण एकीकडे आपण म्हणतो, कोकणात एमआयडीसीमध्ये उद्योग उभारायला कोणी येत नाही. त्यादृष्टीने विचार करता त्याची सुरुवात तर होत आहे. कोकणातील जनतेची काही करण्याची मानसिकताच नाही, अशी टीका सार्वत्रिक होत राहाते. कोकणातील मानसिकतेवर चर्चा करत राहिल्यावर आपोआपच लक्ष दुसरीकडे वळते. मूळ विषयाला बगल मिळते. हे गेल्या अनेक वर्षांत असंच सुरू आहे. कोकणात नव्याने कोणतेही मोठे प्रकल्प यायचे झाले की ते प्रकल्प येऊच नयेत अशी व्यवस्था करणारे काही राजकीय विचारसरणीचे पुढारी आहेत, तर काही सामाजिक संस्थाचे सामाजिक ‘कार्यकर्ते’ म्हणून गळा काढणारी एक टीम नेहमी कार्यरत असते. या अशांचा कोणत्याही प्रकल्पाला विरोधच असतो. विरोध करणाऱ्या अनेकांना आपण विरोध का करतो हेच मुळात माहिती नसते.
राजकीय ‘इश्यू’ करून येणारा उद्योग अडवायचा या अशा गलिच्छ राजकारणात कोकणात येणारे मोठे प्रकल्प आजवर कोकणच्या सीमेवरूनच परत गेले आहेत. काही प्रकल्प फक्त कागदावर चर्चेपुरतेच उरले आहेत. ताज, ओबेरॉय, पंचतारांकित हॉटेल, सी वर्ल्ड, नाणार की बारसू रिफायनरी प्रकल्प, एन्रॉन अशी आणखी कितीतरी उदाहरणं कोकणातील सांगता येतील. कोकणात काहीही व्हायचं असे दे पहिला विरोध, नकार हा ठरलेलाच असतो. नंतर मग कधीतरी अरे, असा होणार होता. आमका माहितीच नाय. आमका उगाच काय सांगितल्यानी म्हणून कोणीतरी सांगणार या सगळ्या चर्चेत नुकसान कोकणचंच होतंय हे कोकणवासीयांच्या लक्षात केव्हा येणार कोण जाणे. अशा नको त्या लोकांवर किती आणि कशासाठी विश्वास ठेवायचा हा प्रश्नच आहे; परंतु अफवांवर कोकणात भरोसा अधिक सत्य कितीही ओरडून सांगितल्यावरही त्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नसतो. दुसरी बाजू सत्य समजून न घेता मतं बनविली जातात आणि तीच पसरवली जातात. यामुळे सत्य समोर येतच नाही.
खोटं अफवांमधून एवढं पसरवलं जातं की ‘सत्य’ समाजासमोर कोणी आणण्याचा प्रयत्न केला तरीही अफवांवर विश्वासून चालण्याची मानसिकता असलेल्या कोकणात या पुढच्या काळात विकास प्रक्रिया गतिमान करण्यासाठी सकारात्मकतेने विचार केला पाहिजे. कोकणात उद्योग उभारणीत जसे काही स्वार्थी राजकीय पक्ष पुढाऱ्यांचे अडथळे आहेत तसेच अडथळे उद्योग उभारताना प्रशासनातील अधिकाऱ्यांकडूनही आणले जात आहेत. औद्योगिक विकास महामंडळातील अधिकारी कोकणात येणाऱ्या, काही कोकणात करू पाहणाऱ्या उद्योजकाला किंवा नवउद्योजकाला जेवढं अडवता येईल ते अडवण्याचा, अडथळे आणण्याचा प्रयत्न उद्योग विभागातील अधिकाऱ्यांकडूनच होत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. कोकणात आडाळी येथे नव्याने एमआयडीसी स्थापन झाली. या आडाळी एमआयडीसीमध्ये काही कोकणातील व काही मूळ कोकणातील; परंतु आज पुणे, मुंबईत उद्योग करणाऱ्या उद्योजकांकडून उद्योग उभारणीचे प्रस्ताव उद्योग विभागाकडे सादर करण्यात आले.
एमआयडीसीतील जागेसाठी प्रस्ताव देऊन प्लॉटची मागणी करण्यात आली; परंतु क्षुल्लक त्रुटी काढून प्रस्ताव नाकारले जात आहेत. त्याची कारणं नेमकेपणाने काय आहेत ही सर्वश्रुत आहे. परप्रांतीय आले की बाकीच्या अनेक गोष्टी सोप्या होतात. म्हणून मग काहीतरी क्षुल्लक कारण काढून अडवायचं धोरण उद्योग विभागाकडून बदललं पाहिजे. तरच कोकणातील एमआयडीसीत उद्योग उभे राहतील. एक उदाहरण मुद्दाम आपणा सर्वांच्या माहितीसाठी देतो. कोकणातील पुळास गावचे उद्योजक. त्यांचा भोसरी येथे गाड्यांचे स्पेअरपार्टस बनविण्याचा उद्योग आहे. सिंधुदुर्गातील ५० तरुण या भोसरीच्या कारखान्यात काम करतात. त्या उद्योजकांनी आडाळी येथे एक युनिट आपल्या जिल्ह्यात सुरू करण्यासाठी आडाळीत प्लॉट मागणी केली; परंतु क्षुल्लक कारण देत प्लॉट देण्यास टाळाटाळ केली जातेय. याचवेळी त्या उद्योजकांने गुजरातमधील एमआयडीसीमध्ये ऑनलाइन ॲप्लिकेशन दिलं आणि अगदी दोन दिवसांत गुजरात सरकारच्या उद्योग विभागातून सारखी चौकशी सुरू झाली.
आपण प्रोजेक्ट केव्हापासून सुरू करताय. कोणतीही अडचण येत असेल तर सांगा. एवढी तत्परता गुजरात सरकारकडून दाखवली जाते; परंतु इथे तर जागो-जागी फक्त प्रशासनाकडून अडवणूकच होत राहते. हे बदलल्याशिवाय कोकणातील उद्योग-व्यवसायातले चित्र बदलणार नाही. एककडे मोठ्या प्रकल्पात केलं जाणारं राजकारण त्यामुळे देशभरात आणि जगभरात कोकणात प्रकल्प आणण्यास कोणी उत्सुक नाही आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील उद्योजक कोकणात काही उद्योग उभे करण्यास उत्सुक असतील, तर त्यांच्यासाठी चांगलं वातावरण निर्माण झालं पाहिजे. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनीही प्रशासनात ‘शुक्राचार्य’ बनून काम करण्यापेक्षा येणाऱ्या उद्योजकांशी सौजन्य आणि सहकार्य देऊन कोकणातील आर्थिक समृद्धीत भर घालण्यासाठी प्रयत्न व्हावेत. आडाळीच्या लाँग मार्चनंतर १५ उद्योजकांना प्लाॅट अलाॅट झाले आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. नाही तर कोकणात कोणी उद्योजक यायला तयार होत नाहीत, हे खोट चित्र निर्माण करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये.